
रत्नागिरी : रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात चार नगर परिषदा आणि तीन नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी ६८.१४ टक्के मतदानाची नोंद झाली. अंतिम आकडेवारी प्रशासनाने रात्री साडेदहाला जाहीर केली. सर्वाधिक ७५.२६ टक्के मतदान गुहागर नगर पंचायतीसाठी झालं, तर सर्वांत कमी ५५.०९ टक्के मतदान रत्नागिरी नगर परिषदेसाठी नोंदवलं गेलं. देवरूख नगर पंचायतीसाठी ७४.३३ टक्के, तर लांजा नगर पंचायतीसाठी ७१.०६ टक्के मतदान झालं. राजापूर नगर परिषदेसाठी ७४.५५ टक्के, खेड नगर परिषदेसाठी ६२.५३ टक्के, तर चिपळूण नगर परिषदेसाठी ६४.१५ टक्के मतदान झालं. जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या जास्त असून, एकूण जिल्ह्याच्या आकडेवारीचा विचार करता पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी ६३.१७ टक्के, तर महिलांच्या मतदानाची टक्केवारी ६२.०५ टक्के आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नगर परिषदा आणि एका नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदारांनी उत्साहान मतदान केल्याचं पाहायला मिळालं. जिल्ह्याचं एकूण मतदान ७४.३५ टक्के इतकं विक्रमी झालं आहे. या निवडणुकीत कणकवली नगर परिषदेच्या मतदारांनी सर्वाधिक उत्साही सहभाग घेतला. कणकवलीमध्ये तब्बल ७९.७१ टक्के इतकं विक्रमी मतदान झालं. त्याखालोखाल वेंगुर्ला नगर परिषदेत ७४.२९ टक्के आणि मालवण नगर परिषदेत ७४.०४ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. जिल्ह्यात सर्वांत कमी मतदान सावंतवाडी नगर परिषदेसाठी नोंदवलं गेलं. तिथे ६९.३६ टक्के मतदारांनी मतदान केलं. जिल्ह्यात एकूण १८ उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी तर २६६ उमेदवार सदस्यपदासाठी निवडणूक रिंगणात आहेत.
रत्नागिरीतील दिवसभरातील मतदान
रत्नागिरी जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत एकूण ५८.३१ टक्के मतदानाची नोंद झाली. गुहागर नगर पंचायतीसाठी सर्वाधिक ६९.१२ टक्के मतदान झालं. देवरूख नगर पंचायतीसाठी ६४.५५ टक्के, लांजा नगर पंचायतीसाठी ६१.५७ टक्के मतदान झालं. राजापूर नगर परिषदेसाठी ६४.३४ टक्के, खेड नगर परिषदेसाठी ५२.५ टक्के, चिपळूण नगर परिषदेसाठी ५१.२६ टक्के, तर रत्नागिरी नगर परिषदेसाठी सर्वांत कमी ४४.८२ टक्के मतदान झालं.
जिल्ह्यात दुपारी दीड वाजेपर्यंत एकूण ४६.६४ टक्के मतदान झालं होतं. गुहागर नगर पंचायतीसाठी सर्वाधिक ६१.२८ टक्के, देवरूख नगर पंचायतीसाठी ५१.७७ टक्के, तर लांजा नगर पंचायतीसाठी ४९.११ टक्के मतदानाची नोंद आतापर्यंत झाली आहे. राजापूर नगर परिषदेसाठी ४९.७४ टक्के, खेड नगर परिषदेसाठी ४१.३४ टक्के, चिपळूण नगर परिषदेसाठी ३९.०२ टक्के, तर रत्नागिरी नगर परिषदेसाठी सर्वांत कमी ३४.२५ टक्के मतदानाची नोंद दीड वाजेपर्यंत झाली.
सकाळी साडेअकरापर्यंतच्या चार तासांत जिल्ह्यात एकूण ३०.८९ टक्के मतदान झालं होतं. गुहागर नगर पंचायतीसाठी सर्वाधिक ४६.४७ टक्के मतदानाची नोंद झाली. देवरूख नगर पंचायतीसाठी ३२.८६ टक्के, तर लांजा नगर पंचायतीसाठी ३२.६ टक्के मतदान झालं. राजापूर नगर परिषदेसाठी ३०.२८ टक्के, खेड नगर परिषदेसाठी २८.१ टक्के, चिपळूण नगर परिषदेसाठी २४.०२ टक्के, तर रत्नागिरी नगर परिषदेसाठी सर्वांत कमी २१.९३ टक्के मतदानाची नोंद झाली.
सकाळी साडेनऊपर्यंतच्या दोन तासांत जिल्ह्यात एकूण १४.२६ टक्के मतदान झालं होतं. सर्वाधिक २३.३७ टक्के मतदान गुहागर नगर पंचायतीसाठी झालं. देवरूख नगर पंचायतीसाठी १५.९२, तर लांजा नगर पंचायतीसाठी १३.९६ टक्के मतदानाची नोंद झाली. राजापूर नगर परिषदेसाठी १४.२५, खेड नगर परिषदेसाठी ११.९१, चिपळूण नगर परिषदेसाठी १०.३८, तर रत्नागिरी नगर परिषदेसाठी १०.०५ टक्के मतदानाची नोंद पहिल्या दोन तासांत झाली होती.
दरम्यान, पूर्वनियोजनानुसार उद्या, तीन डिसेंबरला होणार असलेली मतमोजणी २१ डिसेंबरला घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. निवडणुका निष्पक्ष, तसेच पारदर्शक व्हाव्यात, यासाठी हा निर्णय दिल्याची माहिती वकिलांनी दिली. त्यामुळे आचारसंहितासुद्धा २० डिसेंबरपर्यंत कायम राहणार आहे. स्थगित झालेल्या काही प्रभागांतील निवडणुका २० डिसेंबरला होणार आहेत.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

