Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

खल्वायन मासिक संगीत सभेत शनिवारी आसामच्या गायिकेचे गायन

Advertisements

रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेची ३०७ वी मासिक संगीत सभा शनिवारी, दि. ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत होणार असून त्यामध्ये रसिकांना आसाममधील गायिकेच्या गायनाचा आस्वाद घेता येणार आहे.

नेहमीप्रमाणे ही मैफल सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात होणार असून संजय मुळ्ये स्मृती मासिक संगीत सभा म्हणून ती साजरी होणार आहे. मैफलीमध्ये मूळच्या आसामच्या आणि सध्या मुंबईत वास्तव्यास असलेल्या गायिका श्रुती बुजरबरुवा यांच्या शास्त्रीय ख्याल गायनाबरोबरच ठुमरी, दादरा, गझल, अभंग आणि नाट्यसंगीत गायन होणार आहे.

श्रुती यांना वयाच्या चौथ्या वर्षापासून आई-वडील सौ. संगीता आणि श्री. मुनींद्र बुजरबरुवा यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे मार्गदर्शन मिळाले. पुढे त्यांनी लखनौच्या भातखंडे संगीत विद्यापीठातून संगीत विशारद आणि संगीत अलंकार या पदव्या प्राप्त केल्या. त्या २०१४ मध्ये पुणे येथे राहायला आल्यानंतर त्यांनी प्रसिद्ध गुरू पंडित विजय कोपरकर यांच्याकडून काही वर्षे शास्त्रीय गायनाचे मार्गदर्शन घेतले. दरम्यान त्यांनी एसएनडीटी विद्यापीठातून मास्टर इन म्युझिक ही पदवी प्राप्त केली. तसेच एसएनडीटी विद्यापीठातूनच २०१९ साली बी. ए. (म्युझिक) ही पदवी त्यांनी सर्वोत्तम गुण आणि गोल्ड मेडलसहित प्राप्त केली. सध्या त्यांचे वास्तव्य ठाण्यात असून त्या जयपूर अत्रौली घराण्याच्या प्रसिद्ध गायिका आणि गुरू विदुषी प्रतिमा टिळक यांच्याकडून पुढील शास्त्रीय संगीताचे मार्गदर्शन घेत आहेत. कोलकाता, मिरज, दिल्ली, अहमदाबाद, ओरिसा, वाराणसी, पुणे, मुंबई इत्यादी ठिकाणच्या नामवंत संगीत महोत्सवात त्यांचे गायनाचे कार्यक्रम झाले आहेत. इंटरनॅशनल फाउंडेशन, एनसीपीए आणि भारत सरकारची शास्त्रीय संगीतासाठी शिष्यवृत्ती त्यांना प्राप्त आहे. विजया घाटे स्मृती आणि पंडिता रोहिणी भाटे स्मृती पुरस्काराने त्या सन्मानित आहेत.

त्यांच्या रत्नागिरीतील कार्यक्रमाला तबला साथ हेरंब जोगळेकर व हार्मोनियम साथ चैतन्य पटवर्धन हे रत्नागिरीचे नामवंत वादक करणार आहेत.

सर्व संगीत रसिकांनी मैफलीला उपस्थित राहून श्रवणाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मनोहर जोशी आणि सहकाऱ्यांनी केले आहे.त्यांना विनाशुल्क असून मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन खल्वायनचे अध्यक्ष मनोहर जोशी आणि त्यांचे सहकारी यांनी केले आहे.
खल्वायनच्या पुढील ३०७ व्या मासिक संगीत सभेत शनिवारी, दि. ९ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध गायिका श्रृती बुजरबरुआ यांचे गायन होणार आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version