कीर्तनसंध्याच्या यूट्यूब चॅनेलवर १९४७ नंतरच्या भारतीय युद्धाची चित्तथरारक कथा

रत्नागिरी : येथील कीर्तनसंध्या परिवारातर्फे यावर्षीचा दशकपूर्ती कीर्तन महोत्सव यूट्यूब चॅनेलवर सादर करण्यात आला होता. त्याला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आता येत्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १९४७ नंतरच्या भारतीय युद्धाची चित्तथरारक कथा असलेली कीर्तने याच चॅनेलवर पाहायला मिळणार आहेत.

कीर्तनसंध्या महोत्सवाने रत्नागिरीच्या सांस्कृतिक क्षेत्रात आगळे महत्त्व निर्माण केले आहे. सलग नऊ वर्षे वाढत्या प्रतिसादात कीर्तनमहोत्सव साजरा झाला. देशातील महान विभूतींचे माहात्म्य सांगणाऱ्या या महोत्सवाची यावर्षी दशकपूर्ती झाली. मात्र करोनाच्या परिस्थितीमुळे यावर्षीचा महोत्सव जाहीरपणे सादर करणे शक्य नव्हते. त्यासाठी यूट्यूब या प्रभावी समाजमाध्यमाचा उपयोग यावर्षी करण्यात आला. यावर्षीच्या कीर्तनसंध्या महोत्सवातील कीर्तने यूट्यूब चॅनेलवरून प्रसारित करण्यात आली. सुमारे दोन लाख रसिकांनी त्याचा लाभ घेतला.

महोत्सवाला मिळालेला हा प्रतिसाद लक्षात घेऊन गेल्या वर्षीची, २०२० सालची कीर्तनेदेखील यूट्यूबवरून रसिकांना पाहायला मिळणार आहेत. या कीर्तनांमध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९७१ पर्यंत झालेल्या युद्धांचे वर्णन आणि त्यात मर्दुमकी गाजवलेल्या योद्ध्यांची गाथा मांडण्यात आली आहे. गेल्या वर्षी प्रत्यक्ष सादर झालेली योद्धा भारत नावाची ही कीर्तनमालिका यूट्यूबवरून प्रसारित केली जाणार आहे. चारुदत्त आफळे बुवांच्या वाणीतून १९४७ नंतरच्या भारतीय युद्धांची कहाणी रसिकांना पुन्हा एकदा अनुभवता येईल. सर्व कीर्तनांच्या पूर्वरंगात रामायण आणि उत्तररंगात १९४७-१९७१ कालावधीतील युद्धाच्या रोमांचक कथा सादर करण्यात आल्या आहेत. त्यातील पहिले कीर्तन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर (१३ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता Kirtansandhya Ratnagiri या यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळेल. मालिकेतील पुढची कीर्तने अनुक्रमे १७ एप्रिल, २४ एप्रिल, १ मे आणि ८ मे रोजी दिसू लागतील.

कीर्तनसंध्याच्या https://youtube.com/channel/UC5P4iPcvWSa25cZi1i5K6NA या चॅनेलवर ही कीर्तने अवश्य पाहावीत, असे आवाहन कीर्तनसंध्या परिवारातर्फे करण्यात आले आहे.

ले. ज. राजेंद्र निंभोरकर यांना ऐकण्याची संधी

या कीर्तनमालिकेत महाराष्ट्राचे सुपुत्र परम विशिष्ट सेवा पदक विजेते लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांचे विचार ऐकता येणार आहेत. निंभोरकर यांनी सर्जिकल स्ट्राइकच्या आखणीत विशेष भूमिका बजावली होती. रद्द करण्यात आलेले काश्मीरविषयक ३७० कलम, नागरिकत्वाविषयीचे विचार त्यांनी व्यक्त केले आहेत. त्यांचे युद्धातील प्रत्यक्ष अनुभव ऐकण्याची संधीही रसिकांना लाभणार आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply