सूर-साज – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी केंद्र

आजचे नाटक (२५ मार्च २०२२, रात्री ८.०० वाजता) – सूर-साज

सादर करणारी संस्था – श्रुती मंदिर, सोलापूर

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे रत्नागिरीत साठावी संगीत राज्य नाट्य स्पर्धा १० मार्च ते २७ मार्च दरम्यान होणार आहे. हौशी रंगभूमीवरील संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या नाट्य कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरते. या वर्षी स्पर्धेत महाराष्ट्राच्या आणि गोव्याच्या एकूण सोळा संघांनी प्रवेश घेतला आहे. रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात दररोजचे नाट्यप्रयोग होतील. (स्पर्धेचे प्रयोगपंचांग शेवटी दिले आहे.)

आज २५ मार्च २०२२ रोजी रात्री ८.०० वाजता सूर-साज हे नाटक श्रुती मंदिर, सोलापूर या संस्थेने सादर केले.

श्रुती मंदिरची स्थापना सोलापूरमधील जुने, जाणते, संगीत नाटकातील कलाकार स्व. पद्माकर देव यांनी १७ फेब्रुवारी १९६४ रोजी केली. द्विपात्री संगीय स्वयंवर आणि संगीत मानापमान या नाटकांचे त्यांनी महाराष्ट्रभर प्रयोग केले. संस्थेतर्फे १५ जुलै रोजी बालगंधर्व स्मृतिदिन, नाट्यवाचन, बालनाट्य, एकांकिका, गद्य नाटक, संगीत नाटक इत्यादी रंगभूमीशी संबंधित उपक्रम राबविले जातात.

सूर-साज हे संगीत नाटक म्हणजे एक प्रेमकथा आहे. एका संस्थानातील गायक आणि बीनवादक खान साहेब हा नायक त्याच्याही नकळत त्या संस्थानाची राजगायिका पन्नाच्या प्रेमात पडतो आणि ही अवीट प्रेमकथा पन्नाचे मरण आणि तिच्या प्रेमात बुडालेल्या खानसाहेबांना वेड लागणे अशी घडते. हे कथानक वास्तव जीवनात एका कलाकाराच्या आयुष्यावर आधारित आहे.

नाटकाविषयी थोडेसे…

श्रुती मंदिरतर्फे रत्नागिरीतील राज्य संगीत नाट्य स्पर्धेत सादर होणारा सूर-साज नाटकाचा प्रयोग खास स्पर्धेसाठी लिहिला आहे. भास्कर चंदावरकरांच्या एका पुस्तकात कला आणि कलाकार यांच्याविषयी माहिती वाचताना जागतिक कीर्तीचे बीनवादर बंदे अली खानसाहेब यांच्याविषयीची चार-पाच ओळींची एक कथा वाचनात आली. त्यानंतर कुतूहलाने बंदे अलीखाँविषयी मिळेल तेथून माहिती गोळा करण्याची सुरवात झाली. त्या चार-पाच ओळींचे कथानक इतके वेधक आणि बांधीव होते की त्यावर काहीतरी काम करावे, हा मोह अनावर झाला, पण बीन (वीणा) कुठे मिळणार, याचा शोध घेताना जाणले की, ही सहज मिळणारी गोष्ट नाही. म्हणून वीणा तयार करण्याचाही घाट घातला. त्यानंतर संहिता तयार करण्याचा प्रवास सुरू झाला. त्यात वादक कलाकरा, बीनवादनाची पद्धत, गायक, इतर कलाकार यांची योग्य साथ घेऊन स्पर्धेच्या स्थानापर्यंत येऊन पोहोचलो. हा झाला लेखक म्हणून प्रा. विद्या काळे यांचा प्रवास. त्यात २००६-०७ साली अगदी पहिले संगी नाटक त्यांनी लिहिले. ना पत्नी ना माता या त्या नाटकाला स्पर्धेतून लेखनासह संगीत दिग्दर्शन, सांघिक स्त्री रौप्यपदक अशी एकूण ७ बक्षिसे मिळाली. त्यानंतर प्रत्येक वर्षी प्रा. काळे संगीत नाटक लिहीत आणि दिग्दर्शन करत आहेत.

सूर-साज हे त्यांचे नववे संगीत नाटक आहे. या प्रत्येक नाटकाचा पहिला प्रयोग स्पर्धेतच सादर केला गेला. आतापर्यंत तीन वेळा लेखनासाठी असलेले पारितोषिक प्रा. काळे यांना मिळाले आहे. या यशामागे आई-वडील आणि आपल्या गुरूंचा फार मोठा वाटा असल्याचे त्या नम्रपणे नमूद करतात. गायक, वादक आणि इतर कलाकारांचेही योगदान त्याच महत्त्वाचे मानतात.

श्रेयनामावली :

लेखक, दिग्दर्शक : प्रा. विद्या काळे
संगीत दिग्दर्शक आणि ऑर्गन : ओंकार पाठक
तबलासाथ : गुरुराज अलमेलकर
पखवाजसाथ आणि पार्श्वसंगीत : पवन व्हनकडे
रंगभूषा : विश्वेश धामणीकर
वेशभूषा : प्रशांत कुलकर्णी
ध्वनिसंयोजन : प्रकाश कासेगावकर
नेपथ्य : वेणू धोत्रीकर
सहायक : नीलिमा वळसंगकर
प्रकाशयोजना : मोहन आगवणे
ध्वनिसंयोजन सहायक : सुधीर सामबोळ
सहायक : आदित्य पुजारी

भूमिका आणि कलावंत :
खानसाहेब : वैभव केंगार
पन्ना : अपूर्वा ओक
रक्षक : विठ्ठल पुजारी
नाज : रिद्धी बुवा
सरदार : चिदंरप्रसाद अक्कल, मुकेश जमादार, वेणुगोपाल धोत्रीकर
सचिव : ओंकार कोप्पा
शिपाई (सेवक) : श्रेयस कोणदे
मुराद : जेद शेख
जियाजीराजे : शुभम दोडतले
सेवक : दीपक शिंदे
माधोसिंग : पवन व्हनकडे
नारायणबुवा : अनंत आकोलकर
कृष्णाबाई : केतकी रानडे
वैद्य मेहेंदळे : सुभाष कटगेरी
शेजारी : गणेश कोप्पा, चिंगा जमादार, वासुदेव अक्कल, मुकीद वळसंगकर

स्पर्धेचे वेळापत्रक

२६ मार्च (सकाळी १०.३० वाजता) – कामगार अधिकारी कार्यालय, बृहन्मुंबई महापालिका, मुंबई, संगीत गंधर्वगाथा, लेखक : प्रदीप ओक, दिग्दर्शक : संदेश जाधव.

२७ मार्च – वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली, तुका म्हणे आता, लेखक : पु. ल. देशपांडे, दिग्दर्शक : रघुनाथ कदम.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply