मालवण : त्रिंबक (ता. मालवण) येथील कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत रसिका तेंडोलकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
दादा ठाकूर स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा जनता विद्यामंदिरात पार पडली. स्पर्धेचा निकाल असा – प्रथम – सौ. रसिका राजेंद्र तेडोलकर, कसाल, कुडाळ द्वितीय – हेमंत मोतीराम पाटकर, कणकवली, तृतीय – सौ. उज्ज्वला चंद्रशेखर धानजी, कणकवली, उत्तेजनार्थ – श्रीमती श्रेया उमेश कुलकर्णी, ओरोस, कुडाळ.
विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे २०००/-, १५००/-, १०००/- आणि ५००/- रुपयांच्या रोख पारितोषिकांसह सन्मानचिन्हे आणि प्रमाणपत्रे देण्यात आली. सहभाग उत्तेजनार्थ म्हणून योगेश रवींद्र मुणगेकर, आचरा, मालवण, सुधाकर महादेव वळंजू, पणदूर, कुडाळ, काशीराम बाळकृष्ण अपराज, चिंदर, मालवण यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोकण मराठी साहित्य परिषद मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी भूषविले. स्पर्धेचे परीक्षण श्रीमती मधुरा माणगावकर, कणकवली आणि श्रीमती ऋतुजा केळकर, मालवण यांनी केले. प्रास्ताविक कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालयाचे अध्यक्ष सुरेंद्र सीताराम सकपाळ यांनी केले. त्यांनी स्पर्धेची रूपरेषा सांगितली. या स्पर्धेचे उद्घाटक हे जिल्ह्यातील कोणत्याही वाचनालयाचे ग्रंथपाल असतात. म्हणजे ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना हा मान प्रतिवर्षी दिला जातो, ही या स्पर्धेची विशेष बाब आहे.
यावेळी चंद्रशेखर धानजी, अरविंद कदम, रमाकांत शेट्ये, एकनाथ गायकवाड, दोन्ही परीक्षक उपस्थित होते. अध्यक्ष पदावरून बोलताना श्री. ठाकूर गुरुजी यांनी स्पर्धेचे कौतुक करताना सांगितले की कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालयाच्या या वक्तृत्व स्पर्धेचे संयोजन आणि नियोजन प्रतिवर्षी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला मार्गदर्शक असे करण्यात येत असते. सर्व स्पर्धक उत्तमच होते. सादरीकरणही उत्तम केले. आणखी उत्तम प्रकारे स्पर्धेत सादरीकरण कसे करावे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. अशी स्पर्धा प्रतिवर्षी होणार असल्याचेही जाहीर केले.
कार्यक्रमासाठी ग्रंथपाल विवेक ऊर्फ बंडू जाधव, सहाय्यक ग्रंथपाल श्रीमती चैताली सुतार, लिपिकचैताली गोसावी, ग्रंथालयीन कर्मचारी समिधा जाधव यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ गायकवाड यांनी केले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड







