ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘महाभारतातील अपरिचित गोष्टी’ या लेखमालेचा हा सहावा भाग…
………….
आपण महाभारतादि सद्-ग्रंथ कसे वाचावेत? श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘संतांचे ग्रंथ हे आपल्या प्रिय व्यक्तीच्या पत्राप्रमाणे मन लावून वाचावेत. ग्रंथाच्या वाचनाने आपल्याला आपला दोष कळतो. आणि आपली चूक आपल्याला कळली की आपण लवकर सुधारतो. हा ग्रंथ आपल्याकरिता सांगितला आहे. तो कृतीत आणण्यासाठी आहे. ही भावना ठेवून वाचन करावे. हितकारक गोष्टी आचरणात आणल्या पाहिजेत. त्या आचरणात आणल्या नाहीत तर काय उपयोग?’
महाभारत म्हणजे केवळ कुरुकुळाचा इतिहास नाही. या ग्रंथात अनेक कथा, उपकथा आल्या आहेत. एकदा धर्मराज युधिष्ठिर आणि मार्कंडेय ऋषी यांच्या संवादात मनुष्याची कर्तव्ये आणि त्यांचे फळ यावर चर्चा सुरू होते. चर्चेदरम्यान मार्कंडेय ऋषी एक गोष्ट सांगतात. आज आपण तीच गोष्ट पाहू या.
कौशिक नावाचा एक तपस्वी, पण संतापी ब्राह्मण होता. आपल्या घरातील लोकांशी न पटल्यामुळे तो घर सोडून बाहेर पडला होता. एक दिवस रस्त्याने चालत असताना तो विश्रांतीसाठी एक झाडाखाली बसला. त्या झाडावर एक पक्षीही बसला होता. काही काळाने तो पक्षी शिटला. कर्मधर्मसंयोगाने ती विष्ठा कौशिकाच्या अंगावर पडली. त्याबरोबर कौशिकाने संतापून त्या पक्ष्याकडे पाहिले. कौशिकाच्या तपोबळामुळे तो पक्षी जळून गेला. आपले सामर्थ्य लक्षात आल्यामुळे कौशिकालाही मोठा आनंद झाला. पुढे तो एका घरासमोर भिक्षा मागण्यासाठी थांबला. त्याचे ‘ओम भवति भिक्षां देहि’ हे शब्द ऐकून घरातील स्त्रीने सांगितले, ‘जरा थांबावे. मी माझी कामे पूर्ण झाली की भिक्षा वाढते.’ कौशिक काही काळ थांबला, तरीही ती बाई बाहेर आली नाही. तेव्हा याने विचार केला, की ही बाई बाहेर आली, की तिचेही भस्म करून टाकू. इतक्यात ती बाई बाहेर आली आणि म्हणाली, ‘अरे जळून जायला मी काही पक्षी आहे का?’ आपल्या प्रवासात घडलेला प्रकार आणि आपल्या मनातील विचार या बाईला कसा कळला याचे कौशिकाला आश्चर्य वाटले.
इतक्यातच ती बाई म्हणाली, ‘मी आता घरातील ज्येष्ठांची सेवा करीत होते. म्हणून मला उशीर झाला. तुझ्या प्रवासात जे घडले ते मला कसे कळले ते तुला समजून घ्यायचे आहे ना? मग तू जनकपुरीतील धर्मव्याधाला जाऊन भेट.’ आश्चर्याचा आणखी एक धक्का पचवून तो ब्राह्मण जनकपुरीतील धर्मव्याधाला भेटण्यासाठी त्याच्या दुकानासमोर आला. धर्मव्याधाने त्याला बघितले आणि तो म्हणाला, ‘तुम्हाला पिंपळाजवळील घरातील बाईंनी पाठवले ना? बसा थोडा वेळ.’ आपण काही बोलायच्या आधीच आपल्याला कोणी पाठवले, हे धर्मव्याधाला कोणी सांगितले, असा विचार करत कौशिक दुकानासमोर बसून राहिला. धर्मव्याधाचा मांसविक्रीचा व्यवसाय होता. आपले काम पूर्ण झाल्यानंतर तो कौशिकाजवळ आला आणि म्हणाला, ‘मी काय किंवा ती बाई काय, आम्ही निरपेक्ष भावनेने कर्तव्यपालन करतो. आमच्या आई-वडिलांची सेवा करतो. त्याचेच फळ म्हणून आम्हाला कोणी काही न सांगताच त्यांच्या मनातील विचार कळतात, घडलेल्या घटना समजतात.’ तो पुढे म्हणाला, ‘कौशिका, तू घरच्यांशी भांडून, आई-वडिलांना सोडून आलास. आता परत घरी जा आणि पुत्राचे कर्तव्य पूर्ण कर.’ वाचकहो, आजच्या काळात हा उपदेश किती महत्त्वाचा आहे ना? आपण पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा गजर करतो; पण पुंडलिकाने आपल्या आई-वडिलांच्या सेवेपुढे सर्व गोष्टी तुच्छ मानल्या हे विसरतो.
कीर्तनसंध्येच्या निमित्ताने आपण आपल्या आचरणात सुधारणा करण्याचा निर्धार करू या आणि त्यासाठी प्रयत्नशील होऊ या.
– धनंजय चितळे, ज्येष्ठ प्रवचनकार
(क्रमशः)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

