परशुराम येथे ९-१० नोव्हेंबरला संस्कृतभारतीचे प्रांतसंमेलन

चिपळूण : संस्कृतभारतीच्या कोकण प्रांताचे संमेलन यावर्षी येत्या ९ आणि नोव्हेंबर २०२४ रोजी श्री चिपळूण तालुक्यातील क्षेत्र परशुराम येथे आयोजित करण्यात आले आहे.

परशुराम येथील एस.पी.एम. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये भरणार असलेल्या या संमेलनात मुंबई ते गोवा या कोकण प्रांतातील संस्कृतशिक्षक, संस्कृतभाषेची सेवा करणारे सुमारे ३०० कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूल आणि श्री भार्गवराम परशुराम न्यासाच्या सहयोगातून हे संमेलन आयोजित होणार आहे.

संस्कृतभारती ही संस्कृत भाषेसाठी शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी एक विश्वव्यापी संस्था आहे. संस्कृत भाषा जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे व भारतीय संस्कृतीचे जतन करणे या उदात्त हेतूने संस्कृतभारती काम करते. दर तीन वर्षांनी होणारे प्रांतसंमेलन म्हणजे संस्कृतभारतीच्या कार्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. त्यानिमित्ताने मुंबई ते गोवा या कोकणपट्ट्यातील संस्कृतशिक्षक, संस्कृतभाषेची सेवा करणारे कार्यकर्ते एकत्र येतात.

परशुराम येथील संमेलनामध्ये विज्ञानप्रदर्शिनी, वस्तुप्रदर्शिनी, भारतीय ज्ञानप्रदर्शिनी, अर्थशास्त्रप्रदर्शिनी अशा वैविध्यपूर्ण गोष्टींसोबतच उद्बोधक सत्रे व सांस्कृतिक कार्यक्रमदेखील होणार आहेत. कार्यकर्ता विकास, संस्कृतमधील प्रेरक कथा, इत्यादी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. चिपळूण येथील प्रसिद्ध प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या हस्ते या प्रदर्शिनीचे उद्घाटन होणार आहे.

संस्कृत भाषा ही भारतीय संस्कृतीची वाहिका आहे. भारतीय संस्कार या भाषेच्या अध्ययनाने सहजपणे समाजात रुजतात. संस्कारयुक्त कुटुंब हा समाजाचा कणा आहे. या संमेलनाच्या निमित्ताने कर्नाटक राज्यातील उच्च शिक्षण विभागाचे निवृत्त संचालक प्रा. टी. एन. प्रभाकर यांचे ‘कुटुंबप्रबोधन’ या विषयावर विशेष उद्बोधन या संमेलनात होणार आहे.

संमेलनात ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:४५ ते ९:०० या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमात चिपळूण येथील स्थानिक कलाकार संस्कृत गीते सादर करणार आहेत. त्यामध्ये संस्कृत स्तोत्रे, अनुवादित गीते, राष्ट्रभक्तीपर गीते व बालगीतांचा समावेश आहे.

संमेलनासाठी चिपळूण येथील अग्रगण्य व्यक्तींनी पुढे येत हे संमेलन यशस्वी करण्यासाठी स्वागत समितीत सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. श्रीभार्गवराम, परशुराम संस्थान चे अध्यक्ष अॅड. जीवन रेळेकर स्वागत समितीचे अध्यक्ष आहेत, तर परशुराम न्यासाचे कार्यकारिणी सदस्य व उद्योजक प्रशांत पटवर्धन उपाध्यक्ष आहेत. डी. बी. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. माधव बापट उद्घाटन करणार आहेत. रा. स्व. संघ उत्तर रत्नागिरीचे संघचालक सतीश तथा भाई टोपरे, चिपळूण नाट्य परिषदेचे कार्यालय प्रमुख प्रसाद कार्ले, ज्येष्ठ संस्कृत शिक्षिका सौ. शीला केतकर, विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल, शिरळ प्रकल्प समिती सहकार्यवाह डॉ. अश्विनी तेजानंद गणपत्ये, चिपळूण येथील प्रसिद्ध प्रवचनकार धनंजय चितळे, आय. एम. एस. सी. सी. आर.च्या समन्वयक सौ. अर्चना बक्षी या सर्व प्रतिष्ठित व्यक्ती स्वागत समिती सदस्य आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply