रत्नागिरी : भाजपच्या गाव चलो अभियानाला रविवारपासून (दि. ४ फेब्रुवारी) प्रारंभ होणार असून अभियानाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कार्याची यशोगाथा गावागावात पोहोचवणार असल्याची माहिती सचिन वहाळकर अभियानाचे जिल्हा संयोजक सचिन वहाळकर यांनी दिली.
भाजपच्या रत्नागिरी जिल्हा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने देशात सर्वच क्षेत्रात प्रचंड गतीने विकास केला असून गरीब कल्याण, महिल सशक्तीकरण, देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा अनेक क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आंतरराष्ट्रीय पातळीवरही देशाचे नाव उंचावले आहे. मोदी सरकारला भाजपाशासित अनेक राज्य सरकारांनीही चांगली साथ देत आपापल्या राज्यात मोठा विकास करून घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकारांची यशोगाथा तळागाळापर्यंत पोहोचवली पाहिजे, याकरिता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली गाव चलो अभियान ४ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही हे अभियान दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये राबविण्यात येणार आहे.
ते पुढे म्हणाले की, या अभियानाच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून अनेक विकासाच्या योजना सर्वच गावात पोहोचल्या आहेत, त्याची यशोगाथा पोहोचवण्यात येणार असून छोट्या छोट्या वाड्यांतूनही कार्यकर्ता पाठविला जाणार असून त्यांच्यामार्फत बूथसमिती बैठक, जनसंघापासून काम करण्यार्या तसेच भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या भेटी घेणे, शाळेत जाऊन शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांचीही भेटी घेणे, युवकांच्या भेटी, तसेच शेतकरी, व्यावसायिक यांच्या समूह बैठका घेणे, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, बचतगटांच्या प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, आशासेविका, पोस्टमन, तलाठी यांसारख्या स्थानिक कर्मचार्यांची भेट घेणे इत्यादी अनेक कार्यक्रम होणार आहेत. ११ फेब्रुवारी हा पंडित दिनदयाळ उपाध्याय यांचा स्मृतिदिन असून त्यानिमित्ताने हे अभियान त्यांच्या स्मृतीला समर्पित केले आहे.
पत्रकार परिषदेला दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश केळकर, शहर सरचिटणीस मंदार खंडकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख उमेश कुळकर्णी उपस्थित होते.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

