दशकमहोत्सवी कीर्तनसंध्या आता यूट्यूबवर

रत्नागिरी : गेल्या २०१२ सालापासून रत्नागिरीत सुरू असलेला कीर्तनसंध्या महोत्सव आता जगभरातील कीर्तनप्रेमींना यूट्यूबवर पाहायला मिळणार आहे. कीर्तनसंध्येच्या दशकपूर्तीनिमित्ताने ही व्यवस्था सुरू करण्यात येत असून येत्या २१ फेब्रुवारीपासून महोत्सवातील कीर्तने यूट्यूबवर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या वर्षीचा कीर्तनसंध्या महोत्सव अनोखा ठरणार आहे. कारगिल युद्धाचे वर्णन हा या वर्षीच्या कीर्तनमालिकेचा मुख्य विषय आहे.

भारताचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोवण्यासाठी कीर्तन हे माध्यम निवडावे, असे ठरले आणि २०१२ साली कीर्तनसंध्या समूह स्थापन झाला. अवधूत जोशी, नितीन नाफड, उमेश आंबर्डेकर, मकरंद करंदीकर, गुरुप्रसाद जोशी, रत्नाकर जोशी, योगेशानंद हळबे, योगेश गानू, मोरेश्वर जोशी, मिलिंद सरदेसाई, अभिजित भट, गौरांग आगाशे, श्रीनंदन केळकर, महेंद्र दांडेकर इत्यादी मंडळी त्यासाठी एकत्र आली. राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्तबुवा आफळे यांची त्याला सक्षम साथ लाभली. बुवांच्या ओजस्वी वाणीतून शिवाजी महाराजांपासून एकवीस वर्षांपूर्वीच्या कारगिल युद्धापर्यंतचा भारतीय इतिहास ओघवता झाला. भारतीय इतिहासाची, पराक्रमाची गाथा दर वर्षी कीर्तनमालिकेत मांडण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांनंतरचा काळ, पेशवाई, त्यानंतरचा १८५७ पर्यंतचा काळ, १८५७ नंतरचा स्वातंत्र्यापर्यंतचा काळ, योद्धा भारत असे दरवर्षीच्या मालिकेचे विषय होते.

या उपक्रमात मुख्य विषयांबरोबरच महाराणी ताराबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, आद्य क्रांतिकारक वासुदेव फडके अशा अनेक शूरवीर व्यक्तिमत्त्वांची ओळखही आफळेबुवांनी करून दिली. बुवांनी आपल्या खास शैलीत हा इतिहास सनावळी, महत्त्वाच्या घडामोडींची सुंदर भाषेत मांडणी केली. कीर्तनातील साकी, दिंडी, नाट्यसंगीताला वाद्यवृंदाने दिलेल्या साथीमुळे कीर्तनाला श्रोत्यांची गर्दी पहिल्या वर्षापासूनच वाढत गेली आणि कीर्तनाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. सलग नऊ वर्षांत छोट्याशा रंगमंचापासून आणि सुमारे ५०० श्रोत्यांपासून सुरू झालेली कीर्तनसंध्येची वाटचाल भव्य रंगमंचासह सुमारे सहा हजार श्रोत्यांपर्यंत विस्तारत गेली. कीर्तनासारख्या कालबाह्य समजल्या जाणाऱ्या आणि मंदिरांपुरत्याच मर्यादित राहिलेल्या लोककलेला प्रचंड प्रतिसाद मिळत गेला.

कीर्तनाचे गर्दीचे उच्चांक मोडणारा राज्यभरातील हा एकमेव उपक्रम ठरला आहे. वादक कलाकार हेरंब जोगळेकर, मधुसूदन लेले, उदय गोखले, अभिजित भट, राजा केळकर, विलास हर्षे, वरद सोहोनी, मिलिंद टिकेकर, प्रथमेश तारळकर, राजू धाक्रस, मंगेश चव्हाण, केदार लिंगायत, वैभव फणसळकर, राजू किल्लेकर, हरीश केळकर, साऊंड सिस्टीमसाठी उदयराज सावंत, नेपथ्य अमरीश सावंत (ओमसाई मंडप डेकोरेटर्स), जनरेटर व्यवस्था चंदन खेराडे, प्रोजेक्टर व्यवस्था पावसकर व इतर तंत्रज्ञ, देणगीदारांचीही उपक्रमाला मदत लाभली.


यावर्षी “कीर्तनसंध्या”ची दशकपूर्ती आहे. त्यानिमित्ताने कारगिल युद्ध आणि त्यात पराक्रम गाजविणाऱ्या योद्ध्यांची गाथा हा आख्यानाचा प्रमुख विषय आहे. मात्र करोनाच्या निर्बंधामुळे तसेच करोना फैलावण्याचा धोका लक्षात घेऊन क्रीडांगणावर घेणे योग्य ठरले नसते. त्यामुळे यावर्षीची कीर्तनमालिका दृक्श्राव्य प्रणालीतून सादर करण्यात येणार आहे. त्यासाठीच यूट्यूब हे आधुनिक प्रसारमाध्यम निवडण्यात आले आहे. त्यावरील कीर्तने येत्या २१ फेब्रुवारीपासून श्रोत्यांना पाहता येतील. https://www.youtube.com/channel/UC5P4iPcvWSa25cZi1i5K6NA ही कीर्तनसंध्याच्या चॅनेलची लिंक आहे. त्यावरून सर्वांनी कीर्तने पाहावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
………..

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply