बाळासाहेब माने भाजपचे लोकसभा सहप्रभारी

रत्नागिरी : रत्नागिरीचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब माने यांची भाजपाचे लोकसभा सहप्रभारी म्हणून निवड झाली आहे.

भाजपने महाविजय २०२४ हे अभियान देशभरात सुरू केले आहे. महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांत विजय मिळवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीने रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात रत्नागिरी विधानसभा क्षेत्रप्रमुख, माजी आमदार बाळासाहेब माने आता अभियानाचे सहप्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. येत्या १५ जानेवारीला मकरसंक्रांतीच्या दिवशी भगवान परशुरामाचे दर्शन घेऊन या अभियानाला प्रारंभ होईल. प्रत्येक गाव, बूथवर दौरा करून १८ फेब्रुवारीला राजापूरमधील धूतपापेश्वर मंदिरात अभियानाची सांगता होणार आहे. लोकसभा प्रभारी अतुल काळसेकर, संयोजक प्रमोद जठार यांच्यासमवेत हा दौरा होणार आहे.

यावर्षी होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी पुढचे काही दिवस अभियान सुरू राहील. भाजपाने २०१४ मध्ये लोकसभेच्या २८३ जागा व २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकून केंद्रात सत्ता स्थापन केली. आता ४०४ चा टप्पा पार करून अभूतपूर्व यश मिळवण्यासाठी भाजपा सज्ज झाली आहे. पहिल्या टप्प्यात लोकसभा प्रवास योजनेत देशभरातले कधीही न लढवलेले १५६ मतदारसंघ पक्षाने निवडले. त्यातील काही जागा मित्रपक्षांना दिल्या होत्या. या ठिकाणी लक्ष केंद्रित केले. त्यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघही येतो. त्यानुसार लोकसभा प्रभारी-समन्वयक म्हणून अतुल काळसेकर व लोकसभा संयोजक तथा निवडणूक प्रमुख म्हणून प्रमोद जठार यांनी मतदारसंघात दौरे केले. केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांनीही या मतदारसंघात लक्ष घातले.

आता महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ मतदारसंघांकडे भाजपाने विशेष लक्ष दिले आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी लोकसभा सहप्रभारी म्हणून बाळ माने यांच्या नावाची घोषणा केली. अन्य कार्यकारिणीही घोषित केली. त्यामध्ये मंडल अध्यक्ष, प्रमुख, तालुकाध्यक्ष आदी महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची सहसंयोजक म्हणून निवड केली आहे. पक्षाने ३८ विभाग केले असून त्याअंतर्गत समित्या बनवल्या आहेत. लोकसभा जिंकण्यासाठी या समित्यांचे काम सुरू होणार आहे.

श्री. माने यांच्याकडे लोकसभा प्रवास योजना सुरू झाल्यानंतर विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून जबाबदारी दिली गेली. मंडणगड ते राजापूरपर्यंत त्यांचा नियमित प्रवास व कार्यकर्ता जोडलेला आहे. जनसामान्यांपर्यंत ते पोहोचलेले आहेत. ज्यावेळी २०१७ मध्ये भाजपाने ५५ जि. प. गट आणि ११० पं. स. समिती गणात निवडणूक लढवली तेव्हा चिपळूण, संगमेश्वर मतदारसंघात मताधिक्य दिसून आले. चिपळूण नगरपालिका, देवरूख नगरपंचायतीत भाजपाने सत्ता मिळवली. येथे ३४ हजार मते, रत्नागिरीमध्ये ५० हजार मते आणि राजापूरमध्ये २५ हजार मते आहेत. गेल्या १० वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा म्हणून खास मतदार तयार होत आहे. हा मतदार सुमारे २५ टक्के वाढेल, असा भाजपाचा होरा आहे. सिंधुदुर्गमध्ये भाजपची मोठी ताकद आहे.

महाविजय कार्यकारिणी अशी – केंद्रीय मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, लोकसभा प्रभारी- समन्वयक- अतुल काळसेकर, सहप्रभारी बाळ माने, लोकसभा संयोजक- निवडणूक प्रमुख प्रमोद जठार, सहसंयोजक- राजेश सावंत, प्रभाकर सावंत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply