रत्नागिरी : राज्य नाट्य स्पर्धा म्हणजे केवळ स्पर्धा नसून भावी काळातील कलाकार तयार करणारी कार्यशाळा आहे, असे प्रतिपादन रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे यांनी केले.
राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेल्या चौसष्टाव्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला रत्नागिरीत काल (दि. २ फेब्रुवारी) थाटात सुरुवात झाली. अंतिम फेरीतील स्पर्धा ६४ वर्षांत प्रथमच रत्नागिरीत होत आहे. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात सौ. सुर्वे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, मनोरंजन साधने बदलली तरी नाटकाची तिसरी घंटा झाल्यानंतर जे अंगावर शहारे येतात, तो अनुभव वेगळाच असतो. विष्णुदास भावे यांनी जे बीज रोवले, त्याचा आज खऱ्या अर्थाने वटवृक्ष झाला आहे. अंतिम स्पर्धा प्रथमच रत्नागिरीत होत आहे, त्याचाही आनंद होतो. रत्नागिरीतील रसिक चोखंदळ नाट्यप्रेमी आहेत. त्यांच्याकडून स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळेल, असेही त्या म्हणाल्या.
अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष समीर इंदुलकर म्हणाले, राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी रत्नागिरीत व्हावी म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद विश्वस्त आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्याच प्रयत्नांतून गेल्या वर्षीपासून नाट्य परिषदेने रमेश भाटकर स्मृती नाट्य स्पर्धा सुरू केली. त्यानंतर राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावरील प्राथमिक फेरीतील नाटकांची संघ्या ८ वरून १८ पर्यंत गेली, असेही ते म्हणाले.
ज्येष्ठ रंगकर्मी श्रीनिवास जोशी म्हणाले, राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी गेल्या ६३ वर्षांत प्रथमच रत्नागिरीत होत असून नाट्यकर्मी आणि रसिकांना ही मोठीच पर्वणी आहे. स्पर्धेत ज्यांचा क्रमांक येणार नाही, त्यांनी नाउमेद न होता पुढच्या वर्षासाठी जोमाने तयारी करावी.
सेन्सॉर बोर्डाचे सदस्य राजेश गोसावी, परीक्षक संजय हळदीकर, राजा अत्रे, पद्मनाभ पाठक, प्रिया नेर्लेकर, मंगेश नेहरे आणि सांस्कृतिक कार्य प्रतिनिधी मिलिंद शिंदे यावेळी उपस्थित होते. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून उद्घाटन समारंभाला सुरुवात झाली. सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रतिनिधी मिलिंद शिंदे यांच्या हस्ते पुस्तक देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. स्पर्धा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशीष शेलार, सांस्कृतिक कार्य विभाग सचिव आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून एकूण ४८ पारितोषिकप्राप्त संघ आपली कला सादर करणार असल्याचे समन्वयक नंदकिशोर जुवेकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.
पहिल्या दिवशी सादर होणाऱ्या अमर हिंद मंडळाच्या रेशनकार्ड या नाटकाचे लेखक दिग्दर्शक प्रथमेश पवार यांचे शासनाच्या वतीने नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे यांनी स्वागत केले.
राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे वेळापत्रक


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

