रत्नागिरी : मोदी @ ९ अंतर्गत येथील गुरुकृपा मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या व्यापारी मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी विविध सूचना यावेळी केल्या.
भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन म्हणाले, नोटबंदीनंतर डिजिटल युग अवतरले आणि याचा सर्वांत जास्त फायदा व्यापारी, उद्योग क्षेत्राला झाल्याचे आकडेवारी सांगते. भाजप हा शेठजींचा पक्ष मानला जातो. कारण व्यापारीवर्ग यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. भाजप हा व्यापारी वर्गाचे प्रतिनिधित्व करतो, अशी टीका केली जाते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत कार्यक्षम नेतृत्व आहे. देशाला धैर्याने पुढे नेणारे नेतृत्व आहे. कोविडच्या कठीण कालखंडामध्येही हे नेतृत्व थांबले नाही. देशाची अर्थव्यवस्था त्यांनी जगात पाचव्या स्थानी आणली. ही किमया मोदीजींनी केवळ नऊ वर्षांमध्ये साध्य केली. भारताचे अर्थकारण गतिमान होत असून व्यावसायिक संधी वाढत आहेत. २०२४ मध्ये पुन्हा एकदा मोदीजींना सत्तास्थानी नेऊन रत्नागिरीमध्ये राहिलेली कसर आपण सर्वांनी मिळून भरून काढू. देशाच्या समाजाच्या प्रत्येक घटकाला त्याचा लाभ होणार आहे, असेही ते म्हणाले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ प्रमुख प्रमोद जठार म्हणाले की, मोदी सरकार सोल्यूशन देणारे सरकार आहे. असा एक पंतप्रधान मिळाला की जो प्रश्न, अपेक्षा विचारावर उत्तर शोधतो. संपूर्ण देशभरामध्ये मोदी @ ९ चे उपक्रम सुरू आहेत. भाजपा कार्यकर्ते सर्व देशवासीयांचे आभार मानत आहेत. जनसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी भाजपा रत्नागिरीमध्ये वॉर रूम बनवत आहे. तुम्ही येथे तुमचा कुठलाही प्रश्न आणून द्या, तो प्रश्न सोडवण्यासाठी दिल्ली दरबारापर्यंत पोहोचवू.
भाजपा प्रदेश सचिव तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग प्रभारी महेश जाधव म्हणाले की, पक्ष संघटना बांधणीची जबाबदारी माझ्याकडे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ९ वर्षांचा कार्यकाळ सुवर्णकाळ मानला पाहिजे कारण विमानतळ, रस्ते, रेल्वेमार्ग मोठ्या प्रमाणात होत आहेत. पंतप्रधान मोदींना अमेरिकेने रेड कार्पेट घातले आहे. व्यापाऱ्यांच्या पाठीशी भाजप ठामपणे उभा राहणार आहे. व्यापाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावून निश्चितपणे तुम्हाला दिलासा देऊ.
रत्नागिरी विधानसभा प्रमुख बाळासाहेब माने म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला होते, तसे मोदींचे सरकार कल्याणकारी आहे. अडचणी असतील त्या आपण दूर करूया. सामान्य असो वा मोठा व्यापारी, या सर्वांना योग्य तो सन्मान मोदींच्या राज्यात, देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात मिळाला पाहिजे, त्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. मोदी सरकारला नऊ वर्षे झाली. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद यापूर्वी मोदी साहेबांना मिळाले तसे २०२४ सालीसुद्धा मिळावेत. आम्ही कार्यकर्ते प्रयत्न करू, पण तुम्हीसुद्धा मोदी साहेबांचे हितचिंतक, मित्र, फिलॉसॉफर, गाइड या माध्यमातून आपले सगळ्यांचे आशीर्वाद मिळू देत.
यावेळी व्यासपीठावर जिल्हासरचिटणीस राजेश सावंत, सचिन वहाळकर, शहरध्यक्ष सचिन करमकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ. वर्षा भोसले, उपाध्यक्ष सौ. आम्रपाली साळवे, उपाध्यक्ष सौ. शिल्पा मराठे आदी उपस्थित होते. जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर यांनी प्रास्ताविकात मोदी पर्वातील योजनांची माहिती दिली. सूत्रसंचालन जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी यांनी केले. भाजयुमो शहराध्यक्ष विक्रम जैन, दादा ढेकणे यांनी या व्यापारी मेळाव्याचे नेटके नियोजन केले.
भाजपाने कन्झ्युमर असोसिएशनचे अध्यक्ष अन्वरशेठ मेमन, क्रेडाईचे सुमित जैन, मोबाइल विक्रेते मनोहर ढेकणे, रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे गणेश भिंगार्डे, कुवारबाव व्यापारी संघाचे नीलेश लाड, प्रभाकर खानविलकर व सहकारी, ब्युटी पार्लर संघटनेच्या सौ. मेधा कुळकर्णी, सुवर्णकार संघटनेचे संतोष खेडेकर, उद्योजक संघटनेचे दिगंबर मगदूम, नाभिक समाज हितवर्धक मंडळाचे प्रकाश हातखंबकर, व्यापारी प्रवीण मलुष्टे, आंबा बागायतदार संघाचे मंदार सरपोतदार यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.



एमआयडीसीमधील ७५ टक्के उद्योग बंद
रत्नागिरी एमआयडीसीमधील उद्योजक सर्व तऱ्हेचे कर भरतात. त्यांना पुरेशा सुविधा मिळत नाहीत. शिवाय ७५ टक्के उद्योग बंद पडले आहेत, अशी खंत व्यापारी प्रवीणशेठ मलुष्टे यांनी मेळाव्यात व्यक्त केली. मेळाव्यात अनेक व्यापारी, उद्योजकांनी समस्या मांडून त्या सोडवण्यासाठी भाजपाकडे प्रयत्न करण्याची विनंती केली. श्री. मलुष्टे म्हणाले, एमआयडीसीला आणि ग्रामपंचायतीला आम्ही कर भरतो. परंतु एमआयडीसीमध्ये गटार व्यवस्था नाही, फक्त चर मारून ठेवला आहे. तेथून पाणी जाते का, हेसुद्धा पाहिले जात नाही. आम्हाला पुरेसे पाणी मिळत नाही. एमआयडीसीतील व्यापारी ग्राहकांची वाट बघत आहे. एमआयडीसीमध्ये जवळजवळ ७५टक्के उद्योग बंद आहेत. त्याची कारण शोधा. त्यांना सहकार्य मिळते का, एमआयडीसी ऑफिसकडून एखादा इंडस्ट्रियल प्लॉट मागायला जातो, तेव्हा नवीन नियम असतो. त्याचा लिलाव केला जातो. जमीनमालकांच्या जागा कमी दराने घेतलेल्या आहेत आणि आता त्या १३-१४ लाखाच्या लिलावाला विकता. एमआयडीसी धंदा करायला बसली आहे का, तुमच्याकडे उद्योग कसे येणार, या सगळ्या गोष्टींचा विचार करून लवकरात लवकर तोडगा काढा, असे आवाहन त्यांनी केले. उद्योग सुरू करण्यासाठी येतात त्यांना कमीत कमी वेळामध्ये सगळ्या परवानग्या द्या. कारण आम्ही ऐकतोय की गुजरातमध्ये उद्योग सुरू करायचा असला तर ते तुमच्या ऑफिसमध्ये येऊन परवानगी देतात. उद्योग लगेच सुरू होतो. उद्योजकांना रेड कार्पेट घाला, असेही त्यांनी सांगितले.
कुवारबाव व्यापारी संघाचे अध्यक्ष नीलेश लाड यांनी कुवारबावच्या व्यापाऱ्यांचे प्रश्न मांडले. महामार्गात जागा जात असून भरपाई मिळत नाही. आमचा सातबारा रस्त्याच्या मध्यभागापासूनचा आहे. ती सर्व जागा गृहीत धरली पाहिजे. याकरिता आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली आहे. याच संघटनेच्या प्रभाकर खानविलकर यांनी सांगितले की, संघर्षातून आमच्या संघटनेचा जन्म झाला आहे. रत्नागिरी महामार्गासंदर्भातला अनुभव २०१६ चा आहे. नंतर २०१८ मध्ये आम्हाला २०० व्यापाऱ्यांना अटकही झाली होती. कुवारबाव भागात स्थानिक युवा व्यापाऱ्यांसाठी व्यापारी संकुल उभारण्यात यावे. फिरत्या व्यापाऱ्यांमुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे हेमंत वणजू यांनी सांगितले की, शहर व्यापारी महासंघ व्यापाऱ्यांसाठी सातत्याने लढा देत आहे. भाजपने मवाळ भूमिका न घेता व्यापाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे, रस्त्यावर उतरायला पाहिजे. आत्ता व्यापाऱ्यांवर ऑनलाइन मार्केटचे आक्रमण होत आहे आणि आणि दुसरे म्हणजे अनधिकृतपणे फेरीवाले, रस्त्यांवर बसणारे परप्रांतीय व्यापारी यांचा आणि स्थानिक व्यापाऱ्याला मोठा फटका बसत आहे. कांदाबटाट्यापासून अगदी फर्निचरपर्यंत सगळ्या वस्तू फिरते विक्रेते विकताना दिसतात. त्यांच्यावर तातडीने उपाययोजना करावी. सर्वोच्च न्यायालयाने १९९९ मध्ये निकाल दिला की प्रत्येक राज्याने फेरीवाला धोरण निश्चित करावे. त्यानुसार २००९ मध्ये महाराष्ट्र शासनानेही सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींना आदेश दिले. रत्नागिरी नगरपालिकेने हे धोरण अस्तित्वात आणावे.
भक्ती किरपेकर म्हणाल्या की, प्लास्टिक पिशव्या विकतो म्हणून प्रत्येक व्यापाऱ्याला दंड भरावा लागला आहे. पण या पिशव्या राजरोसपणे विकत फिरणाऱ्यांवर कारवाई होत नाही. प्लास्टिक बंदी सर्वांनाच सारखी असली पाहिजे. बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांची निर्मिती का होते, त्यावर कारवाई व्हावी. दुसरा विषय असा की, दोन कोटी टर्नओव्हरच्या वर प्रत्येक बिल जीएसटी पोर्टलवर अपलोड करावे लागणार आहे. परंतु ही मर्यादा टर्नओव्हर पाच कोटी करावी. नाहीतर व्यापाऱ्यांनी व्यापार करायचा की अपलोडिंगसाठी वेळ घालवायचा हा प्रश्न आहे.
कंझ्युमर्स असोसिएशनचे सेक्रेटरी अविनाश कुळकर्णी म्हणाले की, रत्नागिरी शहरात ठरलेल्या वेळेत किंवा अन्य कोणत्याही वेळेत माल उतरवताना वाहतूक पोलीस दंड ठोकतात. यापूर्वी वाहतूक पोलिसांना भेटून समस्या मांडली. परंतु दोन-पाच मिनिटे उशीर झाला तरी दंड ठोठावला जातो. याकरिता वाहतूक पोलिसांसोबत व्यापारी संघाची संयुक्त बैठक घेऊन वेळ निश्चित करावी. फूड लायसन्स असले तरी ज्याला माल देतोय त्याच्याकडे लायसन्स नसले तर दंड आम्हाला ठोकला जातो. समोरच्याचे लायसन्स नाही हा मुद्दा चुकीचा आहे. आम्ही आमची बिले, जीएसटी, क्यूआर कोडसह देतो. तरीही काही वितरकांना पन्नास हजारांपर्यंत दंड ठोठावला गेला आहे. जीएसटी अमेंडमेंट येत असतात. परंतु ई मेल, मेसेज न पाठवता व्यापाऱ्यांना दंड ठोठावला जात आहे. याकरिता जीएसटी अधिकाऱ्यांनी कारवाईपूर्वी नोटीस पाठवावी.
आंबा बागायतदार संघाचे मंदार सरपोतदार म्हणाले की, आंबा बागायतदारांना वानरांचा उपद्रव होत आहे, याकरिता जिल्हाधिकाऱ्यांपासून कृषी मंत्र्यांपर्यंत सर्वांना भेटलो. रत्नागिरी जिल्हा आंब्याचे उत्पादन नसल्याने बाधित जाहीर केला. त्याकरिता प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट पन्नास हजार रुपये मिळणार आहेत, ती मदत त्वरित मिळावी. गेली अनेक वर्षे आंबा बागायतदार अडचणीत आहेत. हवामानाचा बदल असेल किंवा काही बाजारातील घडामोडी असतील. त्यामुळे उत्पादन खर्च आणि त्याच्यापासून मिळणारे उत्पन्न यात फारकत वाढत चालली आहे. वीस वर्षांपूर्वी पेटीला ३२०० रुपये मिळत होते, आजही तेवढेच मिळत आहेत, पण तेव्हा डिझेल ३६ रुपये लिटर होते, आता १०० रुपये लिटर आहे. ज्या शेतकऱ्यांनी बँकेच्या विविध योजनेअंतर्गत कर्ज घेतलेले आहे, ते पूर्ण भरले आहे, त्यांना पुन्हा कर्ज लागले तर बॅंका नाकारतात. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अशा शेतकऱ्यांना परत कर्ज दिले पाहिजे, अशी घोषणा केली. याचा पाठपुरावा भाजपाने करावा.
भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर यांनी प्रास्ताविकामध्ये मोदी सरकाराने गेल्या ९ वर्षांत लागू केलेल्या योजनांचा थोडक्यात आढावा घेतला. ते म्हणाले की, लोकांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षांतर्गत यंत्रणा उभी केली आहे. हे प्रश्न केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची आमची जबाबदारी आहे.



व्यापाऱ्यांच्या मन की बात ऐकण्याचा प्रयत्न – बाळ माने
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बातमध्ये देशभरातल्या विविध विषयाच्या माध्यमातून देशवासीयांसमोर व्यक्त करतात. व्यापाऱ्यांच्या मन की बात ऐकण्याकरिता व्यापारी मेळाव्याचे आयोजन केले आहे, असे प्रतिपादन भाजपचे रत्नागिरी विधानसभा प्रमुख बाळासाहेब माने यांनी मेळाव्यात केले.

भाजपाने भाजपने मोदी @ ९ चा एक भाग म्हणून व्यापारी मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी यंत्रणा पाहिजे. मी पक्षाच्या पलीकडे जाऊन याच्यामध्ये असे म्हणेन की २५ वर्षांपूर्वीची रत्नागिरी आणि आज बदललेली रत्नागिरी व्यापाऱ्यांच्या ताकतीवर बदलली आहे. फार काही कोणी यामध्ये केले नाही. फिनोलेक्स कंपनीव्यतिरिक्त कोणताही नवीन उद्योग आला नाही. बाकीचे उद्योग आता चालले आहेत. खरे तर व्यापारातील समस्या, अडचणी सोप्या व्हाव्यात. कारण अनेक वर्षे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून एक व्यवस्था, सिस्टीम असते. अनेक वेळेला हे प्रशासन आहे. आपल्याशी संबंधित जे काही विभाग येतात, त्यात लाल फितीचा कारभार होता. काही कायदे होते आणि त्या कायद्यांमुळे व्यापारी हैराण होता. त्याला त्या ठिकाणी आनंदाने व्यापार करता येत नव्हता. अभिमानाने सांगता येईल की, पंतप्रधान नरेंद्र मोदीचे सरकार, मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीसांचे सरकार आले त्यावेळेला खऱ्या अर्थाने व्यापारी, उद्योजकाला न्याय मिळाला. अनेक कालबाह्य झालेले कायदे रद्द केले, सोपे कायदे आणले. जीएसटीचा कायदा हा चांगला आहे. त्यासाठी सूचना आल्या आहेत. नक्कीच त्या सूचनांवर अंमलबजावणी करू. यापूर्वीची सरकार आणि मोदी साहेबांचे नऊ वर्षांचे भाजपा प्रणित सरकार यांच्यामधला फरकसुद्धा व्यापारी पद्धतीने समजून घेतला पाहिजे आणि तो समाजाला सांगितला पाहिजे, ही आमची प्रामाणिक अपेक्षा आहे.
ते म्हणाले की, मुद्रा कर्ज घेऊन अनेक तरुण उभे राहत आहेत. बँकिंग व अन्य क्षेत्रात पारदर्शकपणा आला आहे. पूर्वी करप्रणालीमुळे व्यापाऱ्याला भीती वाटत होती. पण आता पारदर्शकता, डिजिटल प्रणालीमुळे, तंत्रज्ञानामुळे व्यापाऱ्यांना अडचण नाही. यामुळे व्यापाऱ्यांना खऱ्या अर्थाने व्यापार करण्याकरिता प्रोत्साहन मिळत आहे. स्थानिक व्यापाऱ्यांची अडचण म्हणजे फेरीवाल्यांचा विषय. स्थानिक प्रश्न एका दिवसात सुटणार नाही, त्याकरिता सातत्याने भारतीय जनता पार्टी, सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि व्यापारी सहकारी बंधूभगिनी यांनी सातत्याने संवादातून उपाययोजना, चर्चा, मार्ग काढला पाहिजे.
विमानतळ, रेल्वे, महामार्ग झाले पाहिजेत यातून वेळेची बचत होईल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कनेक्टिव्हिटी पाहिजे. त्यामुळे रत्नागिरीच्या मार्केटमध्ये पैसा येईल. मत्स्य व्यवसाय किंवा आंबा हे दोन व्यवसाय सोडले तर चलनवलन होणार कसे, हा प्रश्न आहे. त्यामुळे अर्थचक्र थंडावले आहे. अनेक कल्पक छोट्या छोट्या सूचना, उपाययोजना आपल्याकडून येऊ शकतात, आमच्याकडून येऊ शकतात, जेणेकरून रत्नागिरी शहराचा व्यापार वाढला पाहिजे. व्यापारी, उद्योजकांना सुविधा मिळत नाहीत. व्यापारी असल्यामुळे या सगळ्या समस्यांना तोंड द्यायला किंवा प्रतिकार करायला कोणाकडे वेळ नाही. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या नात्याने सगळ्या व्यापाऱ्यांनी आपल्या छोट्या मोठ्या समस्या, एमआयडीसीसारख्या व्यवस्था किंवा प्रशासकीय कार्यालयामधला अनागोंदी कारभार, ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल, तो आमच्याकडे मांडा. भविष्यकाळामध्ये आपण सातत्याने एकत्र येऊ या आणि ज्या ज्या काही व्यापाऱ्यांना म्हणून येणाऱ्या अडचणी आहेत, त्या सोडवण्याचा जरूर प्रयत्न करू, असे श्री. माने यांनी सांगितले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

