महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सांगलीच्या समांतर कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाने तिचे संदर्भ नसलेली गोष्ट हे द्विपात्री नाटक सादर केले.
स्त्री आणि पुरुष ही संसारगाड्याची दोन चाके समजली जातात. मात्र त्यातील प्रत्येकाचा अहंकार प्रमाणापेक्षा जास्त वाढला, तर संसाराची काय गत होते हे दाखविण्याचा प्रयत्न तिचे संदर्भ नसलेली गोष्ट या नाटकात करण्यात आला आहे.
पडदा उघडताच ‘तो’ घराचा दरवाजा उघडून आत येतो व तेव्हा कुत्रा ओरडतो. तो ‘ती’ला सांगतो, ”काही करणार नाही. नवीन दिसलीस ना तू! म्हणून भुंकतोय.” ‘ती’ दारात उभी राहते. ‘तो’ तिला सांगतो. ”दारात माप आहे, असं समजून आत प्रवेश कर.” ‘ती’ आत प्रवेश करते.
तो अनाथगृहात वाढलेला, कष्टाने शिक्षण घेऊन नोकरी मिळवून स्थिरावलेला आणि आपणही एखाद्या अशाच स्त्रीला आधार द्यावा, या इच्छेने एका वस्तीतल्या ‘ती’शी लग्नगाठ बांधतो. ती घरात आल्यावर त्याला विचारते, ”तुम्ही माझ्याशी लग्न का केलेत?” तिला हा प्रश्न पडलेला असतो की, चांगला सुशिक्षित, नोकरी, स्वतःचे घर असलेला तो माझ्याशी लग्न का करतोय? तो फक्त एवढेच सांगतो, ”तू आवडलीस म्हणून!”
तिला विवाहानंतर शिक्षण पूर्ण करावयाचे असते. तसेच स्त्रियांच्या अडीअडचणी, समस्या याच्याशी संबंधित संघटनेचे काम करावयाचे असते. तो आनंदाने यासाठी संमती देतो. ती अभ्यास करते. कॉलेजमध्ये पहिली येते आणि गावातल्या स्त्रियांच्या प्रश्नांसंबंधी चळवळीत काम करू लागते.
एकदा डॉक्टरांचा फोन येतो व ‘ती’ आई होणार आहे, असे ते सांगतात. हे ऐकून ती अस्वस्थ होते. ”याची काळजी तुम्हाला घ्यायला सांगूनही असं कसं झालं? आता मला स्त्रीमुक्ती संघटनेचं काम नीटपणे करता येणार नाही. माझी स्वप्नं मला पूर्ण करता येणार नाहीत”, असे त्याला सांगून त्यालाच दोषी ठरवते आणि मूल नको असल्याचे ठरवते. तो समजावतो, ”तू फार पुढचा विचार करते आहेस. मूल थोडं मोठं झालं की, तुला आयुष्यभर काम करता येईल. अनेक स्त्रियांनी आपल्या मुलांना वेळ देऊन समाजकार्य केलं आहे,. आपण दोघांनी त्याला सांभाळू. तू असा निर्णय घेऊ नको.”
ती आई होते. तिचे स्त्रीमुक्ती चळवळीचे काम सुरू असते. कामांचा व्याप वाढत जातो. तिच्यावर संचालकपदाची जबाबदारी येते. एकदा मुंबईत महिला मोर्चासाठी तिला चार दिवस जायचे असते. ”लहान बाळाला ठेवून कशी जाशील? मला एकट्याला सांभाळणं कठीण जाईल. मी त्याला सांभाळीन. पण त्याने मला स्वीकारलं पाहिजे ना? गावातल्या गावात काम करायला काहीच हरकत नाही, पण तू चार दिवस परगावी जाऊ नको. तो लहान आहे”, असे तो तिला सांगतो. तो आपल्या प्रगतीआड येतोय असा समज ती करून घेते. तिचा अहंकार दुखावतो. आपण जाणारच, यावर ठाम राहते. यावर, ”जर जाणार असशीलच तर कायमचं घर सोडून जावं लागेल” असे तो बजावतो. ती निघून जाते.
