सव्वीस हजाराहून अधिक रसिकांचा यूट्यूब `कीर्तनसंध्या`ला प्रतिसाद

रत्नागिरी : करोनाच्या पार्श्वभूमीवर दशकमहोत्सवी वर्षात यावर्षी यूट्यूबवर प्रसारित करण्यात आलेल्या कीर्तनसंध्याच्या रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पाच दिवसांत २६ हजाराहून अधिक रसिकांनी आफळे बुवांच्या कीर्तनाचा आस्वाद घेतला. कीर्तनाच्या यूट्यूब लिंक आणखी काही दिवस खुल्या राहणार आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष सादरीकरण शक्य नसल्याने दशकमहोत्सवी कीर्तनसंध्याचे प्रसारण यावर्षी यूट्यूबवर करण्यात आले. सलग दहा वर्षे एक कीर्तनकार, एक आयोजन समिती, एक साउंड सिस्टीम आणि एक सलग विषय ही वैशिष्ट्ये असलेला आणि कीर्तनाच्या गर्दीचे उच्चांक मोडणारा रत्नागिरीतील कीर्तनसंध्या हा राज्यभरातील एकमेव उपक्रम ठरला आहे. यावर्षीच्या “कीर्तनसंध्या”च्या शतकपूर्तीचा महोत्सवही यूट्यूबवरील प्रसारणामुळे आगळावेगळा ठरला. यावर्षी कारगिल युद्ध आणि त्यात पराक्रम गाजविणाऱ्या योद्ध्यांची गाथा हा आख्यानाचा प्रमुख होता. देशरक्षणासाठी आपले अवघे आयुष्य स्वातंत्र्ययज्ञात झोकून दिलेले व्यक्तिमत्त्व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची २६ फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी होती. त्यांच्या असीम त्यागाला यंदाची कीर्तनसंध्या अर्पण करण्यात आली.

पाच दिवस मिळून सुमारे २६ हजार श्रोत्यांनी या कीर्तनमालिकेचा लाभ घेतला. या कीर्तनमालिकेला कीर्तनप्रेमींनी दिलेला प्रतिसाद लक्षात घेऊन पुढील काही दिवस ही कीर्तनमालिका यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळणार आहे. कारगिल युद्धाची ही चित्तथरारक कहाणी आफळे बुवांच्या दमदार सादरीकरणातून पाहण्याकरिता यूट्यूबच्या पाचही दिवसांच्या लिंक देण्यात आल्या आहेत. त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन कीर्तनसंध्या परिवारातर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, कीर्तनसंध्या यशस्वी करण्यासाठी मदत करणारे सर्व वाद्यवृंद, तंत्रज्ञ, निवेदक आणि सर्व ज्ञात-अज्ञात मदतनिसांचे आभार कीर्तनसंध्या परिवाराने मानले आहेत.

कीर्तनाच्या लिंक अशा –

दिवस पहिला
https://youtu.be/2RqSQSkvO7M

दिवस दुसरा
https://youtu.be/zcOFINEqbYs

दिवस तिसरा
https://youtu.be/V-WgXNaPZe4

दिवस चौथा
https://youtu.be/XuDrMRjMFoc

दिवस पाचवा
https://youtu.be/VQODnAx3SlU

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply