दशकमहोत्सवी कीर्तनसंध्या आजपासून यूट्यूबवर

रत्नागिरी : गेल्या २०१२ सालापासून रत्नागिरीत सुरू असलेला कीर्तनसंध्या महोत्सव आता जगभरातील कीर्तनप्रेमींना यूट्यूबवर पाहायला मिळणार आहे. कीर्तनसंध्येच्या दशकपूर्तीनिमित्ताने ही व्यवस्था सुरू करण्यात येत असून आजपासून, म्हणजेच २१ फेब्रुवारीपासून महोत्सवातील कीर्तने यूट्यूबवर उपलब्ध होणार आहेत. आज, रविवारी, २१ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता यावर्षीच्या कीर्तनमालिकेतील पहिले कीर्तन रसिकांना पाहायला मिळणार आहे. कारगिल युद्धाचे वर्णन हा या वर्षीच्या कीर्तनमालिकेचा मुख्य विषय आहे.

भारताचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोवण्यासाठी कीर्तन हे माध्यम निवडावे, असे ठरले आणि २०१२ साली कीर्तनसंध्या समूह स्थापन झाला. अवधूत जोशी, नितीन नाफड, उमेश आंबर्डेकर, मकरंद करंदीकर, गुरुप्रसाद जोशी, रत्नाकर जोशी, योगेशानंद हळबे, योगेश गानू, मोरेश्वर जोशी, मिलिंद सरदेसाई, अभिजित भट, गौरांग आगाशे, श्रीनंदन केळकर, महेंद्र दांडेकर इत्यादी मंडळी त्यासाठी एकत्र आली. राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्तबुवा आफळे यांची त्याला सक्षम साथ लाभली. बुवांच्या ओजस्वी वाणीतून शिवाजी महाराजांपासून एकवीस वर्षांपूर्वीच्या कारगिल युद्धापर्यंतचा भारतीय इतिहास ओघवता झाला. भारतीय इतिहासाची, पराक्रमाची गाथा दर वर्षी कीर्तनमालिकेत मांडण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांनंतरचा काळ, पेशवाई, त्यानंतरचा १८५७ पर्यंतचा काळ, १८५७ नंतरचा स्वातंत्र्यापर्यंतचा काळ, योद्धा भारत असे दरवर्षीच्या मालिकेचे विषय होते.

या उपक्रमात मुख्य विषयांबरोबरच महाराणी ताराबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, आद्य क्रांतिकारक वासुदेव फडके अशा अनेक शूरवीर व्यक्तिमत्त्वांची ओळखही आफळेबुवांनी करून दिली. बुवांनी आपल्या खास शैलीत हा इतिहास सनावळी, महत्त्वाच्या घडामोडींची सुंदर भाषेत मांडणी केली. कीर्तनातील साकी, दिंडी, नाट्यसंगीताला वाद्यवृंदाने दिलेल्या साथीमुळे कीर्तनाला श्रोत्यांची गर्दी पहिल्या वर्षापासूनच वाढत गेली आणि कीर्तनाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. सलग नऊ वर्षांत छोट्याशा रंगमंचापासून आणि सुमारे ५०० श्रोत्यांपासून सुरू झालेली कीर्तनसंध्येची वाटचाल भव्य रंगमंचासह सुमारे सहा हजार श्रोत्यांपर्यंत विस्तारत गेली. कीर्तनासारख्या कालबाह्य समजल्या जाणाऱ्या आणि मंदिरांपुरत्याच मर्यादित राहिलेल्या लोककलेला प्रचंड प्रतिसाद मिळत गेला.

सलग दहा वर्षे एक कीर्तनकार, एक आयोजन समिती, एक साउंड सिस्टीम आणि एक सलग विषय ही वैशिष्ट्ये असलेला आणि कीर्तनाच्या गर्दीचे उच्चांक मोडणारा राज्यभरातील हा एकमेव उपक्रम ठरला आहे. वादक कलाकार हेरंब जोगळेकर, मधुसूदन लेले, उदय गोखले, अभिजित भट, राजा केळकर, विलास हर्षे, वरद सोहोनी, मिलिंद टिकेकर, प्रथमेश तारळकर, राजू धाक्रस, मंगेश चव्हाण, केदार लिंगायत, वैभव फणसळकर, राजू किल्लेकर, हरीश केळकर, साऊंड सिस्टीमसाठी उदयराज सावंत, नेपथ्य अमरीश सावंत (ओमसाई मंडप डेकोरेटर्स), जनरेटर व्यवस्था चंदन खेराडे, प्रोजेक्टर व्यवस्था पावसकर व इतर तंत्रज्ञ, देणगीदारांचीही उपक्रमाला मदत लाभली. कीर्तनसंध्येच्या दहा वर्षांच्या वाटचालीत नचिकेत संत, आनंद पाटणकर, विलास हर्षे, मिलिंद टिकेकर, धाक्रस, केदार लिंगायत, मयूरेश केळकर, मेस्त्री, वैभव फणसळकर, श्रीधर तथा राजा केळकर, हरीश केळकर, आनंद डेकोरेटर्स, मधुसूदन लेले अशा अनेकांचे विविध ठिकाणी मोठे सहकार्य लाभले आहे.

रत्नागिरीतील मकरंद पटवर्धन, अनघा निकम, विशाल मोरे, प्रमोद कोनकर, मेहरून नाकाडे, मीरा शेलार, अभिजित नांदगावकर, नीलेश जगताप, सतीश पालकर, राजेश मयेकर, अनिकेत कोनकर यांच्यासह सर्व वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी आपापल्या वृत्तपत्रांमार्फत या उपक्रमाला व्यापक प्रसिद्धी दिली. त्यामुळे उपक्रम सर्वदूर पोहोचायला मोठी मदत झाली. kokanmedia आणि BytesofIndia या वेबपोर्टलद्वारेही कीर्तनसंध्याचा चांगला प्रसार झाला. रत्नागिरी नगर परिषद प्रमोद महाजन क्रीडांगण उपलब्ध करण्यापासून तेथील अन्य सोयीसुविधा पुरवण्यापर्यंत सर्व बाबीत छान सहकार्य करते. याशिवाय रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, तारका फोटो स्टुडिओ, सर्व देणगीदार तसेच ज्ञात-अज्ञात अनेकांचा उपक्रमाला हातभार लागल्यामुळे यश मिळाल्याची भावना कीर्तनसंध्या परिवाराने व्यक्त केली.

दशकपूर्तीनिमित्ताने कारगिलच्या पराक्रमाची गाथा

यावर्षी “कीर्तनसंध्या”ची दशकपूर्ती आहे. त्यानिमित्ताने कारगिल युद्ध आणि त्यात पराक्रम गाजविणाऱ्या योद्ध्यांची गाथा हा आख्यानाचा प्रमुख विषय आहे. यंदा कीर्तनातून कारगिल युद्ध आणि त्या युद्धातील शूर वीरांची गाथा उलगडली जाणार आहे. देशरक्षणासाठी आपले अवघे आयुष्य स्वातंत्र्ययज्ञात झोकून दिलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. अशा या तेजस्वी स्वातंत्र्यसूर्याची २६ फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी आहे. त्यांच्या असीम त्यागाला यंदाची कीर्तनसंध्या अर्पण करून २१ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत कीर्तनसंध्या सादर होणार आहे. ते २६ फेब्रुवारी या काळात यूट्यूबवर प्रसारित होतील. नेहमीप्रमाणेत राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्तबुवा आफळे कीर्तने सादर करतील. निवेदन निबंध कानिटकर, गोगटे मॅडम, रेमणे मॅडम करणार आहेत. ऑर्गनसाथ वरद सोहोनी यांची असे. तबला विश्वास जोशी, हार्मोनियम वरद सोहनी, पखवाज प्रथमेश तारळकर, व्हायोलीन उदय गोखले, कीबोर्ड राजू किल्लेकर, सहगायक अभिजित भट, अजिंक्य पोंक्षे यांचीही समर्थ साथ यंदा लाभली आहे. साउंड सिस्टीम नेहमीप्रमाणेच उदयराज यांचीच आहे. व्हिडीओ चित्रीकरण तारका फोटो स्टुडिओ यांनी केले आहे. स्टेज व्यवस्था ओम साई डेकोरेटर्सची आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे विशेष साह्य लाभले आहे.

करोनाच्या निर्बंधामुळे तसेच करोना फैलावण्याचा धोका लक्षात घेऊन क्रीडांगणावर घेणे योग्य ठरले नसते. त्यामुळे यावर्षीची कीर्तनमालिका दृक्श्राव्य प्रणालीतून सादर करण्यात येणार आहे. त्यासाठीच यूट्यूब हे आधुनिक प्रसारमाध्यम निवडण्यात आले आहे. त्यावरील कीर्तने २१ फेब्रुवारीपासून श्रोत्यांना पाहता येतील.

ही कीर्तने यूट्यूबवर दररोज २४ तास उपलब्ध असतील. पहिले कीर्तन २१ तारखेला सायंकाळी ६ वाजता अपलोड होणार असून २४ तास ते उपलब्ध असेल. त्यानंतर ते डिलीट होईल. याचप्रमाणे पाचही दिवस कीर्तन अपलोड होईल.

• कीर्तन कसे पाहाल?
१) सोबत दिलेल्या https://www.youtube.com/channel/UC5P4iPcvWSa25cZi1i5K6NA या Link वर Click करा.
२) लाल अक्षरातील Subscribe वर Click करा.
३) त्याच्या उजवीकडील Bell Icon वर Click करून All हा पर्याय निवडा.
४) कीर्तनाच्या दिवशी कीर्तन सुरू होण्याच्या वेळी YouTube वर Kirtansandhya Ratnagiri असा Search करून Live कीर्तन पाहता येईल.
(नोंद: पहिल्या ३ सूचनांचे पालन केल्यास कीर्तनाची Notification आपोआप येईल.)

• संपर्क:
कोणतीही शंका असल्यास खालील क्रमांकांवर शक्यतो WhatsApp द्वारे संपर्क करा.
अवधूत जोशी – 9011662220

कीर्तनसंध्याच्या यूट्यूब चॅनेलची https://www.youtube.com/channel/UC5P4iPcvWSa25cZi1i5K6NA ही लिंक आहे. त्यावरून सर्वांनी कीर्तने पाहावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
………..

Leave a Reply