देवरूख : येथील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयाचे माजी ग्रंथपाल स्व. लक्ष्मण वामन साने यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या सातव्या खुल्या लेख स्पर्धेत मोहन अत्रे आणि वैष्णवी मोहिते यांनी वेगवेगळ्या विषयांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
यावर्षी स्पर्धेसाठी ‘धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव ….अपेक्षा आणि वास्तव तसेच ‘दिसामाजी काहीतरी लिहावे प्रसंगी अखंडित वाचीत जावे’ हे दोन विषय देण्यात आले होते. त्यापैकी धर्मनिरपेक्षतेविषयी २४, तर दिसामाजी या विषयासाठी ३४ लेख चिपळूण, कल्याण, गुहागर, रायगड, ठाणे, हिंगोली, रत्नागिरी, देवरूख, कोल्हापूर, लांजा, डोंबिवली, लातूर, पुणे, साखरपा, भिवंडी, वाघोली, राजापूर, जालना, अहमदनगर, बुलढाणा, बारामती सांगली आणि इंदूर (मध्य प्रदेश) येथून आले. पहिल्या विषयाकरिता आलेल्या लेखांमधून मोहन दिगंबर अत्रे ( भिवंडी) यांनी प्रथम, सौ. श्रद्धा गजानन वझे (कल्याण) यांनी द्वितीय, तर श्रेयस विजय कासार ( सती-चिपळूण) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. रवींद्र भालचंद्र भागवत (कल्याण), सौ. अनुराधा भागवत (इंदूर, मध्य प्रदेश) आणि सौ स्वानंदी स्वरूप जोगळेकर (साखरपा) यांची उत्तेजनार्थ निवड करण्यात आली.
दिसामाजी काहीतरी लिहावे प्रसंगी अखंडित वाचीत जावे या विषयावरील लेखांमधील पहिले तीन विजेते असे – सौ. वैष्णवी विजय मोहिते (साडवली, देवरूख), सौ. मनीषा अमोल शेणाई (कोल्हापूर), सौ. मंजूश्री संजय भागवत (देवरूख). अपर्णा अरविंद जोग (पिंपळी-चिपळूण), पराग गजानन लघाटे (चिपळूण) आणि प्रफुल अनंत साने (डोंबिवली) यांची उत्तेजनार्थ निवड करण्यात आली.
लेखांचे परीक्षण रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे इतिहासविभाग प्रमुख प्रा. डॉ. पंकज घाटे आणि प्रा. डॉ. सौ. विष्णुप्रिया आठल्ये यांनी केले.
वाचनालयाचे अध्यक्ष गजानन केशव जोशी आणि कार्यकारी मंडळ तसेच कर्मचाऱ्यांनी सर्व विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण लवकरच होणार आहे. सर्व स्पर्धकांनी समारंभाला उपस्थित राहून पारितोषिकाचा/सहभाग प्रमाणपत्राचा स्वीकार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

