Advertisements
रत्नागिरी : नगर परिषद निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांना पक्षातून काढण्यात आलं आहे. सावंत यांनी स्वतःच आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राजेश सावंत यांची कन्या शिवानी माने या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांच्या सूनबाई असून, शिवानी यांना उबाठा पक्षाने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर, सावंत यांनी आपल्यामुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होऊ नये, या नैतिकतेच्या भूमिकेतून काही दिवसांपूर्वी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता; मात्र आपण पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नसल्याने भाजपमध्येच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. आतापर्यंत तो राजीनामा मंजूर झाला नव्हता, असंही सावंत यांनी सांगितलं; मात्र काल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण रत्नागिरी दौऱ्यावर असताना त्यांनी इथून पुढे सावंत भाजपमध्ये नसतील, असं सांगितल्याची माहिती सावंत यांनी दिली. आता पक्षात नसलो, तरी चव्हाण यांच्याबद्दल आदरच आहे, असं त्यांनी सांगितलं. तसंच, आता पक्षाचं बंधन नसल्यामुळे मुलीच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचंही सावंत यांनी स्पष्ट केलं. उमेदवारी अर्ज दाखल करताना मी सोबत असायला हवं, अशी मुलीची इच्छा होती; मात्र मी गेलो नव्हतो. आता मात्र पक्षातच नसल्यामुळे आपल्याला कोणतंही बंधन नाही, असं सावंत म्हणाले.
Follow Kokan Media on Social Media
