रत्नागिरी : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा येथील चॅप्टर आणि आर्ट ऑफ लिव्हिंग तसेच गुर्जर आयुर्वेदिक चिकित्सालय यांच्या संयुक्त विद्यमाने खास उद्योजकांसाठी पार पडलेल्या प्राणायाम, आहार, विहार आणि आरोग्य शिबिरात उद्योजकांनी योग, प्राणायाम आणि उत्तम आरोग्याचे नियम जाणून घेतले.
धकाधकीच्या काळात उद्योजकांनी मानसिक स्वास्थ्य आणि मानसिक ऊर्जा टिकवणे किती गरजेचे आहे, हे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मानसी महागावकर यांनी सहज सोप्या शब्दांत सांगितले. प्राणायामामधील नाडीशुद्धी प्राणायाम, भस्त्रिका, ध्यान यांचे प्रात्यक्षिक दाखवून त्यांनी ते उपस्थितांकडून करवून घेतले. याच पद्धतीने दररोज पाऊण ते एक तास प्राणायाम आणि ध्यान केल्यास आपल्या ऊर्जेमध्ये प्रचंड परिणाम दिसून येतो. त्यामुळे आपल जीवन अधिक उत्साही आणि निरोगी होते, असे त्यांनी सांगितले. प्राणायाम आणि ध्यान करताना बारीकसारीक गोष्टींची कशी काळजी घेतली पाहिजे, याचे उत्तम मागदर्शन त्यांनी केले. सामूहिक ध्यान केल्याने इच्छाशक्ती अधिक दृढ होते, असेही त्या म्हणाल्या.
गुर्जर आयुर्वेदिक चिकित्सालयाचे डॉ. आशुतोष गुर्जर यांनी आपण निरोगी जीवनशैली कशी राखू शकतो, याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. आहार-विहार-आरोग्य यांचा परस्परसंबंध त्यांनी विशद केला. भूक लागल्यावरच अन्नग्रहण केले पाहिजे, हा अतिशय मूलभूत आणि महत्त्वाचा मुद्दा त्यांनी समजावून सांगितला. तिखट, आंबट, खारट, गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले, तर शरीरावर होणारे दुष्परिणाम त्यांनी सविस्तर सांगितले. आहारात तेलाचा अतिवापर केल्यामुळे आपणच आजारांना निमंत्रण दिल्यासारखे होते, असे ते म्हणाले. नियमित व्यायाम आणि योग्य आहार ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे, असा कानमंत्र त्यांनी दिला. आयुर्वेद रोजच्या व्यवहारी जगात कसा आचरणात आणता येईल, आहार-विहाराच्या चांगल्या सवयी कशा लावून घेता येतील, हे त्यांनी सोप्या शब्दांत सांगितले. प्रगतीच्या युगात खुर्ची हे अनारोग्याचे सर्वांत मोठे कारण आहे, हे त्यांनी मनोरंजकरीत्या पटवून दिले. मोबाइलचा अतिवापर शारीरिक आणि मानसिक आजारांना निमंत्रण देऊ शकतो. म्हणूनच त्याचा वापर गरजेपुरताच व्हायला हवा, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
सॅटर्डे क्लबचे कोकण रिजन हेड राम कोळवणकर, डेप्युटी रिजन हेड तुषार आग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. योग, प्राणायाम आणि योग्य आहार-विहाराचे नियम समजावून सांगणाऱ्या या शिबिराचा उपयोग उद्योजक आरोग्य सुदृढ करण्यासाठी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

