रत्नागिरी : जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ लक्षात घेऊन एक जुलैपासून आठ दिवसांच्या कडक लॉकडाउनची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली. त्यामुळे जिल्ह्यातील व्यवहार ठप्प झाले आहेत.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ऑपरेशन ब्रेक द चेन नावाने एक जुलैपासून आठ जुलैपर्यंत लॉकडाउनची घोषणा केली. शेतकरी, छोटे-मोठे उद्योजक, रोजंदारीवरचे कामगार आणि सर्वसामान्य लोकांबरोबरच जिल्ह्यातल्या व्यापारी संघटना, तसेच काही राजकीय नेत्यांनीही या लॉकडाउनबद्दल नाराजी व्यक्त केली. नुकतीच सुरू झालेली रोजीरोटी पुन्हा बंद पडल्याने ही नाराजी व्यक्त करण्यात आली; मात्र लॉकडाउनची अंमलबजावणी काटेकोरपणाने सुरू झाली. पहिल्या दोन्ही दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातले सर्वच व्यवहार बंद होते. रस्त्यांवर शुकशुकाट होता. एसटी आणि रिक्षा, तसेच खासगी वाहतूक बंद असल्याने शहरांमधील वर्दळ थांबली.
परजिल्ह्यातून येणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी आंबा घाट, कुंभार्ली घाट, कशेडी, हातिवले आणि म्हाप्रळ या जिल्ह्याच्या पाचही सीमा सील केल्या आहेत. तेथील बंदोबस्ताबरोबरच जिल्ह्यातील व्यवस्थेसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह ७०० जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनातील दोन प्रमुख अधिकाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. काही प्रसारमाध्यमांवर त्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. (करोनाविषयक बातम्या प्रसिद्ध करताना कोणाही करोनाबाधिताचे नाव प्रसिद्ध केल्यास तो गुन्हा ठरू शकतो, असा नियम आहे. त्यामुळे ती नावे येथे दिलेली नाहीत.) त्यांच्या काही अधिकारी, कर्मचारी, पोलीस, डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांनाही करोनाची बाधा झाल्याने प्रशासनावरचा ताण वाढला आहे; पण पूर्वीच्या लॉकडाउनपेक्षा रस्त्यावरची गर्दी कमी झाली असून, चाकरमान्यांचा ओघही थांबल्याने तो ताण काहीसा हलकाही झाला आहे. त्यामुळे लॉकडाउनचे राहिलेले दिवसही शांततेत पार पडतील, असा विश्वास जिल्हा प्रशासनाला आहे.
……