आंबव कॉलेजच्या सॅनिटरी पॅड पुनर्वापर प्रकल्पाचा गौरव

देवरूख : पंजाब येथे झालेल्या स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन २०२३ स्पर्धेत आंबव (ता. संगमेश्वर) येथील राजेंद्र माने इंजिनिअरिंग कॉलेजने सादर केलेल्या सॅनिटरी पॅड पुनर्वापर प्रकल्पाचा गौरव करण्यात आला.

विविध क्षेत्रातील विकास आणि उद्योजकता किंवा दैनंदिन जीवनातील समस्यांना यशस्वीपणे तोंड देता यावे, यासाठी देशपातळीवर प्रयत्न चालू असतात. त्याचाच एक भाग म्हणून या समस्यांचे निराकरण करता येईल अशा नवीन संकल्पना व तंत्रज्ञान यांचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारचे शिक्षण मंत्रालय आणि एआयसीटीइ यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन स्पर्धा दरवर्षी घेतली जाते. या स्पर्धेतच आंबव कॉलेजचा गौरव झाला.

स्पर्धेसाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विविध विषय दिले जातात. त्यातून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला, ज्ञानाला वाव मिळावा, त्यातून देशातील विविध समस्यांवरील नवीन उपाय मिळावेत, हा स्पर्धेचा मुख्य हेतू असतो. यावर्षी स्मार्ट व्हेईकल, अक्षय ऊर्जा, स्पेस टेक्नॉलॉजी, आरोग्यसेवा, दळणवळण, मानवनिर्मित कचरा विल्हेवाट इत्यादी विषय देण्यात आले होते. जालंधर (पंजाब) येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये २८५ गट पहिल्या फेरीसाठी निवडले गेले. त्यामधून ५ गटांची दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली. आंबव महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर विभागातील विद्यार्थ्यांच्या गटाची त्यामध्ये निवड झाली. या गटाने स्पर्धेमध्ये सॅनिटरी पॅड मटेरिअल रिसायकलिंग करण्यासंबंधीची कल्पना मांडली. अंतिम फेरीमध्ये तद्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रोजेक्ट मॉडेल बनवून त्याची नावीन्यपूर्ण प्रणाली सादर केली. या प्रकल्पासाठी महाविद्यालयाच्या टीमला रनर अप घोषित करण्यात आले आणि मान्यवरांच्या हस्ते करंडक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर विभागातील सुजल सावर्डेकर, सुबोध मुनेश्वर, सिद्धेश गुरव, सुयश पवार, सिद्धी साळवी आणि प्रांजल सावंत या विद्यार्थ्यांचा या गटात समावेश होता. महाविद्यालयाचे प्रा. आशीष सुवारे श्रेयस डोंगरे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक व माजी राज्यमंत्री रवींद्र माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत तसेच महाविद्यालयाच्या सर्व विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक यांनी विजेत्या गटाचे अभिनंदन केले.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply