तीन फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये ऋग्वेद संहिता स्वाहाकार; फडकेशास्त्रींच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांकडून आयोजन

दिवंगत वेदमूर्ती फडकेशास्त्री

चिपळूण : तीन फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत चिपळूणमधील श्री. फडके गुरुजी पुरोहित मंडळाने ऋग्वेद संहिता स्वाहाकाराचे आयोजन केले आहे. दिवंगत वेदमूर्ती दिनकरशास्त्री जनार्दन फडके यांच्या स्मरणार्थ त्यांच्या विद्यार्थ्यांनी हा स्वाहाकाराचा कार्यक्रम ठरवला असून, चिपळूणमधील श्री लक्ष्मीनारायण देवस्थानाच्या प्रांगणात तो होणार आहे.
चिपळूणमध्ये अनेक वर्षे पौरोहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या वेदमूर्ती फडकेशास्त्रींनी वेदशास्त्रांचे शिक्षण देऊन अनेक विद्यार्थी घडवले. वेदमूर्ती फडकेशास्त्री हे केवळ चिपळुणातीलच नव्हे, तर संपूर्ण कोकणभूमीतील आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना वेदशास्त्रसंपन्न केले. तसेच, आपल्या निःस्पृह वृत्तीने त्यांनी अनेक व्यक्तींना, संस्थांना सढळ हस्ते मदतही केली. आपल्या विद्यार्थ्यांकडून ऋग्वेद संहिता स्वाहाकार घडावा, अशी त्यांची इच्छा होती. त्याची पूर्वतयारी म्हणून विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण परिसरात काही याग केले. नंतर ऋग्वेद संहिता स्वाहाकार करण्याचेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ठरवले; मात्र १७ मे २०२५ रोजी त्यांचे निधन झाले. तसेच, नुकतेच १८ जानेवारी २०२६ रोजी त्यांच्या पत्नी श्रीमती मंगला फडके यांचेही वृद्धापकाळाने निधन झाले.

आपल्या गुरुजींची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या विद्यार्थ्यांनी म्हणजेच श्री फडके गुरुजी पुरोहित मंडळाने तीन ते नऊ फेब्रुवारी २०२६ या काळात या ऋग्वेद संहिता स्वाहाकाराचे आयोजन केले आहे. हा यज्ञ प्रत्यक्षात होत असताना गुरुजी नाहीत याची मनाला खंत आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून आम्ही ऋग्वेद संहिता स्वाहाकार करत आहोत, अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. श्री लक्ष्मीनारायण देवस्थानाच्या सहकार्याने हा यज्ञ मंदिराच्या प्रांगणात होणार असून, भाविकांनी यासाठी अवश्य उपस्थित राहावे, असे मंडळाने कळवले आहे. या यज्ञासाठी कोणी स्वेच्छेने सहकार्य करणार असेल, तर ते स्वीकारले जाईल, असेही मंडळाकडून सांगण्यात आले आहे. कार्यक्रमाचे वेळापत्रक सोबत दिले असून, संपर्क क्रमांक शेवटी दिले आहेत.
वेळापत्रक
दोन फेब्रुवारीला
सकाळी नऊ वाजता प्रायश्चित्तविधी होणार आहे. तीन ते आठ फेब्रुवारी या कालावधीत दररोज सकाळी सात ते दुपारी १२ आणि सायंकाळी सहा ते रात्री १० अशा दोन सत्रांमध्ये कार्यक्रम होणार आहेत.
तीन फेब्रुवारीला सकाळी गणेशपूजन होणार आहे, तर सायंकाळी आरती, मंत्रपुष्प आणि अष्टावधान सेवा होणार आहे.
चार फेब्रुवारीला सकाळी अग्निमंथनाने संहिता स्वाहाकाराला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. त्या दिवशी सायंकाळी मंत्रजागर, आरती, मंत्रपुष्पासह सौ. आर्या चितळे नृत्यसेवा सादर करणार आहेत.
नऊ फेब्रुवारीपर्यंत सहा दिवस दररोज सकाळच्या सत्रात संहिता स्वाहाकाराचे विधी होतील.
पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत अनामय बापट गायनसेवा सादर करणार असून, प्रथमेश देवधर आणि वरद केळकर त्यांना साथसंगत करणार आहेत. त्या दिवशी सहा वाजल्यानंतर ब्रह्मणस्पती सूक्त दूर्वार्चन, आरती, मंत्रपुष्प होणार आहे.
सहा फेब्रुवारीला सायंकाळी आरती, मंत्रपुष्पाबरोबरच पुण्याच्या डॉ. अनघा जोशी यांची प्रवचनसेवा होणार आहे.
सात फेब्रुवारीला सायंकाळच्या सत्रात आरती, मंत्रपुष्पाबरोबरच रत्नागिरीच्या ह. भ. प. सौ. सायली मुळ्ये-दामले यांची कीर्तनसेवा होणार आहे.
आठ फेब्रुवारीला सायंकाळी मंत्रजागर, आरती मंत्रपुष्प हे कार्यक्रम होणार आहेत.
सोमवारी, नऊ फेब्रुवारीला संहिता स्वाहाकाराचा अखेरचा, म्हणजे सहावा दिवस असून, सकाळी ११ वाजता पूर्णाहुती आणि नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आहे.
संपर्क : हेमंत मोने गुरुजी 9960063603
विश्वास भिडे गुरुजी 8380962658 (गुहागर)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply