रत्नागिरी : गुढीपाडव्याला सुरू होणाऱ्या हिंदू नववर्षाची सुरुवात यावर्षी `कीर्तनसंध्याच्या `योद्धा भारत` आख्यानाने होणार आहे. सध्या करोनाचे युद्ध जगभरात सुरू असताना प्रत्यक्ष रणभूमीवर प्राणांची बाजी लावणाऱ्या शूर वीरांची कथा कीर्तनाच्या माध्यमातून घरबसल्या पाहण्याचा अनोखा योग रसिकांना साधणार आहे. रत्नागिरीच्या कीर्तनसंध्या परिवारातर्फे योद्धा भारत मालिकेत गेल्या वर्षी झालेली कीर्तने यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. या कीर्तनमालिकेत महाराष्ट्राचे सुपुत्र परम विशिष्ट सेवा पदक विजेते लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांचे विचार ऐकण्याची संधीही रसिकांना मिळणार आहे.