रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे हभप किरण जोशी स्मृती कीर्तनमाला आयोजित केली आहे. येत्या २४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत ही कीर्तने होणार आहेत.
प्रसिद्ध कीर्तनकार किरण जोशी यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता या कीर्तनमालेचे आयोजन केले आहे. पहिल्या दिवशी २४ नोव्हेंबरला कीर्तनकार हभप तेजस्विनी दिनेश जोशी कीर्तन करतील. त्यांचे कीर्तनाचे सर्व शिक्षण (कै.) नाना जोशी व (कै.) किरण जोशी यांच्याकडे झाले आहे. गायनाच्या चार परीक्षा उत्तीर्ण आहेत. रत्नागिरी, गुहागर, संगमेश्वर, चिपळूण इत्यादी ठिकाणी सुमारे १०० कीर्तने झाली आहेत. यावेळी सूत्रसंचालन प्रसाद वैद्य, प्रास्ताविक राजू जोशी आणि प्रा. श्रीकांत दुदगीकर करतील. त्यानंतर श्रद्धांजली पुस्तिकेचे प्रकाशन प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे यांच्या हस्ते होईल.
दुसऱ्या दिवशी २५ नोव्हेंबला कीर्तनकार हभप संजय गुरुनाथ कोटणीस यांचे कीर्तन होईल. कोटणीस घराण्यात १३० वर्षे अखंड कीर्तन परंपरा सुरू आहे. रेडिओवरही कीर्तन, प्रवचनाचे कार्यक्रम होत असतात. सध्या यूट्यूबवर दररोज ३० मिनिटे प्रवचनाचा कार्यक्रम चालू आहे. ते विश्व हिंदू परिषदेच्या सांगली शाखेचे उपाध्यक्ष आहेत.
अखेरच्या दिवशी २६ नोव्हेंबरला कीर्तनकार हभप हर्षद श्रीनिवास जोगळेकर कीर्तन करतील. ते तबला व गायन विशारद आहेत. त्यांनी ३००० पेक्षा अधिक कीर्तनांना तबल्याची साथ केली असून स्वतःही तेवढी कीर्तने केली आहेत. गेली ३० वर्षे कीर्तन सेवा करीत आहेत. कीर्तनालंकार, स्वरताल धुरंदर, कीर्तनरत्न आदी पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत.
तीन दिवस दररोज सायंकाळी ५.३० ते ७.१५ या वेळेत ही कीर्तने वरची आळी येथील स्वामी स्वरूपानंदांच्या अध्यात्म मंदिरात होणार आहे. या कीर्तनापूर्वी सूत्रसंचालन प्रसाद वैद्य, प्रास्ताविक नितीन लिमये, धनंजय चितळे करतील. या सर्व कीर्तनांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


