कुणबी समाजोन्नती संघाच्या विद्यार्थी वसतिगृहाचे मुलुंड येथे उद्घाटन

मुंबई : कुणबी समाजोन्नती संघ (मुंबई) या संस्थेने मुलुंड येथे उभारलेल्या विद्यार्थी वसतिगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

सामाजिक भान ठेवून समाजभावी संस्था काम करतात. शिक्षण आणि सुविधांमध्ये महाराष्ट्र पुढे आहे. प्रयत्न करणारे प्रामाणिक असतात तेव्हा अशा प्रकारचे वसतिगृह उभे राहते, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. यावेळी उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष भूषण बरे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, या वसतिगृहासाठी ज्यांचे योगदान लाभले, त्या सर्वांचे अभिनंदन करतो. आधुनिक महाराष्ट्र घडवण्यामध्ये जेवढा वाटा सरकारचा तेवढाच वाटा सेवाभावी संस्थांचासुद्धा आहे. ही संस्था शिक्षण, रोजगार, उद्योग यासाठी पाठबळ देत आहे. ओबीसी बांधवांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे, यासाठी उद्योग करायचा आहे. त्यांचा व्याज परतावा सरकार भरेल, असा निर्णय घेतला आहे. शासनाची ७२ पैकी ५२ वसतिगृहे याच महिन्यात चालू होत आहेत. परळच्या वास्तूला जो निधी पाहिजे, तोदेखील दिला जाईल.

ओबीसी बांधवांसाठी दहा लाख घरे बांधण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मराठा समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तालुका तेथे कुणबी भवन बांधण्यात येणार आहे, असेही यावेळी श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

कुणबी समाजोन्नती संघ या आपल्या मातृसंस्थेला १०३ वर्षे पूर्ण झाली असून संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. शतक महोत्सवानंतर प्रथमच समाजाच्या शिरपेचात आपल्या विद्यार्थ्यांसाठी व आपल्या सगळ्यांच्या अभिमानाचे एक भव्य दिव्य वसतिगृह उभारण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून मुंबई शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांचा राहण्याचा प्रश्न मिटला आहे. राहण्याची सोय नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये शिक्षण घेता येत नव्हते. अनेक अडचणीवर मात करून हे वसतिगृह उभे राहिले आहे, असे यावेळी कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष भूषण बरे यांनी सांगितले.

मुलुंड (पूर्व) येथे हे वसतिगृह बांधण्यात आले असून तळ मजला पार्किंग, पहिला मजला देखभाल खर्चासाठी भाडे तत्त्वावर देण्यासाठी गाळे आहेत. दुसरा मजला कुणबी समाजोन्नती संघाचे कार्यालय आणि उपाहारगृ आहे. तिसऱ्या मजल्यावर प्रशस्त हॉल तर चौथ्या ते सहाव्या मजल्यावर एक वेळी १५० विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था आहे.

या सोहळ्यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर तसेच मुंबईतून कुणबी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकारिणी सदस्य, प्रतिनिधी मंडळ सदस्य, सर्व तालुका विभागीय शाखा पदाधिकारी कुणबी युवा मंडळ, महिला मंडळ, राजकीय संघटन समिती, बळीराज सेना पदाधिकारी यांनी खूप परिश्रम घेतले. मुलुंड येथील छत्रपती संभाजी मैदानावर जनसागर लोटला होता.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply