निर्वासित : चाकरमानी कुटुंबाच्या जुन्या-नव्या पिढीतील संघर्ष

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात मुंबईतील मोरया प्रतिष्ठाननेनिर्वासित हे चाकरमान्यांच्या जीवनाविषयीचे नाटक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सादर केले.

कोकणातून मुंबईत गेलेल्या जुन्या पिढीतील चाकरमानी कुटुंब आणि कुटुंबातील पुढच्या पिढीतील संघर्ष निर्वासित या नाटकातून मांडण्यात आला आहे.

निर्वासित हे स्वप्नील जाधव लिखित व महेंद्र दिवेकर दिग्दर्शित नाटक ‘निर्वासित’ रंगमंचावर सादर केले गेले. हसोळ (ता. राजापूर) येथून नोकरीसाठी वयाच्या तेराव्या वर्षी मुंबईत गेलेल्या संतोष हसोळकर या चाकरमान्याच्या कुटुंबाची ही कथा. मुंबईत गेल्यावर प्रसंगी फुटपाथवर झोपून मिळेल ते काम करून त्याने शेवटी मुंबई म्युन्सिपालिटीच्या स्वच्छता विभागात सफाई कामगार म्हणून नोकरी मिळवली. त्यामुळे त्याला कर्मचारी वसाहतीत राहावयास जागा मिळाली. आपण भोगलेले कष्ट आपल्या मुलांना भोगायला लागू नयेत, या इच्छेने त्याने आर्थिक ओढाताण करून मुलगा मयूरला इंग्रजी माध्यमातून, तर मुलगी दर्शनाला मराठी माध्यमातून शिक्षण दिले.

संसाराचा गाडा हाकताना संतोष, पत्नी आणि दोन मुलांना वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणींचा सामना करावा लागतो. घरामध्ये संतोष व मयूर यांची यावरुन वारंवार भांडणे होतात. लवकरच येणाऱ्या निवृत्तीनंतर कर्मचारी वसाहतीतील जागा सोडावी लागणार असल्याने गावाकडे जाऊन राहावे लागणार हे ओळखून संतोष वारंवार गावाकडे जाऊन तेथील घराची डागडुजी व आवश्यक गोष्टींची पूर्तता करत असे. मुलगा मयूरला वडिलांनी गावाकडच्या त्या जुन्या घरावर एवढा खर्च करणे अजिबात पटत नाही. त्यावरूनच त्यांच्यात वारंवार खटके उडत.
मयूरचे लग्न ज्यांच्या मुलीशी ठरले आहे ते शिरोडकर सुरुवातीला मयूर जावई म्हणून पसंत आहे, लवकरच साखरपुडा करू अशी आनंद वार्ता घेऊन येतात. मात्र नंतर मयूर बिल्डरकडून फसविला गेल्याचे कळताच मयूरला उसनवार दिलेले दोन लाख रुपये मागण्यास लगेच येतात. मुलाचे देणे संतोष एकरकमी भागवतो, पण शिरोडकर मात्र आपली मुलगी मयूरला देऊ शकत नाही असे सांगून निघू जातो.

संतोषच्या बरोबरचे महापालिकेतील अन्य कर्मचारी कांबळे हे पात्रही संतोषला वारंवार मदत करत असते. कांबळे कॉलनीत एकटेच राहत असतात. त्यांच्या पत्नीचे दीर्घ आजाराने आणि मुलीचे अपघाताने निधन झाले असते. त्यामुळे हसोळकर कुटुंब हाच त्यांना आधार असतो. कांबळे संतोषसोबतची मैत्री शेवटपर्यंत जपतात सुख-दुःखात शेवटपर्यंत साथ देतात.

संतोष हसोळकरांची मुलगी दर्शनाची कंपनी बंद पडल्यामुळे नोकरी सुटते. ती नवीन नोकरीच्या शोधात असते. त्यातच तिच्या विवाहाचा प्रयत्न आई-वडील करत असतात. मात्र दर्शनाला फक्त मुख्य मुंबईतलाच मुलगा लग्नासाठी हवा असतो, विरार, बोरिवली इत्यादी दूरवर ट्रेनने प्रवास करताना महिलांचे हाल तिने पाहिलेले असल्याने ती आपल्या विवाहाचा विषय पुन्हा काढू नका, असे आई-वडलांना निक्षून सांगते.

हसोळकरांच्या गावाकडील ओढीमुळे वीज कनेक्शन त्यांना अनेक दिवस उपलब्ध होत नव्हते. ते लवकर होण्यासाठी ते दोन लाख रुपये वीज मंडळातील एका अधिकाऱ्याला लाच देतात मात्र तो अधिकारी त्यांना फसवतो. त्यांचे दोन लाख रुपयेही जातात. वीज कनेक्शनही मिळत नाही. हसोळकर हताश होऊन मुख्यमंत्र्यांकडे याबद्दलची तक्रार करतात व आत्महत्येचा मार्ग स्वीकारायचे ठरवतात.

हसोळकरांचा मुलगा मयूर शिक्षित आहे. त्याला नोकरी आहे. परंतु विचार वेगळे असल्याने त्याचे हसोळकरांशी वारंवार टोकाचे वादाचे प्रसंग घडतात. तो नवीन घरासाठी वडील पैसे देत नसल्याने तो वडिलांवर रागावलेला असतोच. लाच म्हणून द्यायला वडिलांकडे पैसे आहेत, पण डोंबिवलीत घर घ्यायला ते पैसे देत नाहीत, याचाही त्याला राग असतो. ते पैसे तो सासऱ्यांकडून उसनवारीने घेतो. मात्र पण बिल्डरने फसवल्याने ते पैसे वडिलांना परत करावे लागता. शिवाय विवाह मोडल्याने तो निराश व वैतागलेला असतो.

नाटकाच्या शेवटाकडे पुन्हा हसोळकर कुटुंबात मयूर व संतोष यांचे जोरदार भांडण होते. त्यावेळच्या स्वगतात संतोष त्याच्या बालपणापासूनचा कष्टाचा ऊहापोह करतो. बीएमसीत नोकरी असल्याने सर्व भावंडांची जबाबदारी, त्यांची लग्ने, त्यांची कर्ज फेडताना कसे हाल झाले हे सांगतो. त्यानंतर संतोष गावाकडे कायमचे जायचा निर्णय घेतो. सामानाची बांधाबांध होत त्याचवेळी कु. दर्शनाला नोकरी मिळाल्याची आनंदाची बातमी ती घेऊन येते. पण संतोषने सामानाची बांधाबांध करून गावाकडे जायचा निर्णय घेतलेला असतो. मयूर व दर्शना मुंबईतच राहाणार असल्याने मयूरला आत्मविश्वास देतात. काही पैसे देतात व तुम्ही यशस्वी व्हा. एकमेकांना सांभाळा असा आशीर्वाद देतात आणि निघतात. नाटकाचा शेवट होतो.

नाटकातील मयूर व दर्शना भूमिका करणाऱ्या कलाकारांनी आपल्या पात्रांना योग्य न्याय दिला आहे, संतोषची मध्यवर्ती भूमिका दिग्दर्शकाने स्वतःच केलेली आहे. ती दमदार झाली आहे. संतोषच्या पत्नीची भूमिकाही योग्य वठवली आहे. मात्र तिचा अधिकाधिक वेळ स्वयंपाकघरात त्यातही गॅसच्या जवळच जातो, हे तसे खटकते.

कर्मचारी वसाहतीतील खोलीचे नेपथ्य चांगले होते, फ्रिज, कपाट, ओटा, शेगडी इत्यादींचा समावेश त्यात होता. रंगभूषा, वेषभूषा, प्रकाशयोजना, संगीत या बाबीही आवश्यकतेनुसार होत्या.

श्रेयनामावली
मोरया प्रतिष्ठान, मुंबई
लेखक- स्वप्नील जाधव
नेपथ्य- रजनीश कोंडविलकर
पार्श्वसंगीत- महेंद्र मांजरेकर
दिग्दर्शक- महेंद्र दिवेकर
प्रकाशयोजना- श्याम चव्हाण
रंगभूषा – अनिल कासकर
वेशभूषा- अर्जुन खामकर, वैशंपायन
रंगमंच व्यवस्था : नीलेश गायकवाड, दत्ताराम जाधव, रवींद्र नवले, सेजल कांबळे

विशेष साह्य : श्री. विनायक गवस (उपप्रमुख अभियंता), सौ. प्रांजली नेमाडे (सहायक अभियंता), नरेश गुरव (दु. अभि.) उपप्रमुख अभियंता (मलनिस्सारण), कार्यशाळा शहर कर्मचारी आनंद सामंत, मंगला जाधव, अमोल खैरे

पात्रपरिचय
आई : मीनाक्षी पोकळे
मयूर : नयन प्रभू
दर्शना : समृद्धी कोटगी
बाबा: महेंद्र दिवेकर
शिरोडकर : नाना कांबळे
कांबळे : अर्जुन खामकर
चाळकरी : पंकज दिवेकर, सेजल कांबळे, दत्ताराम जाधव, भालचंद्र पांचाळ, मंथन जाधव, अनवी पांचाळ, किरण शेट्टये, प्रथमेश भाट, तनिषा शितप, सिद्धी मिरगल, नीलेश गायकवाड

(शब्दांकन : प्रसाद वैद्य, ९४२०१ ५५३३३)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply