महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात सोलापूर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनीने बरड हे शेतकऱ्यांच्या जीवनातील संघर्षाचे नाटक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सादर केले.
गावातील शेतकरी कुटुंबाच्या वाट्याला आलेल्या जमिनीचेही तुकडे होत आहेत. दोन भावांच्या भांडणात वर्षानुवर्षे सुपीक जमीन पडीक होताना दिसते. हेच वास्तव राज्य नाट्य स्पर्धेत ‘बरड’ या नाटकातून महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनीने सादर केले. मनाला भिडणारी शेतकऱ्याची व्यथा लेखक सुनील पोपट डोंगर यांनी साकार केली. शेतकऱ्याच्या वडिलोपार्जित जमिनीच्या हिस्सा, वाटप, विधवा बहिणीची व्यथा कलाकारांनी साकार केली. गावातील शेतकरी कुटुंबाचे भावविश्व उभे करण्यात संस्था यशस्वी झाली.
बरड नाटकाची कथा आजकालच्या ग्रामीण भागात घडणारी आहे. एका कुटुंबात दोघे भाऊ आणि विधवा बहीण असते. वडिलोपार्जित जमिनीचा हिस्सा मोठ्या भावाकडे जास्त असतो. त्यामुळे लहान भाऊ पाणवठ्यावरिल आठ एकर जमिनीचा हिस्सा पाहिजे, अशी मागणी करतो. यासाठी मास्तर व गावकरी अनेक वेळा बैठका घेतात; पण यावर तोडगा निघत नाही. भाऊ तुका याला मान्यता देत नाही. लहान भाऊ नोकरी असल्याने तो सधन असतो. पण शेती करत नाही. बहीण-तायडीचे लग्न झाल्यानंतर तिचा पती घरातील भांडणांमुळे आत्महत्या करतो. त्यामुळे परत आलेली बहीण तुकाच्या घरीच अनेक वर्षे असते. पण तिची वहिनी ती विधवा असल्याने तिला त्रास देते. पण ती मूग गिळून आपले जीवन कंठत असते.
या कुटुंबांचे आणि परजातीतील बाळ्याचे घरोब्याचे संबंध असतात. एके दिवशी बाळ्या तायडीला दुचाकीवरुन घेऊन जातो, असे मास्तर तुकाला सांगतो. तुका घरात येऊन तायडीला मारतो, पण तिच्या भावना ओळखत नाही. तिचे बाळ्याबरोबरचे प्रेम त्याला पाहवत नाही. तायडी अनेक वर्षे गावात भावाचे नाक खाली जाईल, असे कृत्य करत नाही. पण घरातील जाचामुळे ती लग्नाला प्रवृत्त होते. यावेळी वहिनी तिला समजावते. बाळ्या चांगला मुलगा आहे. तुझ्या भावना मला कळतात. मी तुझ्या भावाशी बोलेन, असा आशीर्वाद देते.
इकडे तुका ही घरची गोष्ट असल्यामुळे सख्खा भाऊ-अजिनाथ याला सांगतो. पण त्यावेळीही अजिनाथ पाणवठ्यावरील जामीन देत असशील तर या भानगडीत मी पडेन, नाहीतर तुमचे तुम्हीच बघा, असे सुनावतो. शेवटी तुका ती जमीन देण्यास तयार होतो. पुन्हा मास्तरांसोबत बैठक होते. तुका आणि अजिनाथ दोघेही ती जमीन कसणार असल्याचे सांगतात. दोघा भावांमधील वाद मिटतो. सर्वजण नारळ फोडतात. त्याचवेळी दोघे गावकरी येतात आणि बाळ्याचा अपघात झाला आणि त्याचा मृत्यू झाल्याचे सांगतात. जमिनीप्रमाणेच तायडीचे जीवन बरड झाल्याची कथा या नाटकात साकारण्यात आली आहे.
श्रेयनामावली
लेखक : सुनील पोपट डोंगर, दिग्दर्शक : अनिल कोलप, संजीव कुमार, तृप्ती मुधोळकर, तंत्रज्ञ : मनीषा देसाई, आसावरी कुलकर्णी, प्रियांका धांदे, प्रकाशयोजना : सुचिता भिकाणे, राजू गायकवाड, भरत पाटील. रंगभूषा : शिल्पा कुंभार, ज्योती चिमटे, नेपथ्य : विठ्ठल भुजबळ, जयवंत कोकाटे, राम शेळके,
पात्रपरिचय
तुका : प्रताप भोसले
तायडी : रूपाली राऊत
बाळ्या : महेश भागवत
अजिनाथ : नितीन धनवे
सुरकी : अनुजा जाधव
मास्तर : रोहित झिरकांडे
दीदी : शर्वरी मराठे
आनंदा : पुंजाजी पाटील
अजिनाथचा मित्र- प्रकाश सूर्यवंशी,
गावकरी : १-अनिरुद्ध जाधव, २-नितीन बोरले, ३- किशोर झगडे







कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

