ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘महाभारतातील अपरिचित गोष्टी’ या लेखमालेचा हा सातवा भाग…
………….
महाभारतातील भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे नाते विलक्षण आहे. पहिल्या कथांमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे जिवलग मित्रांप्रमाणे वागताना आढळतात; पण त्यानंतर भगवान श्रीकृष्णांचे खरे स्वरूप जाणून अर्जुन त्यांच्याशी एखाद्या भक्ताप्रमाणे व्यवहार करू लागतो. श्री ज्ञानेश्वर महाराज अर्जुनासाठी ‘सख्यभक्तीची मातृका’ असा शब्दप्रयोग करतात. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला, पर्यायाने सर्वच पांडवांना वेळोवेळी सांभाळले. जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये ‘दासा साह्य नारायण, होय रक्षिता आपण’ असे म्हटले आहे. त्याचे दर्शन भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या कथांमधून होते. यातीलच काही कथा आपण पाहणार आहोत.
कौरवांच्या नामवंत सरदारांनी अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये घेरले, त्या वेळी जयद्रथाने इतर पांडव सरदारांना चक्रव्यूहाच्या तोंडाशी अडवले. पर्यायाने त्या चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू मारला गेला. आपल्या मुलाला सर्वांनी एकत्र येऊन मारले आणि आपण त्या वेळी अभिमन्यूला मदत करू शकलो नाही, याचे अर्जुनाला खूप दुःख झाले. ‘उद्या संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत मी जयद्रथाला मारीन; पण माझ्या हातून जयद्रथ मारला गेला नाही तर मी आत्मदहन करीन, अर्थात स्वतःला जाळून घेईन’ अशी प्रतिज्ञा शोकसंतप्त अर्जुनाने केली. दुसऱ्या दिवशीच्या युद्धामध्ये जयद्रथ युद्धभूमीवर आलाच नाही. त्या वेळी असणाऱ्या नियमानुसार युद्धभूमीवर नसलेल्या वीरावर हल्ला करता येत नसे. पर्यायाने सूर्यास्ताची वेळ जवळ आली; पण जयद्रथ मारला गेला नव्हता. त्या वेळी भगवान श्रीकृष्णाने आपल्या लीलेने सूर्यास्त झाल्याचे चित्र उभे केले. अर्जुनाने आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे स्वतःची चिता स्वतःच सिद्ध केली आणि तो भगवंतांच्या आज्ञेनुसार आपल्या धनुष्यबाणासह त्या चितेत अग्निप्रवेश करायला सिद्ध झाला. हे सगळं दृश्य पाहण्यासाठी कौरव-पांडव सेना तिथे एकत्र झाली होती. पांडवांमधील महापराक्रमी योद्धा कोणताही प्रयत्न न करता स्वतःला संपवत आहे, याचा कौरवांना खूप आनंद झाला होता. ह्याला मीच कारणीभूत आहे हे जाणून जयद्रथ कौरवसेनेच्या अग्रभागी डौलाने उभा राहिला. त्याला तेथे पाहताच भगवान श्रीकृष्णांनी सूर्यावरील अंधाराचे आवरण दूर केले आणि अर्जुनाला सांगितले, ‘अर्जुना, हा सूर्य हा जयद्रथ.’ अर्जुनाने धनुष्यावर बाण चढवला. त्या वेळी भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ‘अर्जुना जयद्रथाचे मस्तक जमिनीवर पडू देऊ नको. कारण, जो कोणी आपल्या मुलाचे मस्तक जमिनीवर पाडेल त्याच्या मस्तकाची शंभर शकले व्हावीत असा वर त्याच्या वडिलांनी म्हणजे वृद्धक्षत्र राजाने मागून घेतला आहे. म्हणून हे अर्जुना, जयद्रथाचे मस्तक तुझ्या बाणांनी उडवत उडवत त्याच्या वडिलांच्या मांडीवर पडेल अशी व्यवस्था कर!’ अर्जुनाने त्याप्रमाणे जयद्रथाचे मस्तक वृद्धक्षत्राच्या मांडीवर नेऊन टाकले. आपल्या मांडीवर अचानक काय पडले म्हणून दचकून वृद्धक्षत्र उभा राहिला आणि ते मस्तक जमिनीवर पडले. त्या क्षणी वृद्धक्षत्राच्या मस्तकाचे शंभर तुकडे झाले. वाचकहो, आपल्याला वरील कथेचा पहिला भाग माहीत असतो; पण पुढील भाग ज्ञात नसतो. बरोबर ना?
अर्जुन हा सरळ मनाचा आहे. तो भावनेच्या भरात टोकाची प्रतिज्ञा करतो; पण त्यात तो स्वतःलाच अडचणीत आणतो. वरील प्रसंगी भगवान श्रीकृष्ण तेथे नसते, तर काय झाले असते? कौरवांना अर्जुनाला मारणे शक्य नव्हते. ते जर झाले असते तर…
– धनंजय चितळे, ज्येष्ठ प्रवचनकार
(क्रमशः)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

