चिपळूण : नीला विवेक नातू यांच्या ‘आनंदीबाई रघुनाथराव’ कादंबरीमुळे `मळण` कन्येला शांतपणे श्वास घेता येईल, अशी खात्री पुष्करसिंह पेशवे यांनी व्यक्त केली.

चिपळूण लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित केलेल्या ‘आनंदीबाई रघुनाथराव’ ऐतिहासिक कादंबरीच्या प्रकाशन कार्यक्रमात श्री. पेशवे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या प्रा. सौ. आदितीदेवी पेशवे-अत्रे, इतिहासतज्ज्ञ महेश तेंडुलकर, ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहासाचे व्यासंगी प्रकाश देशपांडे, दिलीपराज प्रकाशनचे संचालक मधुर बर्वे, लेखिका सौ. नीला विवेक नातू, लोकमान्य वाचनालयाचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे, लेखिका सौ. संध्या साठे-जोशी उपस्थित होत्या.
श्री. पेशवे पुढे म्हणाले, ‘आनंदीबाई रघुनाथराव’ ही इतिहासात आनंदीबाई यांच्यावरील ‘ध’ चा ‘मा’ केल्यासंदर्भातील भयंकर आरोप पुसायला सुरुवात करणारी कादंबरी आहे. या कादंबरीद्वारे आनंदीबाई यांचा खरा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे. या कादंबरीमुळे आम्हाला कोकणातील मळण, शृंगारतळी गावे कळली. नीला नातू यांनी अतिशय अवघड विषयावर लेखन केले आहे. आनंदीबाई हे गूढ व्यक्तिमत्त्व होते. पेशव्यांबाबत खूप वेगवेगळे लिहिले गेले आहे. रघुनाथराव तापट स्वभावाचे असले तरी अटकेपार जाऊन आलेले ते एकमेव कर्तबगार योद्धे होते. त्यांच्यासोबत संसार करणे आनंदीबाई यांच्यासाठी निश्चित सोपे नव्हते. आनंदीबाई यांना लिहिता वाचता येत होते, मोडी लिपी येत होती. नारायणरावांच्या प्रकरणासंदर्भात आनंदीबाई यांच्याविषयी आजही समाजमाध्यमांवर दुर्दैवी लेखन केलेले दिसते, असेही ते म्हणाले.
वास्तवतेच्या जवळ जात ‘ध’चा ‘मा’ संदर्भातील गैरसमज दूर करणारी, आनंदीबाई यांची अंधारी बाजू समोर आणणारी कादंबरी, अशा शब्दांत इतिहासतज्ज्ञ महेश तेंडुलकर यांनी, कादंबरीचा गौरव केला. हा विषय सोपा नव्हता. जिची प्रतिमा इतिहासात डागाळलेली आहे, तिच्यावर लिहिणे सोपे नव्हते. ते एक आव्हान होते. ते नीला नातू यांनी समर्थपणे पेलल्याचे कादंबरी वाचल्यावर लक्षात येते. कादंबरीची भाषा उत्तम आहे. व्यक्तिमत्त्व कोकणातील असल्याने कोकणातील काही शब्द येतात. स्वतःची कुचंबणा होत असताना आनंदीबाई यांनी कुठेही हार न मानता विलक्षण पद्धतीने मार्ग शोधला होता. इतिहास हा पुराव्यानिशी लिहावा लागतो आणि नारायणरावांच्या खुनामागे आनंदीबाई होत्या असा एकही पुरावा नाही, असेही तेंडुलकर यांनी स्पष्ट केले.

लेखिका नीला नातू यांनी अत्यंत ओघवत्या भाषेत आपले अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले. ‘आनंदीबाई रघुनाथराव’ हा विषय सुचवल्याबद्दल त्यांनी इतिहासाचे व्यासंगी प्रकाश देशपांडे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. हे पुस्तक लिहिताना गुहागर तालुक्यातील मळण गाव पाहिले. तेथील वाड्याचा चौथरा पाहिला. गावात बांधलेले तळे पाहिले. तेथे त्या सालंकृत व्हायच्या. हे तळे उत्तम असून स्थापत्यशास्त्रानुसार आवर्जून बघण्यासारखे आहे.
लॉकडाऊन काळात अभ्यासासाठी वेळ मिळाल्याचे सांगून नातू यांनी रामशास्त्री प्रभुणे यांच्या आनंदीबाई प्रकरणातील, ‘सांप्रतकाळी स्त्रियांना विशेष शिक्षेची तरतूद नाही. सबब करणाऱ्यांनी आनंदीबाईंचं नाव पुढे करून आपल्या माना सोडवून घेतल्या आहेत’ या प्रसिद्ध वाक्याचा पुनरुच्चार केला आणि यामागील सारा इतिहास कादंबरीत लिहिल्याचे सांगितले. अटकेपार झेंडा रोवणाऱ्या रघुनाथरावांना कर्तृत्वानुसार, पेशवेपद मिळावे असे वाटणे गैर नव्हते, मात्र त्यासाठी त्यांनी पत्करलेला मार्ग गैर होता, असे निरीक्षण नातू यांनी नोंदवले. नारायणरावांचे बारसे, मुंज रघुनाथरावांनी केली होती. इतके प्रेम असताना पराकोटीचा द्वेष कसा निर्माण झाला असेल? यामागे सत्तेची लालसा हे इतकेच कारण नसल्याचे मत नातू यांनी मांडले.
वाचनालयाच्या आप्पासाहेब जाधव अपरान्त संशोधन केंद्रातर्फे मळण (शृंगारतळी) गावी आनंदीबाई पेशवे यांचे अभ्यास-संशोधन स्मारक होण्यासाठी प्रकाश देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले जातील, असे वाचनालयाचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी प्रास्ताविकातून जाहीर केले.

कादंबरीच्या निमित्ताने साक्षात जणू आनंदीबाई यांचे व्यासपीठावर अनोख्या पद्धतीने ‘शिंगतुतारी’च्या निनादात पालखीतून व्यासपीठावर आगमन झाले. पालखी व्यासपीठावर आल्यावर मान्यवरांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन झाले.
लेखिका संध्या साठे-जोशी यांनी लेखिका नीला विवेक नातू यांचा परिचय करून दिला. पुष्करसिंह पेशवे आणि सौ. आदितीदेवी पेशवे-अत्रे यांनी पेशवे कुटुंबीयांच्या वतीने लेखिका उभयतांचा सत्कार केला. दिलीपराज प्रकाशनचे संचालक मधुर बर्वे यांनी या प्रकाशनामागील प्रकाशकीय भूमिका मांडली. धीरज वाटेकर यांनी सूत्रसंचालन केले. मनीषा दामले यांनी आभार मानले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

