कोकणात प्रदूषणकारी प्रकल्प होणार नाहीत; ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

चिपळूण : ‘महायुतीचं सरकार दिलेल्या शब्दाप्रमाणे विकासासाठी काम करत असून, कोकण विकास प्राधिकरणासह कोकणाच्या प्रगतीसाठी अनेक योजना राबवल्या जाणार आहेत. कोकणाच्या विकासासाठी कुठेही हात आखडता घेतला जाणार नाही. शिवसेनेची नाळ कोकणाशी जुळलेली असून, कोकणवासीयांनी कायमच शिवसेनेला साथ दिली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीतही रत्नागिरी जिल्ह्यावर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे,’ असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी केलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये नुकतीच त्यांची प्रचारसभा झाली. शिवसेना उपनेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह शिवसेना भाजप महायुतीतील नेते आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

इटलीत बंदी घातल्याने बंद झालेला प्रदूषणकारी प्रकल्प चिपळूणजवळच्या लोटे-परशुराम एमआयडीसीमध्ये लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीत सुरू झाल्याबद्दल अनेक उलटसुलट बातम्या समाजमाध्यमांवरून व्हायरल होत आहेत. त्यावरून आंदोलनही छेडण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं, की ‘लोकांच्या आरोग्याला घातक असलेलं कोणतंही काम सरकार करणार नाही. प्रदूषणकारी प्रकल्पांना कोकणात आळा घातला जाईल.’ चिपळूणमध्ये भूस्खलनाची समस्या सोडवण्यासाठी संरक्षण भिंत बांधणं, कळवंडे धरण, क वर्ग पर्यटनस्थळांवरील छोट्या मंदिरांचं सुशोभीकरण अशा कोणत्याही कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. विकास हाच आपला अजेंडा असून, महिला बचत गटांसाठी व्यवसाय केंद्रं आणि प्रशिक्षण केंद्रांची उभारणीही केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

‘कार्यकर्ता हा प्रत्येक पक्षाचा कणा असतो. मी स्वतःही कार्यकर्ता आहे आणि म्हणूनच या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत प्रचारासाठी आलो आहे,’ असंही त्यांनी सांगितलं. सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहण्यात आली. लाडक्या बहिणींचेही एकनाथ शिंदे यांनी आभार मानले. ‘लाडक्या बहिणींनी विधानसभेत चमत्कार दाखवला. ही योजना सुरू करणं हे धाडस होतं. अडीच-पावणेतीन कोटी महिलांना त्याचा लाभ मिळतो. त्यासाठी वर्षाला ४५ हजार कोटी रुपये खर्च होतात. या योजनेत अनेकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला, टीका केली; पण त्यातून अनेक यशोगाथा घडल्याचं पाहता येतं. अनेक महिलांनी हेच पैसे पुन्हा अर्थव्यवस्थेमध्ये आणून चालना दिली. योग्य वेळ आली, की आम्ही २१०० रुपये देण्याचं आश्वासनही पूर्ण करू. आम्हाला बहिणींना स्वतःच्या पायावर उभं झालेलं पाहायचं आहे. लखपती झालेलं पाहायचं आहे,’ असं ते म्हणाले. महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत केली असून, लवकरच कर्जमाफीचा निर्णयही घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रत्नागिरी शहरातही प्रचारसभा

‘रत्नागिरी हा शिवसेना-महायुतीचा बालेकिल्ला असून, विकासाचा अजेंडा घेऊन महायुती काम करत असल्याने महाराष्ट्र वेगाने पुढे जात आहे. रत्नागिरीला सर्वांत जास्त निधी देण्यात आला असून, लाडक्या बहिणी पाठीशी उभ्या राहिल्या, म्हणून राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आली. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नसून, योग्य वेळी आम्ही रक्कम वाढवून २१०० रुपये करण्याचं आश्वासनही पूर्ण करणार आहोत,’ असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी आज रत्नागिरी शहरातल्या प्रचारसभेत केलं. या वेळी शिवसेना उपनेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, भारतीय जनता पक्षाचे अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्यासह महायुतीचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

ते म्हणाले, ‘आमच्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत. रत्नागिरीत अनेक योजना, अनेक प्रकल्प, तसंच परदेशी गुंतवणूक आली आहे. त्यामुळे रोजगार उपलब्ध होणार आहे. ग्रीनफिल्ड हायवेसह वेगवेगळ्या महामार्गांमुळे कोकणाचा कायापालट होणार आहे. ही ग्रामीण भागातील निवडणूक आहे. यातून आम्ही ग्रामीण भागाचा विकास करणार आहोत. महायुती सरकार सर्वसामान्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणण्यासाठी काम करत आहे.’ म्हणूनच जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला निवडून द्यावं, असं आवाहन त्यांनी केलं.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply