कोकण होणार एका आठवड्यात करोनामुक्त

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे कारण पुढे करून स्थानिक प्रशासनाने एका आठवड्याचे कडक लॉकडाउन जाहीर केले आहे. पाच टप्प्यांमध्ये झालेल्या लॉकडाउनमध्ये तीन महिने काढल्यानंतर आत्ताच कुठे हळूहळू सर्व व्यवहार सुरळीत होऊ लागले होते. उद्योगधंदे सुरू झाले होते. ज्यांचे रोजगार आणि व्यवसाय बंद पडले, त्यांनी पर्याय शोधून काढले होते. अनेक पारंपरिक व्यवसाय पुन्हा नव्याने सुरू झाले होते. त्यामुळे दैनंदिन व्यवहारांची ठप्प पडलेली गाडी पुन्हा एकदा वेग घेईल असे वाटत होते. त्याच वेळी पुन्हा एकदा कोकणात ल़ॉकडाउन जाहीर करण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा त्या सर्व व्यवहारांना खीळ बसली आहे.

यावेळी लॉकडाउनची खरोखरीच गरज होती का, याबाबत मतमतांतरे व्यक्त होऊ लागली आहेत. त्यामध्ये मतांतरांचे प्रमाण अधिक आहे. केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाउनमध्ये अधिक शिथिलता आणण्याचा प्रयत्न सुरू केला असताना कोकणातच लॉकडाउन वाढवण्याची वेळ कशी आली? का आली? काही व्यक्तींच्या आग्रहासाठी हा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. करोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी मुंबईशी तुलना करता ती अत्यल्प आहे. चाकरमान्यांचा मुंबईकडून कोकणाकडे सुरू झालेला ओघ करोनाबाधितांची संख्या वाढायला कारणीभूत झाला आहे. महिनाभरापूर्वीच लॉकडाउनचे आदेश निघाले असते, तर कदाचित परिस्थिती आता वाटते तेवढी हाताबाहेर गेली नसती. कोकणातील स्थिती हाताबाहेर गेली, असे वाटत असेल, तर प्रशासनाकडून माहिती लपविली जात आहे, अशी अनेक मते वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली. सत्तारूढ महाआघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनीही लॉकडाउनला उघड विरोध केला. काहीजणांनी नाराजी व्यक्त केली. समन्वयातून लॉकडाउन जाहीर करण्याची गरज होती, असेही मत व्यक्त करण्यात आले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका स्थानिक प्रशासनाने घेतल्यामुळे हे प्रश्न निर्माण झाले आहेत. पण सर्वसामान्यांनी त्याकडे दुर्लक्ष करायला हवे. कारण स्थानिक प्रशासनाने ब्रेक द चेन असे नाव देऊन केवळ आठ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. जागतिक पातळीवर करोनाची जीवनसाखळी मोडायला १४ दिवस लागतात, असे सांगितले गेले आहे. कोकणात मात्र आठच दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. मुंबईतसुद्धा परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे लक्षात आल्यानंतर नुकतेच १४ दिवसांचे लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. कोकणात मात्र केवळ आठच दिवसांचे लॉकडाउन जाहीर केले आहे, हे लक्षात घ्यायला हवे. संबंधित प्रशासन आणि त्या प्रशासनाला आदेश देणार्याक शासनाच्या प्रतिनिधीला करोनावर आठ दिवसांत विजय मिळविणारा एखादा उपाय नक्कीच सापडला असावा. संबंधित प्रशासन आणि त्या प्रशासनाला आदेश देणाऱ्या शासनाच्या प्रतिनिधीला करोनावर आठ दिवसांत विजय मिळविणारा एखादा उपाय सापडला असावा. त्यामुळेच कोकण आठ दिवसात करोनामुक्त होणार आहे. तसे होणार असेल तर आठ दिवसांचा लॉकडाउन निमूटपणे पाळायला कोकणवासीयांना काय हरकत आहे? त्यानंतर सारे काही मुक्त होणार आहे. कारण तेव्हा कोकण करोनामुक्त झालेले असेल. कोकणातील लोकांनी प्रशासनावर आणि प्रशासनाला आदेश देणाऱ्या शासनाच्या प्रतिनिधीवर विश्वास ठेवावा, हेच बरे. कोकणचा आठ दिवसांच्या करोनामुक्तीचा हा पॅटर्न मुंबईसह करोनाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या भागातही वापरता येऊ शकेल. त्यामुळे कोकणाचे नाव उज्ज्वल होणार आहे त्यासाठी कोकणवासीयांनी सहकार्य करावे. उगाच प्रशासनाच्या आणि त्या प्रशासनाला आदेश देणाऱ्या शासनाच्या प्रतिनिधीवर टीका करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नये! आठ दिवसांच्या करोनामुक्तीचे रहस्य ऑनलाइन (किंवा प्रत्यक्ष), संयुक्त (किंवा एकत्रित) पत्रकार परिषदेत उघड होईलच की!

प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ३ जुलै २०२०)
(साप्ताहिक कोकण मीडियाचा तीन जुलैचा अंक मोफत डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा.)

……

One comment

Leave a Reply