रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे ११ नवे रुग्ण आणि करोनाचा चौथा बळी; रुग्णसंख्या १२४वर

रत्नागिरी : २१ मे रोजी रात्री उशिरा आलेल्या अहवालांतील ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी नऊ जण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल आहेत; मात्र दोन रुग्ण तपासणी करून आपापल्या घरी गेले असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी रात्री उशिरा दिली. त्या दोन रुग्णांबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला रात्रीच (ता. २१ मे) प्राप्त झाली आहे. त्यातील एक रुग्ण रत्नागिरीत आयसीयूमध्ये उपचारांखाली दाखल आहे. दुसरा रुग्ण कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयातील स्टाफ नर्स आहे. तिच्याशीही आरोग्य विभागाचा संपर्क झाला आहे.

एका महिला रुग्णाचा रत्नागिरीत उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या चार झाली असून, एकूण रुग्णांची संख्या १२४ झाली आहे.

काल (२० मे) रात्री उशिरा सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आज सकाळी जिल्हा माहिती कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. आतापर्यंत ३३ जणांना उपचारांनंतर बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ८५ एवढी असून, दोन पॉझिटिव्ह रुग्ण घरी गेले आहेत.

आज सकाळी पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्यापैकी पाच पुरुष, तर दोन स्त्रिया असून, त्यात दहिवली, चिपळूण, होडबे (दापोली), कोरेगाव, वरवली या ठिकाणच्या रुग्णांचा समावेश आहे. आज संध्याकाळी निगेटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये रत्नागिरीतील १७, गुहागर, कामथे आणि मंडणगडातील प्रत्येकी एक, संगमेश्वरातील दोन, तर कळंबणीतील पाच जणांचा समावेश आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाडा (देवगड) येथील महिलेचा (जिल्ह्यातील पाचवा करोनाबाधित रुग्ण) करोनाचा अहवाल औषधोपचारांनंतर फेरतपासणीमध्ये निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आज (२१ मे) या महिलेस जिल्हा सामान्य रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या तीन रुग्णांवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपचार सुरू असून, आतापर्यंत पाच जणांना बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यात आज करोनाचे २३४५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच, आजच्या दिवसभरात राज्यातील १४०८ रुग्णांना उपचारांनंतर बरे झालेल्यांना घरी सोडण्यात आले आहे. एकाच दिवसात एवढ्या जणांना सोडण्याचा आतापर्यंतचा हा विक्रम आहे. राज्यात सध्या २८ हजार ४५४ रुग्णांवर उपचार सुरू असून, ११ हजार ७२६ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान, करोनामुळे लागू असलेल्या लॉकडाउनच्या नियमांमध्ये २२ मे २०२०पासून शिथिलता देण्याबाबतचे आदेश रत्नागिरी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी २१ मे रोजी जारी केले. यात जिल्हांतर्गत एसटी बससेवा, तसेच रिक्षा आणि केशकर्तनालये (सलून) यांना विशिष्ट अटींवर परवानगी देण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply