Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

महाराष्ट्राच्या सेवेसाठी कर्तव्यभावनेने सज्ज; पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची भावना

Advertisements

मुंबई : राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी आज (३१ जानेवारी २०२६) पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना शपथ दिली. २८ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक झालेल्या अपघाती निधनानंतर सुरू असलेल्या चर्चांना या घडामोडीमुळे पूर्णविराम मिळाला आहे. सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्याच महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ ही खाती देण्यात आली आहेत. लोकभवनात साधेपणाने झालेल्या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य, लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह सुनेत्रा पवार यांचे कुटुंबीय आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.

सुनेत्रा पवार यांनी या वेळी व्यक्त केलेल्या भावना –
आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना मन अत्यंत भावूक झाले आहे. आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेताना ‘शिव–शाहू–फुले–आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्यभावनेने ही जबाबदारी स्वीकारत आहे.
दादांच्या अकाली जाण्याने वैयक्तिक आयुष्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे; मात्र त्यांनी दिलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची प्रामाणिक बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि लोकाभिमुखतेने काम करत राहीन, हा विश्वास मी आज या निमित्ताने देते.
या कठीण काळात महाराष्ट्रातील जनतेने दिलेले प्रेम, विश्वास आणि पाठिंबा हेच माझे सर्वांत मोठे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने आणि नव्या ऊर्जेने पुढे चालत राहीन. शेतकऱ्यांच्या हितासाठी, युवकांच्या संधींसाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य असेल.
देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी, तसेच देशाचे गृह व सहकारमंत्री आदरणीय अमित शहा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य शासन सदैव तत्पर राहील. तसेच, नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याची जबाबदारी आम्ही सर्व जण अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडू.
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या साथीने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, सामाजिक समता, आर्थिक प्रगती आणि सर्वसमावेशक समृद्धी साधण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. जनतेच्या अपेक्षांना न्याय देणे, शासन-प्रशासन अधिक संवेदनशील व लोकाभिमुख बनवणे आणि राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणे, हाच माझा संकल्प आहे.
पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचे, सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करीन, हा शब्द देते.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version