रत्नागिरी : अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी आणि श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा या मंगल सोहळ्याचा आनंद अधिक संस्कारक्षम करण्यासाठी स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था श्री रामरक्षा पठण व रामचरित्र कथाकथन स्पर्धा घेणार आहे.
ही माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली. ते म्हणाले, अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमीच्या ठिकाणी भव्य राम मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी होत आहे. हिंदुस्थानच्या जनमानसाच्या अस्मितेचे प्रतीक म्हणजे रामजन्मभूमीवर उभे राहत असलेले भव्य राम मंदिर, श्रीरामाचे स्थान भारतीय जनमानसात भावभक्तीने कोरलेले आहे. राममंदिर उभे राहण्यासाठी ५०० वर्षांची वाट पाहावी लागली. शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर प्रभू राम अयोध्येत भव्य मंदिरात स्थानापन्न होत आहेत. हा क्षण अत्यंत आनंदाचा क्षण आहे. यानिमित्त देशभरात दिवाळी साजरी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी हा दिवस दीपोत्सव म्हणून देशवासीयांनी साजरा करावा, असे आवाहन केले आहे. त्याची तयारी जल्लोषात सुरू आहे. यानिमित्त खारीचा वाटा म्हणून स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था श्रीरामरक्षा पठण व रामचरित्र कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
प्रभूरामाचे राज्य हे रामराज्य म्हणून आदर्श राज्य मानले जाते. जणू रामराज्याचा कालावधी परत अवतरला आहे असे जनमानसाला जाणवत आहे. यामध्ये या स्पर्धा घेणे औचित्याचे ठरणार आहे. राम मंदिराचा भक्तिमय आनंद साजरा करतानाच विद्यार्थ्यांना यात सामावून घेण्यासाठी या स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. रामचरित्र, राम-सामर्थ्य याची महती कळण्यासाठी रामरक्षा पठण आणि रामचरित्रावर आधारित कथाकथन स्पर्धा माध्यमिक शाळा स्तरावर घोषित केल्या आहेत. शहर व पतसंस्थेच्या शाखांच्या आवारातील १५ माध्यमिक शाळा आपापल्या स्तरावर या स्पर्धा घेणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व ग्रंथ बक्षीस तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष ॲड. पटवर्धन यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

