बुधवारी रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता

रत्नागिरी : मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार उद्या बुधवारी, दि. १७ एप्रिल रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट उद्भवण्याची शक्यता आहे.

या सूचनेच्या अनुषंगाने नागरिकांनी उष्म्याच्या लाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे.

उद्या पुरेसे पाणी प्यावे. तहान लागली नसली तरीही, दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्यावे. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा. दुपारी बारा ते तीन वाजण्याच्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करावा. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करावा. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करावा. अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात.

पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे. पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करावा. बाहेर कामकाज करीत असल्यास मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करावा. गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी.

उन्हात अतिकष्टाची कामे करू नयेत. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नयेत. दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ न.. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे. मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply