लोकनेत्याचा दुर्दैवी मृत्यू! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि प्रशासनावर पकड असणारे प्रभावी नेते अजित पवार यांचा आज (२८ जानेवारी २०२६) विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. बारामती या आपल्या कर्मभूमीतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी आज अजित पवार यांच्या बारामतीत चार सभा होत्या. त्यासाठी ते मुंबईतून बारामतीत येत होते; मात्र विमान धावपट्टीवर उतरत असताना अपघातग्रस्त झाले आणि मोठी आग लागली. वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या अपघातात पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या वृत्ताला केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक संचालनालयाने दुजोरा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिपळूणमध्ये आज नियोजित असलेली प्रचारसभा रद्द करण्यात आली आहे. आज (२८ जानेवारी) राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद राहणार असून, ३० जानेवारीपर्यंत राज्यात दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दिलदार मित्र गमावल्याची भावना फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. अजित पवार यांनी सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्रिपद भूषविले आणि अर्थमंत्री म्हणून तब्बल ११वेळा त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला.

अत्यंत महत्त्वाकांक्षी, मात्र तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संबंध असलेले, प्रशासनावर पकड असलेले प्रभावी लोकनेते अशी अजित पवार यांची ओळख होती. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे काही आरोप झाले होते, त्यांच्या काही वक्तव्यांमुळे/निर्णयांमुळे वादही निर्माण झाले; मात्र मनातील भावना स्पष्टपणे, रोखठोक बोलणारा आणि बेधडकपणे अंमलबजावणी करणारा कृतिशील, वक्तशीर नेता अशी त्यांची प्रतिमा होती. म्हणूनच ‘अजितदादा’ या नावाने ते प्रसिद्ध झाले. काका शरद पवार यांच्याशी फारकत घेऊन त्यांनी भाजपसोबत येण्याचा निर्णय घेतला, त्याचे राज्याच्या राजकारणात मोठे पडसाद उमटले. गेल्याच आठवड्यात त्यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. जमिनी विकून किंवा जमिनीतून मिळालेले पैसे घालून राजकारणात येऊ नका, असा सल्ला ‘राजकारण लय वंगाळ’ अशा शब्दांत त्यांनी या भाषणात दिला होता. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड या बालेकिल्ल्यातही राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नव्हते. त्या वेळी त्यांनी ‘जनतेचा कौल सर्वोच्च असून, तो आदराने स्वीकारतो,’ अशी भावना व्यक्त केली होती. अखेरपर्यंत कार्यरत असलेल्या या लोकनेत्याचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा, यावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अद्याप व्हायची आहे; मात्र या अखेरच्या क्षणी हातातील घड्याळ हीच अजित पवार यांची खरी ओळख ठरली. कारण अपघातात विमानातील सर्वांचे इतके देह जळले, की ते ओळखण्यापलीकडे गेले होते. त्यामुळे हातातील घड्याळावरून अजित पवार यांच्या देहाची ओळख पटवण्यात आली.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply