प्रतिज्ञा भगवान श्रीकृष्णांची

ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘महाभारतातील अपरिचित गोष्टी’ या लेखमालेचा हा आठवा भाग…
………….
अर्जुनाने केलेली जयद्रथवधाची प्रतिज्ञा भगवान श्रीकृष्णांनी कशी पूर्ण केली हे मागच्या लेखात आपण पाहिले. आज अर्जुनाच्या दोन प्रतिज्ञांची कथा बघू या.
महाभारत युद्धामध्ये एक दिवस महारथी कर्ण आणि धर्मराज युधिष्ठिर यांच्यात युद्ध झाले. या युद्धामध्ये कर्णाने युधिष्ठिराचा लीलया पराभव केला. आपल्या धनुष्याची प्रत्यंचा त्याने युधिष्ठिराच्या गळ्यात अडकवली आणि आणि म्हणाला ‘माझ्याशी युद्ध करणे हे तुझ्या आवाक्यातील काम नाही. तेव्हा तू तुझ्या छावणीत जा, आराम कर आणि अर्जुनाला लढायला पाठव.’ पराभवापेक्षा कर्णाचे शब्द युधिष्ठिराच्या मनावर आघात करून गेले आणि तो आपल्या छावणीकडे परतला.
इकडे युद्ध करत असताना आपल्या ज्येष्ठ बंधूंचा रथ कोठेच दिसत नाही हे पाहून अर्जुनाने भगवंतांना आपला रथ युधिष्ठिराच्या छावणीकडे न्यायला सांगितले. त्याप्रमाणे हे दोघे धर्मराजाच्या छावणीजवळ आले. त्यांना पाहून युधिष्ठिराला वाटले, अर्जुन कर्णाला मारून ती आनंदवार्ता घेऊन आला आहे. म्हणून त्याने धावत पुढे येऊन अर्जुनाचे अभिनंदन केले; पण अर्जुन म्हणाला, ‘माझा आणि कर्णाचा सामनाच अजून झाला नाही.’ हे ऐकल्यावर धर्मराजाचा राग अनावर झाला आणि त्याने अर्जुनाचा आणि त्याच्या गांडीव धनुष्याचा धिक्कार केला. हे शब्द ऐकून अर्जुनाने आपल्या म्यानातून तलवार बाहेर काढली आणि तो धर्मराजाकडे आवेशाने जाऊ लागला. अर्जुनाचा संतप्त चेहरा पाहून भगवान श्रीकृष्णाने त्याला विचारले, ‘तू हे काय करतोयस?’ त्यावर अर्जुन म्हणाला, ‘माझी प्रतिज्ञा आहे, की जो कोणी माझ्या धनुष्याचा धिक्कार करील त्याला मी जिवंत ठेवणार नाही. म्हणून मी आता धर्मराजाला मारणार आहे.’ भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ‘त्यासाठी तुला शस्त्रांची गरज नाही. आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ असणाऱ्या माणसाला नावे ठेवली, शिव्या दिल्या तरी त्याचा वध केल्यासारखे होते. तेव्हा तू धर्मराजाला शिव्या दे. म्हणजे प्रत्यक्ष न मारता त्याला मारल्यासारखे होईल.’ अर्जुनाने त्याप्रमाणे युधिष्ठिराला बऱ्याच गोष्टी सुनावल्या.
थोडा वेळ झाल्यावर अर्जुनाने पुन्हा तलवार उपसली. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ‘आता काय झाले?’ त्यावर अर्जुन म्हणाला, ‘माझी दुसरी प्रतिज्ञा आहे, की जो कोणी माझ्या दादाला नावे ठेवील, त्याला मी जिवंत ठेवणार नाही. त्यामुळे मी स्वतः आत्महत्या करणार आहे.’ पुन्हा भगवंतांनी सांगितले, ‘आत्महत्या हे पाप आहे, तेव्हा ते तू करू नकोस. त्याऐवजी तू स्वतःची अति स्तुती कर, ज्यामुळे आत्महत्या केल्यासारखे होईल.’ त्याप्रमाणे अर्जुनाने आपली अवास्तव स्तुती केली. या प्रसंगी भगवान श्रीकृष्ण उपस्थित नसते, तर काय झाले असते? आपल्या प्रतिज्ञेने आपणच अडचणीत येतो, हे अर्जुनाच्या अनेक वेळा लक्षात आले नाही; पण त्या प्रसंगी भगवान श्रीकृष्णानेच त्यांना वाचवले. स्वतः भगवान श्रीकृष्णांची एक प्रतिज्ञा होती, की ‘या युद्धामध्ये मी शस्त्र हाती घेणार नाही, तर युक्तीच्या गोष्टी सांगून मार्गदर्शन करीन;’ पण पितामह भीष्मांच्या बाणांनी अर्जुन घायाळ झाला आहे, बेशुद्ध पडला आहे, हे भगवान श्रीकृष्णांनी पाहिले, तेव्हा त्यांनी रथाचे चाक उचलून भीष्मांवर चाल केली होती. थोडक्यात भगवंतांना आपल्या भक्ताचे रक्षण हे आपल्या प्रतिज्ञेपेक्षा महत्त्वाचे वाटत होते. आपण या कथांमधून हेच लक्षात घ्यायचे, की स्वतःच्या प्रतिज्ञापूर्तीपेक्षा लोकांचे, देशाचे कल्याण हे महत्त्वाचे आहे.

– धनंजय चितळे, ज्येष्ठ प्रवचनकार
(क्रमशः)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply