रत्नागिरी : जिल्ह्यात आज (२४ जून) सायंकाळपर्यंतच्या २४ तासांत आणखी पाच करोनाबाधित आढळल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या पाचशेच्या उंबरठ्यावर गेली आहे. आणखी एका रुग्णाच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या २४ झाली आहे. नव्या पाच बाधितांमध्ये पोलीस, आशा वर्कर आणि एक स्टाफ नर्स अशा तिघा करोना योद्ध्यांचा समावेश आहे. दरम्यान, सिंधुदुर्गात आज दोघांना घरी सोडण्यात आले.
रत्नागिरीतील परिस्थिती
जिल्ह्यात काल (ता. २३ जून) सायंकाळपासून पाच रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४९९ झाली आहे. कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण रत्नागिरी येथून एका रुग्णाला बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३६४ झाली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७३ टक्के झाले आहे.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण पिसई-कुंभारवाडी (ता. दापोली) येथील असून, त्याचे वय ६४ वर्षे होते. रुग्णाचा मुंबई प्रवासाचा इतिहास आहे. त्याला उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या आता २४ झाली आहे.
काल सायंकाळपासून मिळालेल्या अहवालांनुसार पाच नव्या रुग्णांचे विवरण असे – पायरवाडी, कापसाळ, ता. चिपळूण- १ (मुंबई प्रवास इतिहास), शिवाजीनगर, जुना फणसोप, ता. रत्नागिरी – १ (विशाखापट्टण प्रवासाचा इतिहास), धामेली, कोतवडे, ता. रत्नागिरी – १ (आशा वर्कर), पोलीस वसाहत, जेल रोड, ता. रत्नागिरी – १ (पोलीस कॉन्स्टेबल), गोडाउन स्टॉप, रत्नागिरी – १ (स्टाफ नर्स).
सध्या रुग्णालयात असलेल्या ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११२ आहे. यात पुन्हा दाखल केलेल्या रुग्णाचा समावेश आहे. आज निवळी, नाचणे समर्थनगर, जेलरोड परिसर, कोतवडे धामेळेवाडी ही क्षेत्रे करोना विषाणूबाधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
जिल्ह्यात सध्या ४२ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून, त्यांचे तालुकानिहाय विवरण असे – रत्नागिरी १४, गुहागर १, संगमेश्वर १, दापोली ५, खेड ८, लांजा ५, चिपळूण ७, राजापूर १.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी दोन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण १७८पैकी बरे झालेल्या रुग्णांची संख्या १४७ झाली आहे. चार रुग्णांचा मृत्यू झाला असून, एक रुग्ण उपचारासाठी मुंबई येथे गेला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात २६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन मेपासून आजअखेर एकूण एक लाख आठ हजार ८८९ व्यक्ती दाखल झाल्या आहेत.
…….
