कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली ३० जानेवारीपासून ग्रामीण साहित्य संमेलन

लांजा : राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अकरावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन येत्या ३० जानेवारी २०२६ ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत रिंगणे (ता. लांजा) येथे होणार आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार, लोकसत्ताचे माजी संपादक, माजी खासदार कुमार केतकर भूषवणार आहेत.

संमेलनात शुक्रवारी, ३० जानेवारी रोजी सकाळी ८ ते १० रांगोळी प्रदर्शन, १० वाजता पाककला स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सायंकाळी नदीजल पूजन आणि त्यानंतर रात्री ८ वाजता चौथरा हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. शनिवार, दिनांक ३१ जानेवारी हा संमेलनाचा मुख्य दिवस आहे. या दिवशी सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडी निघेले. त्यानंतर १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. दुपारी २ ते ३ या वेळेत मुलांच्या एकांकिका स्पर्धा होणार असून तीन ते चार या वेळेत मुलांचे कथाकथन व भाषणे होतील. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत ‘मराठी भाषा आणि तिचा इतिहास’ या विषयावर प्रसिद्ध वक्ते राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचे अभिजात भाषा मराठी या विषयावर, तर धीरज वाटेकर यांचे ऐतिहासिक रिंगणे गावाचा मागोवा या विषयावर व्याख्यान होणार आहे. सायंकाळी ५ ते ६ या वेळेत ‘कोकण संस्कृती’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये डॉ. निधी पटवर्धन, डॉ. पार्थ काळे, ऋषीकांत राऊत, रामदास खरे हे मान्यवर सहभागी होणार आहेत.
सायंकाळी ६ ते ७ या वेळेत सचिन करडे यांचा ‘शिवचरित्र’ कार्यक्रम होईल. सायंकाळी ७.०० ते रात्री ८.३० या वेळेत स्थानिक कविसंमेलन होणार असून त्यानंतर निमंत्रितांचे काव्यसंमेलन पार पडणार आहे. रात्री १० ते ११.३० या वेळेत प्रख्यात सतारवादक विदुर महाजन यांचे सतारवादन होईल. त्यामध्ये दिनेश मोरे त्यांची मुलाखत घेणार आहेत.

रविवारी, दिनांक १ फेब्रुवारी रोजी सकाळी मुलांच्या एकांकिका, फॅशन शो असे कार्यक्रम होतील. तसेच पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. यामध्ये नव्वदीपार ज्येष्ठांचा सन्मान, व्यंगचित्रकार प्रभाकर वाईकर यांची मुलाखत, कोकणभूषण पुरस्कार वितरण सोहळा, जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा, त्याचप्रमाणे रांगोळी, पाककला स्पर्धेचे बक्षीस वितरण आणि इतर पुरस्कारांचे वितरण होणार आहे. तसेच नववधू सन्मान सोहळादेखील यावेळी पार पडणार आहे.

क्रांतीज्योत फेरी

साहित्य संमेलनापूर्वी रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे मूळ गाव कोट येथून राणी लक्ष्मीबाईच्या नावाने क्रांतीज्योत फेरी काढली जाते.  ही परंपरा यंदाही जपत २६ जानेवारी रोजी संघाने कोट ते रिंगणे अशा क्रांतीज्योत फेरीचे आयोजन करून रिंगणे येथील अकराव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचा प्रारंभ केला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply