वाराणसी : महाराष्ट्रातील वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी मोठा पराक्रम केला आहे. अहिल्यानगरच्या श्रुतिस्मृति ज्ञानमंदिर वेदपाठशाळेचे वेदमूर्ती देवव्रत यांनी शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन शाखेचे ‘दंडक्रम पारायण’ पूर्ण केले. कार्तिक कृष्ण षष्ठी ते मार्गशीर्ष कृष्ण दशमी म्हणजेच १२ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२५ या ५० दिवसांच्या कालावधीत १६५ तासांपेक्षा जास्त काळ चाललेले हे पारायण त्यांनी ग्रंथ न पाहता पूर्ण केले. त्यांनी काशीतील वल्लभराम शालिग्राम सांगवेद विद्यालयात हे विक्रमी पारायण केले. ते पूर्ण झाल्यावर काशीमध्ये भव्य शोभायात्रा काढून त्यांचा सत्कार करण्यात आला. आज (दोन डिसेंबर) काशी तमिळ संगमम् कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते वेदमूर्ती रेखे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. (व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिला आहे.) तसेच, आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वेदमूर्ती रेखे यांचा गौरव करणारी पोस्ट समाजमाध्यमावर लिहिली आहे. त्यामुळे या वेदमूर्ती रेखे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

वैदिक मौखिक परंपरेतल्या आठ प्रकारांपैकी ‘दंडक्रम’ हा सर्वांत कठीण प्रकार आहे. दोनशे वर्षांपूर्वी नाशिकचे वेदमूर्ती नारायणशास्त्री देव यांनी असे पारायण केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रपुत्रानेच हा विक्रम केला आहे. श्री क्षेत्र काशीमध्ये विद्वानांच्या उपस्थितीत ‘दंडक्रम विक्रमादित्य’ ही पदवी वेदमूर्ती देवव्रत रेखे यांना प्रदान करण्यात आली. श्री. डॉ. दिव्यचेतन ब्रह्मचारी गुरुजी यांच्या हस्ते चांदीची हनुमान चालिसा, चांदीची गदा, चांदीचा मुकुट, भगवान श्रीरामांचा विग्रह आणि भगवती मातेच्या प्रसादस्वरूप चंदन अत्तर अर्पण करून देवव्रत यांचा गौरव करण्यात आला. शृंगेरी शारदा पीठाचे जगद्गुरू श्री शंकराचार्य यांच्या वतीने सोन्याचे कडे आणि एक लाख रुपये देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. (उर्वरित वृत्त आणि व्हिडिओ जाहिरातीच्या खाली)
शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यंदिन शाखेच्या दंडक्रम पारायणात मंत्रांची संख्या सुमारे दोन हजार असून, पदांची संख्या सुमारे २५ लाख होते. त्यातील शब्दांची एकत्रित संख्या एक कोटीहून अधिक होते. विशिष्ट क्रमाने हे मंत्र म्हणायचे असतात. त्यासाठी कुशाग्र बुद्धिमत्ता आणि प्रगाढ साधनेची आवश्यकता असते. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी ही साधना करणाऱ्या वेदमूर्ती रेखे यांच्याबद्दल म्हणूनच अत्यंत आदर व्यक्त केला जात आहे.
योगी आदित्यनाथांनी दिलेल्या शुभेच्छा
महाराष्ट्रातील १९ वर्षीय युवा वैदिक साधक श्री देवव्रत महेश रेखेजी यांनी अद्वितीय साधना आणि अद्भुत स्मरणशक्तीच्या जोरावर २००० वैदिक मंत्र कंठस्थ करून प्राप्त केलेली ही अभूतपूर्व उपलब्धी संपूर्ण आध्यात्मिक जगतासाठी प्रेरणेचा नवदीप आहे. शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यंदिन शाखेतील ‘दंडकर्म पारायणम्’ ५० दिवस अखंड, शुद्ध आणि पूर्ण अनुशासनासह पूर्ण करणे, ही आपल्या प्राचीन गुरू-परंपरेच्या गौरवाची उजळणी आहे. माझ्यासाठी विशेष अभिमानाची बाब अशी, की हे वैदिक अनुष्ठान पवित्र काशीच्या दिव्य भूमीवर झाले. त्यांच्या कुटुंबीयांचे, आचार्यांचे, संत-महर्षींचे आणि ज्यांच्या सहयोगाने ही तपस्या सिद्ध झाली त्या सर्व संस्थांचे मनापासून अभिनंदन. देवव्रतजी, आपली ही उपलब्धी येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणेचा प्रकाशस्तंभ ठरो, अशा मंगलकामनेसह मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या शुभेच्छा
१९ वर्षांचे देवव्रत महेश रेखेजी यांनी जे यश संपादन केले आहे, ते जाणून मन प्रफुल्लित झाले आहे. त्यांचे हे यश आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. भारतीय संस्कृतीवर श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे जाणून आनंद होईल, की श्री देवव्रत यांनी शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यंदिन शाखेतील २००० मंत्रांचे ‘दंडक्रम पारायण’ सलग ५० दिवसांत पूर्ण केले आहे. यात अनेक वैदिक ऋचा आणि पवित्र शब्दांचा उल्लेख आहे. ते त्यांनी पूर्ण शुद्धतेने उच्चारले. ही उपलब्धी आपल्या गुरूपरंपरेचे सर्वोत्तम रूप आहे. वाराणसीचा (काशी) खासदार म्हणून मला याचा अभिमान आहे, की त्यांची ही अद्भुत साधना याच पवित्र भूमीवर झाली. त्यांच्या कुटुंबीयांना, संतांना, मुनींना, विद्वानांना आणि देशभरातील ज्यांनी या तपस्येत त्यांना सहकार्य केले त्या सर्व संस्थांना माझा प्रणाम.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरून रेखे यांचे या विक्रमाबद्दल अभिनंदन केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

