Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

ती, ती आणि ती : अडचणींमधून जिद्दीने मार्ग काढणाऱ्या स्त्रियांची कथा

Advertisements

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी मुंबई माहापालिका कामगार विभागाने ती, ती आणि ती नाटक सादर केले.

समाजातील तीन वेगवेगळ्या वर्गातील कुटुंबातील स्त्रियांना वेगवेगळ्या कारणांनी दुःख सोसावे लागते. त्यातून धाडसाने त्या मार्ग काढतात. त्यांचा तो प्रवास ती, ती आणि ती नाटकातून मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

पडदा उघडताच पुढारी ‘माणिकराव’ हे सुभानराव यांना आमदारकीचे तिकीट मिळाले नसल्याने त्यांची नाराजी घालवण्याकरिता, ते पदाधिकारी असलेल्या काळभैरव मंदिर ट्रस्टला मदत करू, कॉन्ट्रॅक्ट देऊ, पुनर्वसन करू अशी आश्वासने देऊन त्यांची समजूत काढत असतात.
सुभानराव मॅनेजिंग ट्रस्टी असलेल्या कॉलेजमध्ये प्राचार्यपदाच्या निवडीसाठी मी योग्य उमेदवार आहे, तरी माझी निवड व्हावी, अशी विनंती करायला राकेश त्यांच्याकडे येतात. राकेशची पत्नी मेघा काळभैरव मंदिर ट्रस्टच्या देवळात स्त्रियांना प्रवेश दिला जात नसल्याबद्दल आंदोलने करीत असते. सुभानराव राकेशला सांगतात, मी लवकरच मेघाला भेटायला घरी येतो. त्यावेळी बोलू.

राकेशला त्याच्या प्राचार्यपदाच्या निवडीत मेघाचे आंदोलन अडसर ठरते, तो तिला विचारतो, ”स्त्रियांच्या प्रश्नासाठी आंदोलने करून तुला काय मिळणार आहे? तू हे सोडून दे. असल्या समाजसेवेच्या कामांमुळे तुझे संसारात लक्ष नाही. आपल्या मुलीची आदर्श आई होणे तुला जमले नाही. म्हणून आपली मुलगी दिव्या हॉस्टेलला राहायला गेली.”

सुभानराव राकेश व मेघाला येऊन भेटतात, मेघाला सांगतात, ”तुमची आंदोलने चांगली असतात. मात्र त्या आंदोलनात सहभागी स्त्रिया कमी असतात, नुसते विधायक विचार मांडून चालत नाही. त्याला कृतीची जोड हवी, ती जोड मी देऊ शकतो. माझ्या उद्योगधंद्यात तीनशेच्या आसपास स्त्रिया कामावर आहेत. त्या तुमच्या आंदोलनात सहभागी होतील.” ‘मास लीडर’ म्हणून प्रस्थापित होण्यासाठी मेघाला ही सुसंधी वाटते. ती ही संधी स्वीकारते.

मदन व राणी आपल्या विवाहाचा वाढदिवस साजरा करतात. मदन राणीला गिफ्ट देतो. राणी विचारते, ”इतकी वर्षं झाली लग्नाला. आज काय विशेष?” तेव्हा पवन तिला एक प्लॅन सांगतो. ”तू आजच माझा बिझनेस पार्टनर पवनकडे जा. त्याची इच्छा पूर्ण कर आणि त्याच्याकडे माझ्या बिझनेसची महत्त्वाची कागदपत्रं आहेत. ते घेऊन येय. अन्यथा तो मला रस्त्यावर आणील.” राणी नकार देते, मात्र पवन बळजबरीने तिला त्याच्याकडे पाठवतो. राणी पवनकडे येते. पवन तिला मदनची कागदपत्रे देतो. ”मदनने तुझी ही काय अवस्था केली आहे? तुझ्या चारित्र्यापेक्षा त्याला त्याची प्रतिष्ठा मोठी वाटली. तुझ्या सौंदर्याचा तो वापर करून घेतोय. यापुढेही घेईल. तू मला पूर्वीपासून आवडतेस. तू मदनला कायमचं सोड व माझ्याकडे मुंबईला ये”. असे म्हणून पवन तिला फ्लॅटच्या किल्ल्या देतो.

