जागतिक मधुमेहदिनाचे औचित्य साधून ठाण्यातील ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. आशिष सरवटे यांची विशेष साप्ताहिक लेखमाला कोकण मीडियाने सुरू केली आहे. त्या लेखमालेचा हा चौथा भाग…
इन्सुलिन हे पाण्यासारखे हॉर्मोन आहे. ते आपल्या स्वादुपिंडात (Pancreas) तयार होते. जेव्हा आपण काही खातो, तेव्हा आपल्या स्वादुपिंडाला संदेश मिळतो, की रक्तातील साखर अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात वाढत आहे. तेव्हा स्वादुपिंड लगेच इन्सुलिन हे हॉर्मोन रक्तात सोडते. त्यामुळे रक्तातील वाढलेली साखर आटोक्यात येते. सर्वसाधारणपणे असे समजले जाते, की बहुतांश रुग्णांमध्ये जेव्हा मधुमेह झाला आहे याचे निदान होते, त्या वेळी त्यांच्या शरीरात फक्त ५० टक्के इन्सुलिन बनत असते. १९२१मध्ये जेव्हा इन्सुलिनचा शोध लागला, तिथपासून आजपर्यंत इन्सुलिनमध्ये खूप लक्षणीय बदल झाले आहेत. सुरुवातीला इन्सुलिन गाय किंवा डुक्कर अशा प्राण्यांपासून बनवले जात असे. ते कमी दर्जाचे असायचे; पण आता उत्तम दर्जाचे इन्सुलिन उपलब्ध आहे. सध्या चार ते पाच तास आणि २४ ते ३६ तास काम करणारे अशी विविध प्रकारची इन्सुलिन उपलब्ध आहेत. बाहेरून घेण्याच्या इन्सुलिनचे काही साइड इफेक्ट म्हणजे वजन वाढते; हायपोग्लायसेमिया म्हणजे साखर कमी होऊ शकते किंवा अॅलर्जिक पुरळ येऊ शकते.
इन्सुलिन कोणी घ्यावे?
बहुतांशी मधुमेही रुग्णांना इन्सुलिन चालते. टाइप वन मधुमेहाचे पेशंट, गरोदरपणातील मधुमेह, कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया होणार असेल तर, मधुमेहातील गुंतागुंत, कीटोअॅसिडॉसिस, शुगर नियंत्रणात येत नसेल तर, शुगरमुळे जखमा नियंत्रणात येत नसतील तर किंवा आधीच्या लेखात लिहिल्याप्रमाणे औषधे अपयशी ठरत असतील तर (Failure of drugs) इन्सुलिन घेणे श्रेयस्कर ठरते. हल्ली पाश्चात्य देशात आणि भारतातसुद्धा असे मानले जाते, की मधुमेह झाल्यावर लगेच इन्सुलिन सुरू केले, तर स्वादुपिंडाला आराम देऊन त्याची काम करण्याची ताकद वाढवण्यासाठी उपयोग होतो. (उर्वरित लेख जाहिरातीच्या खाली)
इन्सुलिनबद्दलचे गैरसमज
- इन्सुलिन सुरू झाले की बंद करता येत नाही.
- आधीच्या लेखात मधुमेहाचे प्रकार लिहिलेले आहेत. त्यात टाइप वन डायबेटीसच्या रुग्णांचे इन्सुलिन कधीच बंद करू नये. गरोदरपणात किंवा कुठल्या मोठ्या ऑपरेशनला इन्सुलिन चालू केले असेल, तर ते नक्कीच बंद होऊ शकते.
- इन्सुलिन चालू केले, तर स्वादुपिंडात आपले स्वतःचे इन्सुलिन काय करेल?
- बाहेरून इन्सुलिन घेतले, तर आपल्या स्वादुपिंडाला आराम मिळतो. ते पुढील आयुष्यात बलवान बनते आणि जास्त इन्सुलिन बनवू शकते. ते आपल्याला रिव्हर्सल ऑफ डायबेटीस (Reversal of Diabetes) होण्यास मदत करते.
- इन्सुलिनचे इंजेक्शन खूप दुखते.
- इन्सुलिनची सुई खूप छोटी व बारीक असते. ती फक्त आपल्या त्वचेच्या खाली म्हणजे Subcutaneous fatमध्ये जाते. त्यामुळे ते मुळीच दुखत नाही.
- इन्सुलिन चालू केले म्हणजे माझे शेवटचे दिवस आले आहेत व माझा मधुमेह खूप खराब अवस्थेत आहे.
- असे मुळीच नाही. इन्सुलिन चालू केले की आपली रक्तातील साखर खूप चांगली नियंत्रणाखाली येते. शरीराला चैतन्य प्राप्त होते आणि शरीरात एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो. जे पेशंट इन्सुलिन सुरू करताना नाराज असतात, ते एका महिन्यात सांगतात, की आजपर्यंत इन्सुलिन टाळून मी खूप मोठी चूक केली आहे.
- इन्सुलिन महाग असते का?
- इन्सुलिनचे बरेच प्रकार असतात. पारंपरिक इन्सुलिन स्वस्त असते. ते चालू केले, की गोळ्यांचा खर्चही कमी होतो. जे नवीन प्रकारचे अॅनालॉग इन्सुलिन आहे, ते महाग असते. तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करून पारंपरिक इन्सुलिन घेऊ शकता. त्याचा दर्जा मुळीच कमी नसतो. इन्सुलिन सीरिंजमधून किंवा पेनद्वारे घेता येते. पेनद्वारे घेण्याचे इन्सुलिन थोडे महाग असते.
- इन्सुलिन घ्यायला रोज डॉक्टरांकडे कसे जाणार?
- इन्सुलिन घेण्याची क्रिया खूप सोपी असते. मी जेव्हा माझ्या पेशंटला इन्सुलिन सुरू करतो, तेव्हा ती क्रिया त्यांना शिकवतो. त्यामुळे ते स्वतः इन्सुलिन घेऊ शकतात.

– डॉ. आशिष सरवटे, ठाणे येथील डायबेटॉलॉजिस्ट
(दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी डॉ. सरवटे रत्नागिरीत निष्कर्ष डायग्नॉस्टिक्समध्ये येतात. एरव्ही ठाण्यात त्यांचे क्लिनिक आहे.)

