रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला २०२३-२४ या आर्थिक वर्षात पतसंस्थेला सात कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, असे स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.
प्रतिवर्षी आर्थिक वर्षअखेरीच्या दिवशी आपली आर्थिक आकडेवारी घोषित करण्याचा स्वरूपानंद पतसंस्थेचा शिरस्ता आहे. त्याला अनुसरून आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, संस्थेची सातत्यपूर्ण वृद्धिंगत होणारी आकडेवारी जाहीर करताना खूप अभिमान वाटतो. कारण याही आर्थिक वर्षअखेरीला संस्थेने सातत्यपूर्ण आर्थिक वाढ केली असून २८ टक्के इतके विक्रमी भांडवल पर्याप्तता (सीआरएआर) प्रमाण राखले आहे. पतसंस्थेची वसुली ९९.५३ टक्के एवढी विक्रमी असून ० टक्के एनपीए राखत ९ शाखांची वसुली १०० टक्के करण्यात यश संपादन केले आहे. संस्थेचा ग्रॉस एनपीएही ०.८३ टक्के इतका नगण्य ठेवण्यात संस्था यशस्वी झाली आहे.
ॲड. पटवर्धन म्हणाले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत मार्च २०२४ अखेर संस्थेच्या ठेवीत १६.५० टक्क्यांची वाढ होऊन संस्थेच्या ठेवी ३०८ कोटी ८० लाख झाल्या आहेत. कर्जवितरणात १८.१८ टक्क्यांची वाढ झाली असून येणे कर्जे २१५ कोटी ११ लाख आहेत. संस्थेच्या गुंतवणुका १४५ कोटींच्या झाल्या असून संस्थेचे खेळते भांडवल ३७० कोटी झाले आहे. संस्थेचा स्वनिधी ४३ कोटींचा झाला असून संस्थेची मजबूत आर्थिक ताकद दर्शक निधी म्हणून याकडे पाहिले जाते. स्वरूपानंद पतसंस्थेचा संमिश्र व्यवसायही ५२३ कोटी झाला आहे. संस्थेची गंगाजळी १३ कोटी ४५ लाख असून इमारत निधी २१ कोटींचा आहे.
श्री. पटवर्धन म्हणाले, पतसंस्थेने आपल्या व्यवहारात सातत्य राखले आहे. सर्व व्यवहार, धोरणे योजनाबद्ध पद्धतीने राबवली आहेत. व्यवस्थापन खर्चाचे खेळत्या भांडवलाशी प्रमाण १.७५ टक्के असे पूर्ण नियंत्रणात राखले असून खेळत्या भांडवलाशी नफ्याचे प्रमाण १.९० टक्के असे लक्षणीय आहे. आपले खर्च पूर्ण नियंत्रित ठेवत संस्थेने ठेवींवरील व्याज अदा करण्यासाठी १९ कोटी ५४ लाख खर्च केले असून वेतनावर ३ कोटी १५ लाख तर एजंट कमिशनपोटी पिग्मी एजंटना ५९ लाख ५६ हजार खर्च केले आहेत. कर्जावरील व्याजापोटी २३ कोटी २० लाख, तर गुंतवणुकांमधून ९ कोटी ३ लाख रुपये तसेच १ कोटी इतर उत्पन्न मिळून ३३ कोटी २३ लाखाचे उत्पन्न मिळविले आहे. या सर्व व्यवहारातून ७ कोटी ३ लाख इतका निव्वळ नफा झाला आहे. स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने आपले सर्व निधी योग्य पद्धतीने व्यवहारात फिरते ठेवल्याने आणि योजनाबद्ध व्यवहार केल्याने उत्तम नफा संस्थेला प्राप्त झाला आहे, असे ॲड. पटवर्धन यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, केवळ ३०० सभासदांनी स्थापन केलेल्या संस्थेची सभासद संख्या आता ४४ हजार ८८९ इतकी विशाल झाली असून त्यांच्या भक्कम पाठिंब्यावर स्वरूपानंद पतसंस्थेचे अर्थविश्व खंबीरपणे मार्गक्रमण करत आहे. पतसंस्थेचे २० हजार ७४६ कर्जदार, तर १९ हजार ५०० ठेव खाती अशी ढोबळ मानाने आकडेवारी आहे.
सहकार खात्याने लागू केले किमान ९ टक्के प्रमाण ठेवणे अनिवार्य असताना. संस्थेचा सीआरएआर तब्बल २८ टक्के इतका लक्षणीय असून संस्थेची आर्थिक भक्कम स्थिती या माध्यमातून दिसून येते. पतसंस्थेच्या सर्व सभासदांनी उत्तम सहकार्य केले. कर्जदारांनी कर्जाची नियमित परतफेड केली. ठेवीदारांनी वेळोवेळी ठेवी ठेवून आपला सहभाग नोंदवला आहे. एक विश्वासार्ह संस्था म्हणून प्राप्त केलेला लौकिक संस्थेने अबाधित राखला याचे समाधान लाख मोलाचे आहे, असेही ॲड. पटवर्धन म्हणाले.
नवीन आर्थिक वर्षात ४०० कोटींच्या ठेवी आणि ३०० कोटींचे कर्जवितरण तसेच नव्या ५ शाखा असा संस्थेचे नियोजन असून नवीन आर्थिक वर्षात अधिक द्रुतगतीने पुढे जाण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे, असेही पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