दारू पिऊन अपघात करुन दोन माणसांचा बळी घेतल्याने ड्रायव्हरची नोकरी गमावून बसलेला किसन घरात बसून सगुणाची पैशांसाठी वाट पाहत असतो. ती मोलमजुरी करून संसार रेटत असते. विडी कारखान्यातील मशीन बंद पडल्याने आजची मजुरी तिला मिळत नाही, उद्या हिशोब झाला की पैसे मिळतील असे ती सांगते. त्यावर तिला मारझोड करून तिने वाणसामानासाठी राखून ठेवलेले पैसे घेऊन तो पसार होतो.

रेल्वेच्या वेटिंग रूममध्ये या तिघींची भेट होते, एकमेकींच्या पूर्वायुष्याची देवाणघेवाण होते.
मेघा स्त्रीमुक्तीच्या आंदोलनात सक्रिय होती, त्यासाठी तिने घरही सोडले, मात्र सुभानराव त्याचा राजकीय स्वार्थ साधल्यावर मेघाच्या आंदोलनातून बाजूला झाला. मेघाची संघटना विस्कळित झाली. मेघा एकटी पडली. तिने काही काळ एकटीने व्यतीत केला, पण ती पुन्हा राकेशकडे आली. मात्र राकेशने ”आता आमची आठवण आली काय? तुझा आमचा काही संबंध उरला नाही. तू दिव्याला भेटू नकोस”, असे बजावतो. मेघापुढे आता कुठे जायचे, हा प्रश्न उभा राहतो, ती रेल्वे स्टेशनवर येते.

राणी पवनकडील कागद घेऊन मदनकडे येते, कागद पाहताच मदनला आनंद होतो मात्र ज्या माणसाला आपल्या पत्नीच्या चारित्र्यापेक्षा आपली प्रतिष्ठा मोठी वाटते, त्याला शिक्षा झाली पाहिजे, म्हणून कागद फाडून टाकते आणि पवनने दिलेल्या फ्लॅटमध्ये जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर येते.

किशोर घरात त्याची प्रेयसी सुगंधाची वाट पाहत बसलेला असतो, सगुणा घरी लवकर येते, किशोर तिला ”लवकर का आलीस?” असे विचारतो. तेवढ्यात सुगंधा तेथे येते. सगुणाला सगळ्याचा अंदाज येतो, ती सुगंधाला हाकलते, किशोरचे तिचे भांडण होते, रागाच्या भरात, सगुणा त्या दोघांच्या अंगावर रॉकेल ओतते व पेटवून देते व धावत रेल्वे स्टेशनवर येते. तेथे राणी व मेघा आधीच असतात. तिघींची भेट होते एकमेकींच्या सुख दुःखाची चौकशी होते. तेवढ्यात रेल्वे यंत्रणा सुरू होते. तिघीजणी जायला निघतात.

मेघा स्त्रियांच्या समस्यापूर्तीसाठी पुढील आयुष्यभर लढा देण्याचे ठरवते. राणी कथ्थक नृत्यांगना असते. ती तो छंद जोपासण्याचे व कला शिकवण्याचे ठरवते.
सगुणा पोलीस ठाण्यात जाऊन तिच्याकडून झालेल्या कृत्याची कबुली देण्याचे ठरवते.

नाटकाचे नेपथ्य प्रतीकात्मक आहे. प्रकाशयोजना व पार्श्वसंगीत यथायोग्य आहे.

……

श्रेयनामावली
नाटक – ती, ती आणि ती
संस्था : बृहन्मुंबई महानगरपालिका, सहप्रमुख कामगार अधिकारी (शहर), मुंबई
लेखक – महेंद्र कुरघोडे
दिग्दर्शक – नम्रता दे. काळसेकर
दिग्दर्शक – नम्रता दे. काळसेकर
प्रकाशयोजना – श्याम चव्हाण
नेपथ्य – रजनीश कोंडविलकर
रंगभूषा – उदयराज तांगडी
संगीत दिग्दर्शक – अक्षय जाधव
वेशभूषा – रजनीश कोंडविलकर

पात्रपरिचय
सुभानराव – नरेश कांबळे
माणिकराव – संदेश कव्हाळे
मेघा – डॉ. गायत्री आमोणकर
राकेश – डॉ. कनक नागले
सुरेखा – डॉ. मयूरा फुलपगार
मदन – अमोल पाटील
राणी – भावना रहाटे
पवन – विनोद राणे
सगुणा – मानसी अ. जोशी
किसन – तुषार चाळके
सुगंधा – अर्चना डोळस

(शब्दांकन : प्रसाद वैद्य, ९४२०१ ५५३३३)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version