रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या पुनर्बांधणीसाठी मदतीचे आवाहन

रत्नागिरी : रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या पुनर्बांधणीसाठी आर्थिक मदतीचे आवाहन अध्यक्ष अॅड. दीपक मनोहर पटवर्धन यांनी केले आहे.

रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय ही रत्नागिरीतील पुरातन संस्था आहे. ज्या शहरातले वाचनालय गजबजलेले ते शहर सुसंस्कृत म्हणून गणले जायचे. तो वसा आजही रत्नागिरीत पाळला जातो. ग्रंथसंपदेने समृद्ध असलेले हे वाचनालय आजही सुजाण वाचकांनी गजबजलेले असते. वाचन संस्कृती जपतानाच गेल्या २५ वर्षांत २५० विविध साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रम वाचनालयाने रत्नागिरीकरांसाठी आयोजित केले. एक लाख १५ हजारांची ग्रंथसंपदा संकलित करत दुर्मिळ पुस्तकांचे माहेरघर म्हणून आपली ओळख वाचनालयाने सर्वदूर पोहोचवली आहे.

हे बहुआयामी उपक्रम ज्या वास्तूमध्ये होत होते, ती वास्तू खूप जुनी झाली आहे. आतून मोडकळीस  आली आहे. त्यामुळे आता वास्तू पुन्हा बांधणे अत्यावश्यक झाले आहे. वाचनालायची जागा शासनाकडून लीज अॅग्रीमेंटने  २०४८ सालापर्यंत १ रुपया प्रति चौ.मी. दराने प्राप्त करण्यात प्रदीर्घ प्रयत्नानंतर यश प्राप्त झाले. लगेच बांधकाम परवानगीही मिळाली. त्यानुसार ११५०० चौरस फुटाचे बांधकाम करण्यासाठी नियोजन सुरू आहे.

जुनी इमारत पाडण्याचे काम सुरू झाले आहे. नवीन बांधकामाची सुरवात डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून करण्याचे नियोजन आहे. या दुमजली बांधकामासाठी ३ कोटीचे अंदाजपत्रक तयार झाले आहे. त्यापैकी १ कोटीची रक्कम आजपर्यंत जमा झाली आहे. उर्वरित २ कोटी उभे करणे आवश्यक आहे. ही रक्कम उभी करण्यासाठी विविध पर्यायांचा उपयोग केला जात आहे. त्या सर्वांतील बहुमोल पर्याय लोकसहभागाचा आहे. रत्नागिरीचे वैभव असलेल्या या वाचनालयाची उत्तम वास्तू उभी राहावी, २०२८ च्या जानेवारीमध्ये २०० वर्ष पूर्ण करताना वाचनालयाची नवी वास्तू परिपूर्णपणे उभी राहावी, यासाठी भरीव आर्थिक योगदानाची आवश्यकता आहे.

मोठ्या देणगीदारांच्या नावाचा विशेष उल्लेख असणारा कक्ष, पूर्ण मजल्याचा खर्च उचलणाऱ्या देणगीदारांच्या नावाने स्वतंत्र कक्ष उभारणे, इत्यादी पर्यायही उपलब्ध आहेत. या वास्तूसाठी सर्वांनी मदत करावी. सरस्वतीचे ग्रंथमंदिर उभे करताना सर्वच स्तरातून मदतीचा ओघ निर्माण व्हावा, अशी अपेक्षा आहे.

आपले योगदान वाचनालयाच्या बँक खात्यात आपण RTGS/ NEFT द्वारा ही जमा करता येईल.

वाचनालयाच्या खात्याचा तपशील असा –

RATNAGIRI ZILA NAGAR VACHANALAY,

RATNAGIRI DISTRICT CENTRAL CO-OP. BANK LTD. RTN. (Savings Account)

A/c no.- 1611006022828, IFS Code – IBKL0574RDC

वाचनालयाची पुढील १०० वर्षांची वाटचाल निष्कंटक बनवण्यासाठी नवीन वास्तू निर्माण आवश्यक आहे आणि या नवनिर्मितीसाठी बहुमोल आर्थिक योगदान अत्यावश्यक आहे. त्यासाठी प्रतिसाद मिळेल, असा विश्वास अॅड. पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply