चिपळूण : ग्रंथालयांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी, दि. २५ नोव्हेंबर रोजी चिपळूण येथे ग्रंथालय मित्र मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
ग्रंथव्यवहार नवनवीन तंत्रसुविधांमुळे अडचणीत आहे. त्याचा परिणाम ग्रंथालयांवर होत आहे. ग्रंथालयांचा लोकाश्रय कमी होत आहे. या परिस्थितीत काय करावे, ग्रंथालयांना काही नवे रूप धारण करता येईल का, अशा विविध अंगांनी उपाययोजनेचा विचार करण्याकरिता सोमवारी, दि. २५ नोव्हेंबर रोजी येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत ‘ग्रंथालय मित्र’ मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मेळाव्याचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते होणार आहे. ‘ग्रंथालये सांस्कृतिक केंद्रे होऊ शकतील?’ या संवादसत्राची सुरुवात, ठाण्याचे उद्योजक, लेखक व ग्रंथप्रेमी गिरीश घाटे यांच्या निवेदनाने होईल. नंतर चर्चा उपस्थितांना खुली असेल. अध्यक्षस्थानी डॉ. यतीन जाधव (अध्यक्ष, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर) असतील. चर्चा वेगवेगळ्या सत्रांमध्ये होईल. समारोप डॉ. माधव बापट (प्राचार्य, दातार, बेहेरे, जोशी महाविद्यालय, चिपळूण) करतील. व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन आणि थिंक महाराष्ट्र पोर्टलचे संस्थापक आणि ज्येष्ठ पत्रकार लेखक दिनकर गांगल या संपूर्ण कार्यक्रमात उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
याच तऱ्हेचे मेळावे येत्या काही महिन्यांत दक्षिण कोकण, गोवा, मराठवाडा, खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या भागांत घेण्याचे नियोजन आहे. चिपळूणला होणाऱ्या दिवसभराच्या या चर्चासत्रात ग्रंथप्रेमी आणि वाचकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रकाश देशपांडे, विनायक ओक (लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर चिपळूण) आणि सुधीर बडे (प्रवर्तक, गावोगावी ग्रंथालय मित्र मंडळे मोहीम, ठाणे) यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9423831668 या क्रमांकावर संपर्क साधावा.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

