रत्नागिरी जिल्ह्यात पाचपैकी चार जागांवर महायुतीचा विजय

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांमध्ये महायुतीचा विजय झाला आहे. रत्नागिरीत उदय सामंत, राजापूरमध्ये त्यांचे बंधू किरण सामंत आणि दापोलीत योगेश कदम हे शिवसेनेतर्फे विजयी झाले. चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम जिंकले. फक्त गुहागरची जागा भास्कर जाधव यांच्या रूपाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला म्हणजे महाविकास आघाडीला मिळाली आहे.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार उदय रवींद्र सामंत ४१,५९० मतांनी विजयी झाले. सामंत यांना एक लाख ११ हजार ३३५ मतं मिळाली. सामंत या विधानसभा मतदारसंघातून सलग पाचव्यांदा विजयी झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे उभे राहिलेले सुरेंद्र तथा बाळ माने यांना ६९ हजार ७४५ मतं मिळाली. जागावाटपात रत्नागिरी मतदारसंघ भाजपला न मिळाल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते बाळ माने यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे योगेश कदम २४ हजार ९३ मतांच्या आघाडीसह विजयी झाले आहेत. त्यांना एक लाख पाच हजार सात मतं मिळाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय कदम ८० हजार ९१४ मतं मिळाली. योगेश कदम सलग दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. मनसेच्या संतोष अबगुल यांना तिसऱ्या क्रमांकाची ४९६० मतं मिळाली.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव दोन हजार ८३० मतांच्या आघाडीसह विजयी झाले आहेत. त्यांना ७१ हजार २४१ मतं मिळाली. शिवसेना पक्षाचे राजेश बेंडल यांना ६८ हजार ४११ मतं मिळाली. भास्कर जाधव सलग चौथ्यांदा आमदार झाले आहेत. मनसेच्या प्रमोद गांधी यांना तिसऱ्या क्रमांकाची ६७१२ मतं मिळाली.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे उभे राहिलेले किरण सामंत १९ हजार ६७७ मतांच्या आघाडीसह विजयी झाले आहेत. त्यांना ८० हजार २५६ मतं मिळाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन साळवी यांना ६० हजार ५७९ मतं मिळाली. किरण सामंत हे उदय सामंत यांचे बंधू असून, ते पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. सलग तीन वेळचे आमदार असलेल्या राजन साळवी यांचा त्यांनी पराभव केला आहे. काँग्रेसला जागा मिळाली नाही म्हणून नाराज होऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले अविनाश लाड यांना तिसऱ्या क्रमांकाची ७९४५ मतं मिळाली.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेखर गोविंदराव निकम सहा हजार ८६७ मतांच्या आघाडीसह विजयी झाले आहेत. त्यांना ९६ हजार ५५५ मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे निवडणूक लढवत असलेले प्रशांत यादव यांना ८९ हजार ६८८ मतं मिळाली. शेखर निकम सलग दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या आणि राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या यादव यांनी निकम यांना तगडं आव्हान दिलं; मात्र अखेर निकम विजयी झाले. अपक्ष म्हणून उभ्या राहिलेल्या आणि नामसाधर्म्य असलेल्या शेखर गंगाराम निकम यांना तिसऱ्या क्रमांकाची १६१३ मतं मिळाली.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी उदय सामंत यांना विजयाचं प्रमाणपत्र दिलं.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply