रत्नागिरीत तयार झालेली शस्त्रे भविष्यात देशाच्या शत्रूंना मूँहतोड जवाब देतील : स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री सामंत यांचे प्रतिपादन

रत्नागिरी : ‘ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाने भारतीय लष्कराचे सामर्थ्य अनुभवले आहे. शत्रूंना मूँहतोड जवाब देणाऱ्या भारतीय लष्कराच्या हातात भविष्यात आपल्या रत्नागिरीत तयार होणारी शस्त्रे असतील, ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे,’ असे प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले. ते आज देशाच्या ७९व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस परेड ग्राउंडवर आयोजित करण्यात आलेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, अपर पोलीस अधीक्षक बाबूराव महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. (व्हिडिओ बातमीच्या शेवटी)

रत्नागिरीतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प
पालकमंत्री सामंत म्हणाले, “शस्त्रनिर्मिती कारखान्यासाठी एमआयडीसीमार्फत जमिनीचे संपादन सुरू आहे. तसेच व्हीआयटी सेमीकंडक्टरचा भव्य प्रकल्पही काही दिवसांत रत्नागिरीत सुरू होईल. त्यासाठी आवश्यक जागा एमआयडीसीने उपलब्ध करून दिली आहे.” आपत्तीच्या काळात जिल्हा प्रशासनाची तत्परता व कार्यक्षमता कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. एनडीआरएफ, पोलीस, प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी, पत्रकार व सेवाभावी संस्था संकटकाळात एकदिलाने काम करतात, असे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

विद्यार्थ्यांसाठी नासा व इस्रो भेट उपक्रम
सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा संस्थेत नेण्याचा उपक्रम देशात प्रथमच रत्नागिरी जिल्हा परिषदेने सुरू केल्याचे ते म्हणाले. आतापर्यंत ४६ विद्यार्थी नासाला, तर १५० विद्यार्थी इस्रोला भेट देऊन आले आहेत. “आपल्या जिल्ह्यातून किमान एक तरी शास्त्रज्ञ निर्माण व्हावा. तीच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना खरी आदरांजली ठरेल, असा उद्देश योजनेमागे आहे,” असे त्यांनी सांगितले.

कृषी, वीज व उद्यान क्षेत्रातील प्रगती
कापडगाव, गोळप व गुहागर येथे जिल्हा नियोजन निधीतून एक मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारले जात आहेत. हे महाराष्ट्रातील असे पहिलेच प्रकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले.
आंबा व काजू बागायतदारांना न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगत, किसान सन्मान योजनेअंतर्गत २० हप्त्यांमध्ये ७०४ कोटी ३९ लाख रुपये शेतकऱ्यांना वितरित केल्याची माहिती त्यांनी दिली. सिंधुरत्न योजनेअंतर्गत ९५ वाहनांची साडेतीन लाख रुपयांच्या अनुदानावर उपलब्धता करून दिल्याचेही त्यांनी सांगितले.

पर्यटन व वारसा संवर्धन
युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारसा स्थळांमध्ये महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश झाला असून, त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्याचाही समावेश आहे. सर्व किल्ल्यांची देखभाल, दुरुस्ती व पर्यटनविकास करण्याची जबाबदारी शासनाची असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरीत शिवसृष्टी, तारांगण व छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक पाहण्यासाठी लाखो पर्यटक येतात. आता कसबा येथे जागतिक दर्जाचे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार असून, त्यासाठी लागणारा निधी शासन उपलब्ध करून देणार आहे.

आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील कामगिरी
जिल्ह्यात महिलांच्या कर्करोग तपासणी शिबिरे, वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय व इतर शैक्षणिक सुविधा यशस्वीपणे सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

ध्वजारोहणानंतर परेड
ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी परेडची पाहणी केली. पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस मुख्यालय पथक १, पोलीस उपनिरीक्षक अभय तेली – पथक २, क्रांती पाटील – महिला पथक, हवालदार यशवंत माने – पोलीस बँड पथक, पलटण नाईक चंद्रकांत नाईक – जिल्हा गृह रक्षक दल, पलटण नाईक मीनाक्षी मोहिते – महिला गृह रक्षक दल, पोलीस उपनिरीक्षक किरण घाग – श्वान पथक, तसेच जवाहर नवोदय विद्यालय पोलीस कॅडेट, अग्निशमन दल व रुग्णवाहिका पथकांचा समावेश संचलनात होता. राखीव पोलीस निरीक्षक राजेंद्र कोळसंगे हे परेड कमांडर होते.

पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

शिक्षण क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव : पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) राज्य गुणवत्ता यादीतील श्रीपाद चव्हाण, अद्विक साखरे, प्रेम सकपाळ, श्रीतेज काटे, श्रद्धा कासुकर, राजनंदिनी सावंत, अर्णव मगदूम, तेज भागणे, दक्ष गिजये, अर्थव जागडे, नित्या फणसे, आदित्य दामले, ललित डोळ, मधुरा पाटील, अभेद्य देशमाने, आरुष चव्हाण, उत्कर्ष मुरबट्टे, एकांश दळवी.

क्रीडा पुरस्कार : कु. मार्तंड संजय झोरे (धनुर्विद्या), ईशा केतन पवार (धनुर्विद्या), रणविर अशोक सावंत (मल्लखांब), श्रेया राकेश सनगरे (खो-खो), पायल सुधीर पवार (खो-खो), महेश शंकर मिलके (जलतरण), आकांक्षा उदय कदम (कॅरम), प्राप्ती शिवराम किनरे (योगासन), मिहीर दीपक महाजन – जिल्हा युवा पुरस्कार, ऐश्वर्य दिनेश सावंत – राष्ट्रीय खेळाडू सन्मान, द्रोण हजारे – राज्य/राष्ट्रीय प्रशिक्षक सन्मान.

विशेष सन्मान : अवयवदाते योगेश रमेश जोशी, प्रदीप शंकर मांडवकर, रमेश सुर्वे यांचे नातेवाईक.

२५ वर्षे विना-अपघात सेवा देणारे एसटीचालक : सुनील केशव गुरव, विनायक दामोदर पवार, संजय सोनू आखाडे, जितेंद्र वसंत भडाळे, सुकुमार रघुनाथ मिरजकर, राजेंद्र पर्शराम मोहिरे, संतोष कृष्णा किर, लहुजी गणपत कांबळे.

विशेष आपत्ती कार्य सन्मान : निवळी घाटातील एलपीजी टँकर अपघाताच्या वेळी वायुगळती थांबविण्यात मोलाची भूमिका बजावणारे (अग्निशमन एमआयडीसी विभाग) विवेक कृष्णा राणे, सुरेश गेणू गोल्हार, दिलीप श्यामसुंदर दळवी, आनंद डुबाजी राऊत, किशोर विलास जाधव, महेश इरप्पा मुरडी, हर्षल विजय आखाडे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply