Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

राहिले दूर घर माझे : फाळणीच्या पार्श्वभूमीवरील सुखान्त कथा

Advertisements

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी राजश्री विश्वकल्याण मल्टीपर्पज सोसायटी, सोलापूर या संस्थेने ‘राहिले दूर घर माझे’ हे नाटक सादर केले.

नाटकाची कथा वेदनादायी पार्श्वभूमीवर उभी आहे. त्यामुळे हे नाटक नाजूक आणि हळव्या भावविश्वाला स्पर्श करते. फाळणीमुळे सीमा बदलल्या मात्र घराची ओढ बदलली नाही, बदलत नाही, असा संदेश हे नाटक देते. त्याचबरोबर धर्माच्या पलीकडे माणुसकीही असते, याचे दर्शन नाटकात घडते

१९४७ साली भारताची फाळणी झाली आणि त्यावेळी हिंदुस्थानातील कासिम व त्याचे कुटुंबीय पाकिस्तानमधील लाहोरमध्ये आले. त्यांना सरकारकडून एक हवेली दिली जाते. त्या हवेलीचा ताबा घेण्यासाठी कासिम, हमीदा, मुलगा जावेद, मुलगी तन्नो हवेलीमध्ये येतात. हवेली पाहत असताना, तन्नो माडीवरच्या एका खोलीत जाते व घाबरून बाहेर येते, कोणीतरी तिथे आहे असे सांगते. सगळेजण पाहायला लागतात. खोलीतून वयस्क झालेल्या माई बाहेर येतात. त्या या सगळ्यांना पाहून, ”कोण आहात तुम्ही, माझ्या घरात का घुसला आहात?” असे विचारतात. कासिम त्यांना सरकारकडून राहण्यासाठी ही हवेली मिळाली आहे, असे सांगतो. माई म्हणतात, ”ही हवेली माझी आहे. तुम्ही बाहेर पडा.”

कासिम पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडे जातो. ते त्याला आम्ही लवकरच दुसरी हवेली देतो, माईला घराबाहेर काढून नका, असे सांगतात. कासिम घरी येतो. माई त्यांना सांगते, ”मी एकटीच येथे राहते. तुम्ही इथे राहा.”

तन्नो पहिल्या भेटीतच माईला दादी अशी हाक मारते, यामुळे तिच्याविषयी माईंना ओढ वाटते. तिला तिची राधा भेटल्याचा आनंद होतो. तन्नोचे हात हातात घेतल्यावर माईला माणसाचा स्पर्श झाल्याचे समाधान मिळते.

सुरवातीला माईला हवेलीतून हुसकून कसे लावायचे, याचा प्रयत्न जावेद व कासिम करतात, उस्ताद गुंड तिला हुसकावून लावण्यासाठी पैसे मागतो. मात्र हमीदा असे करण्याला विरोध करते. एकदा उस्ताद गुंड मोहम्मद शहा याला घेऊन येतो व ”माई राहत असलेल्य हवेलीच्या वरचा भागात याला राहू द्या, आम्ही माईला हुसकावून लावतो”, असे कासिमला सांगतो. त्यावर कासिम म्हणतो, ”माझ्या नावाने पूर्ण हवेलीचा ताबा आहे. माईचं काय करायचं ते आम्ही पाहू. तुम्ही त्यात पडू नका.” तो त्यांना हाकलून देतो. माई हे पाहत असते, ती कासिमच्या पूर्वायुष्याची आस्थेने चौकशी करते.

कासिमचा हिंदुस्तानात हातमागाचा कारखाना असतो. चाळीस कामगार कामाला असतात, ”पण फाळणीमुळे आम्हाला इकडे यावं लागलं”, असे कासिम सांगतो.

कासिमला विचारून माई दिवाळीचा सण साजरा करायचे ठरवतात. सगळेजण तयारी करून दिवाळीचा सण आनंदाने साजरा करतात. माई सर्वांना मिठाई वाटते. नासीरही माईला दिवाळी शुभेच्छा द्यायला हवेलीवर येतो. त्याला शायरीचा शौक असतो आणि माईविषयी आदर असतो. माई मोहल्ल्यातील सर्वांना मिठाई वाटायला निघते. नासीरही माईबरोबर मिठाई वाटायला जातो.

जावेदला दिवाळीच्या दिवशी हिंदुस्थानातल्या मित्रमैत्रिणींची खूप आठवण येत असते. त्याची एक हिंदू मैत्रिण होती, मात्र फाळणी झाल्यापासून ती त्याच्याशी बोलायचीही बंद झाली होती, याची त्याला खंत होती. यावर तन्नो त्याला विचारते, ”म्हणून तू दादीची नफरत करतोस काय?” तो निरुत्तर होतो.

कासिम, तन्नो, हमीदा यांच्याशी माईची घट्ट जवळीक झालेली असते. पण जावेद जरा अलिप्त असतो, हळूहळू कासिमने लाहोरमध्ये नवीन उद्योग-व्यवसाय सुरू केलेला असतो. सगळे स्थिरस्थावर होत असते आणि तन्नोच्या लग्नासाठी एक मुलगा पाहिला जातो. मुलाकडील लोक तन्नोला पाहण्यासाठी येणारच असतात. मात्र अचानक ते निरोप पाठवतात की, ज्या हवेलीत हिंदू देवदेवतांची पूजा चालते, तेथे आम्हाला रिश्ता नको! तन्नोचा विवाह मोडतो, याबद्दल तन्नोच्या आईला माईचा राग येतो ती माईला खूप टाकून बोलते, माई दुखावते.

त्या रात्रीच माई हवेली सोडण्याचा व हिंदुस्तानला जाण्याचा निर्णय घेते. ती घराबाहेर पडणार तेवढ्यात नासीर तेथे येतो, माई त्याला हिंदुस्तानला जाण्याची व्यवस्था कर असे सांगते, तो माईला खूप समजावतो, आम्ही मोहल्लावाले तुम्हाला ‘माई’ म्हणतो. तुम्ही जाऊ नका, असे विनवतो. तन्नो जागीच असते. ती बाहेर येऊन माईला मिठी मारते व जाऊ नको, असे विनवते. कासिम, जावेद येतात, कासिम म्हणतो, ”तुम्ही आमच्या घरातील मोठ्या आहात. एवढा मोठा निर्णय तुम्ही एकट्याने कसा काय घेतला? आत्ता आमचा इथे जम बसतोय. तेव्हा आम्हाला सोडून जायचं नाही.”

इतके दिवस दूर राहणारा जावेदही माईंना विनवणी करतो. ”माझं चुकलं असेल तर क्षमा करा, पण जाऊ नका.” सगळ्यांचे प्रेम पाहून माई हिंदुस्तानला जाण्याचा निर्णय रद्द करता. माई तन्नोला सांगते, ”आतापर्यंत मी कोणालाही जात/धर्म न पाहता घरगुती औषधे देत असे तो औषधाचा बटवा मी तुझ्या स्वाधीन करते. आता हे काम तू करायचंस.”

दरम्यान, अतिरेकी विचाराच्या उस्ताद गुंडाने कारस्थान केलेले असते. तो हवेलीवर मोर्चा आणतो. आता मात्र तन्नो धिटाईने पुढे होते व मोर्चाला थोपवते. इथेच नाटक संपते.

नेपथ्यरचनेत माईंची सुरुवातीची हवेली व कासिम राहायला आल्यावर बदललेली हवेली यातील फरक लक्षात येण्यासारखा, अलीम चहावाल्याची टपरीही ठीक. पार्श्वसंगीतही यथायोग्य.

कलाकारांनी आपापल्या भूमिका उत्तम अभिनयाने वठवल्या आहेत. संवेदनाशील प्रसंग व प्रभावी संवाद त्यात अधिक भर घालतात. प्रसंगी प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहातात.

श्रेयनामावली
नाटक – राहिले दूर घर माझे
संस्था – राजश्री विश्वकल्याण मल्टीपर्पज सोसायटी, सोलापूर.
लेखक : शफाअत खान
निर्माता : जुबेर हिप्परगी
दिग्दर्शक : शिवप्रसाद चिक्का
प्रकाशयोजना : देवदत्त सिद्धम
संगीत : अनुद सरदेशमुख
नेपथ्य : श्रावण डावरे
वेशभूषा : सुजाता चिक्का
रंगभूषा : ओमप्रकाश श्रावण
मार्गदर्श कः राजेश जाधव
सूत्रदार : सुमित फुलमामडी
रंगमंच व्यवस्थापक – मिलिंद पटवर्धन,
ज्ञानेश्वर घोडके, नितीन डावरे, सचिन डावरे,
विक्रम, कृष्णा, वैभव सुरवसे, तेजस, रवि, आनंद

पात्रपरिचय
तन्नो – विजयालक्ष्मी कोकणे
नासीर – अजिंक्य वाईकर
उस्ताद – संजय तिन्हेकर
मौलाना – अविनाश चव्हाण
रजा – आदिनाथ हरणावळे
हमीदा – गंगाक्का गुड्ड्डुर
जावेद – शिवप्रसाद चिक्का
कासिम – विजयकुमार राकले
माई – दीप्ती इंगळे-सिद्धम
अलीम – निखिल काळे
मोहम्मद शहा – जुबेर हिप्परगी

(शब्दांकन : प्रसाद वैद्य, ९४२०१ ५५३३३)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version