उष्माघात आणि करावयाची उपाययोजना

सिंधुदुर्गनगरी : सर्वसाधारणे प्रामुख्याने प्रत्येक वर्षी एप्रिल, मे, जून या महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो. वातावरणात प्रचंड बदल झाला आहे. उष्णतेचे चटके बसू लागले आहेत. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे.

उष्माघातामुळे मृत्यूही येऊ शकतो. विदर्भ, मराठवाडा या विभागात उष्माघात प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळून येतो. त्यामानाने इतरत्र प्रमाण अगदीच अल्प असते. मात्र तरीही उष्माघाताचा दुष्परिणाम होऊ नये, यासाठी आपण जागरूक राहिले पाहिजे, असे आवाहनही डॉ. धुरी यांनी केले आहे.

डॉ. धुरी यांनी दिलेली माहिती अशी –

अतिजोखमीचे घटक :
१) ६५ वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती.
२) एक वर्षाखालील आणि एक ते 5 वयोगटातील मुले.
३) गरोदर माता
४) मधुमेह आणि हृदयविकार असलेल्या तसेच मद्यपान करणाऱ्या व्यक्ती
५) अतिउष्ण वातावरणामध्ये काम करण्याऱ्या व्यक्ती

उष्माघात होण्याची कारणे :
१) उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे.
२) कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे.
३) जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे
४) घट्ट कपड्यांचा वापर करणे,अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.

लक्षणे :
१) थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे.
२) भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, पोटऱ्यात वेदना येणे अथवा पेटके येणे.
३) रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी व अस्वस्थता, बेशुध्दावस्था इत्यादी.

प्रतिबंधात्मक उपाय :
१) वाढत्या तापमानात फारवेळ कष्टाची कामे करणे टाळावे.
२) कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत.
३) उष्णता शोषून घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे) वापरु नयेत. सैल, पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत.
४) जलसंजीवनीचा वापर करावा, भरपूर पाणी प्यावे.
५) सरबत प्यावे.
६) अधूनमधून उन्हामध्ये काम करणे थांबवावे व सावलीत विश्रांती घ्यावी.
७) उष्माघाताची लक्षणे सुरू होताच ताबडतोब उन्हात काम करणे थांबवावे व उपचार सुरू करावा.
८) उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरण यांचा वापर करावा.

उपचार :
पुरेशी काळजी घेऊनही उष्माघाताचा त्रास झालाच, तर खालीलप्रमाणे उपचार करावेत.
१) रुग्णास वातानुकूलित खोलीत ठेवावे अथवा हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत.
२) रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.
३) रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी.
४) रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आइस पॅक लावावेत.
५) आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला घ्यावा. डॉक्टर सलाइन देतील.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply