Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

कीर्तनकार, शिक्षक किरण जोशी यांचे निधन

Advertisements

रत्नागिरी : येथील कीर्तनकार आणि जीजीपीएस शाळेतील क्रीडा शिक्षक, गुरुकुलचे प्रमुख किरण जोशी (वय ४८) यांचे आज दुपारी १२.४५ वाजता हृदयविकाराने निधन झाले.

किरण जोशी यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९७५ रोजी झाला. ते जीजीपीएस शाळेत अनेक वर्षे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होते. शाळेने गुरुकुल सुरू केल्यानंतर गुरुकुलची जबाबदारी संस्थेने त्यांच्याकडे दिली. ते ही जबाबदारी उत्तम रीतीने सांभाळत होते. किरण जोशी विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. त्यांच्या अष्टपैलू कामगिरीमुळेच त्यांना ज्ञानप्रबोधिनीचा अध्यापकोत्तम पुरस्कार मिळाला.

अनेक ठिकाणच्या उत्सवात ते कीर्तन करत. जिल्ह्यात विविध ठिकाणच्या उत्सवामध्ये ते कीर्तनसेवा करायचे. धार्मिक कार्यक्रमात पौरोहित्य करत. कीर्तनकुलच्या रत्नागिरी शाखेचे ते अनेक वर्षे काम करत. त्यामुळे जिल्ह्यात त्यांचा चांगला संपर्क होता. पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाशी त्यांचा निकटचा संबंध होता. ते अभिनेतेही होते.

गेल्या वर्षापासून ते आजारी होते. काही महिने ते कर्करोगानेही ग्रस्त होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर संध्याकाळी मुरूगवाडा येथील भागोजीशेठ कीर अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी समाजातील विविध स्तरांतील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी जोशी कुटुंबियांचे सांत्वन केले.

त्यांच्या निधनामुळे उत्तम शिक्षक, कीर्तनकार म्हणून नावाजलेले आणि सामाजिक बांधिलकीने सर्वांना मदत करणारे व्यक्तिमत्त्व हरपल्याने सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. किरण जोशी त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुलगे, भाऊ असा मोठा परिवार आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version