मुलगा बाळ आता एकवीस वर्षांचा होतो आणि एके दिवशी ती अचानक त्याच्याकडे येते. तिला पाहताच तो दरवाजा उघडून ठेवतो. ती आत येते. सगळ्या गोष्टी न्याहाळते. घरात काहीच बदल झाला नसल्याचे तिला जाणवते. तसे ती सांगतेही, तो उत्तर देतो, ”निर्जीवव वस्तू बदलत नाहीत.”
ती अनेक प्रश्न विचारते. तो म्हणतो, ”तू माझी मुलाखत घ्यायला आली आहेस काय?” पण तिच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देतो. मात्र तिला काहीच प्रश्न विचारत नाही. ती विचारते, ”माझी चौकशी करणार नाहीस काय?” त्यावर तो म्हणतो, ”आपल्या नात्याच्या माणसाची चौकशी करायची असते. आपल्यात आता कोणतंही नातं नाही आणि तू कुठे होतीस, कशी जगलीस हे जाणून घेण्यात मला स्वारस्य नाही.”
”मी आता इथे कायमची राहायला आले, तर तुम्ही काय कराल?” असे ती विचारते त्यावर, ”पाहुणे कायमचे राहत नाहीत. तुझं येणं आता पांथस्थ, पाहुण्यासारखं आहे आणि मलाही आता माझ्या घरात तू आणि तुझे कोणतेही संदर्भ नको आहेत.”
मुलगा बाळ कसा आहे याची चौकशी ती करते. त्याला भेटावेसे वाटते असे ती त्याला सांगते. तो तिला सल्ला देतो की,” त्याच्या आयुष्यात अद्याप कोणती स्त्री आलेली नाही. तो तुझ्याशी कसा वागेल माहीत नाही. सबब तू त्याला न भेटणं हेच योग्य ठरेल.”
ती त्याला सांगते, ”मी त्याची आई आहे.” तो म्हणतो, ”नाती नुसती असून चालत नाहीत, तर ती मुलांमध्ये पाझरावी लागतात. तुझ्याशी तो कोरडा वागेल, तुझा अपमानही करील. तू त्याला न भेटता जा. फक्त एका प्रश्नाचे उत्तर देता आलं तर दे. तू इथून का गेलीस व जाऊन काय मिळवलंस?” ती निरुत्तर होते आणि निघून जाते.
‘त्याचे घर’ एवढेच नेपथ्य आहे. त्यामध्ये प्रकाशयोजनेद्वारे आवश्यक परिणामकता साधली आहे. पार्श्वसंगीताचा अत्यावश्यक तेवढाच वापर केला आहे. सकस संवाद हेच नाटकाचे बलस्थान असून, कलाकारांचे उत्तम सादरीकरण प्रेक्षकांना खिळवून ठेवते. प्रताप सोनाळे यांचा ‘तो’ संयत अभिनयामुळे भावतो. नाटकाचे कथानक अतिशय संथ व शांतपणे पुढे सरकते. अभिनयावर जास्त भर देण्यात आला आहे. नाटकात दोनच पात्रे असून त्यांना नावेही देण्यात आलेली नाहीत.
………
श्रेयनामावली
संस्था – समांतर कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ, सांगली
नाटक – तिचे संदर्भ नसलेली गोष्ट
मूळ कथा – राजन खान, नाट्यलेखन – डॉ. प्रमोद खाडिलकर
दिग्दर्शन – पायल पांडे
पार्श्वसंगीत – महेश पवार
प्रकाशयोजना – आशीष भागवत, ओंकार मोटे
रंगभूषा – अविनाश जोशी-सुनीता वर्मा
वेशभूषा – अनिरुद्ध कुलकर्णी
नेपथ्य- सौरभ पांढरे
रंगमंच साह्य – सुशांत सावंत, प्रतीक साठे, सारंग भांबुरे, विजय सुतार, संतोष अबाळे, अमोद परांजपे, रोहित पवार
निर्मिती साह्य – रमेश पाटील, ओंकार रोकडे (बीट टू बीट स्टुडिओ, सांगली), प्रतिरंग स्टुडिओ, इचलकरंजी, मनोरंजन मंडळ, इचलकरंजी
पात्रपरिचय
तो: प्रताप सोनाळे
ती : वैष्णवी जाधव
(शब्दांकन : प्रसाद वैद्य, ९४२०१ ५५३३३)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड




