रत्नागिरी : पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या जन्मोत्सवानिमित्त ‘रत्नागिरी सायकलिस्ट क्लब’ने सलग तिसऱ्या वर्षी सायकल दिंडी उत्साहात काढली. त्यामध्ये लहान मुलांनीही सहभाग घेतला.
‘सायकल चालवू या, प्रदूषण टाळू या’, ‘पर्यावरण जपू या’, ‘तंदुरुस्त राहू या’, असा संदेश या दिंडीद्वारे देण्यात दिला. यात क्लबचे सायकलस्वार सदस्य सहभागी झाले. ‘ओम राम कृष्ण हरि’ नामगजर करत ३७ कि.मी.ची ही दिंडी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली.
सकाळी ६.१५ वाजता जयस्तंभ येथून सायकल दिंडीला सुरवात झाली. पहाटे धुके, गुलाबी थंडी अशा वातावरणात या दिंडीला चांगला प्रतिसाद मिळाला. पावस, भाट्ये, फणसोप, वायंगणी, गोळप मार्गे पावस येथील स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरात सकाळी ७.३० वाजता ही दिंडी पोहोचली. स्वामींचे दर्शन घेऊन पुन्हा सायकलस्वार रत्नागिरीत ९. १५ वाजता पोहोचले.
रत्नागिरीतून गेली अनेक वर्षे जयस्तंभ ते पावस समाधी मंदिरापर्यंत पदयात्रा काढण्यात येते. या यात्रेला भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळतो. त्याच धर्तीवर रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने चार वर्षांपूर्वी सायकल दिंडी काढण्याचे योजले. त्यानुसार दरवर्षी ही दिंडी जन्मोत्सवानिमित्त काढली जाते. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने सायकलस्वारांचे स्वागत करून या उपक्रमाचे कौतुक केले. ‘प्रतिवर्षी अशी दिंडी काढावी’, असेही आवाहन त्यांनी केले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

